Chalisgaon

शहर विकास आघाडीचे गटनेते राजीव देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांना नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांचे जाहीर आव्हान व त्यांनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपांवर खुलासा

शहर विकास आघाडीचे गटनेते राजीव देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांना नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांचे जाहीर आव्हान व त्यांनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपांवर खुलासा

मनोज भोसले

दि.४ नोव्हेंबर रोजी मी नगरपालिका चाळीसगाव येथे नगरपालिकेच्या प्रशासनाचा अनागोंदी कारभार व मागील काळातील झालेला भ्रष्टाचार याबाबत माझी भूमिका मांडली होती. त्यानंतर दि.6 नोव्हेंबर रोजी शहर विकास आघाडीचे गटनेते मा.राजीव देशमुख यांनी माझ्या सारख्या एका राष्ट्रीय पक्षाचा शहराध्यक्ष व जनतेतून निवडून आलेला नगरसेवक असलेल्या किरकोळ माणसाने केलेल्या आरोपांवर तोंडी उत्तर देण्याचा जो काही केविलवाणा प्रयत्न केला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. परंतु या पत्रकार परिषदेत आघाडीचे गटनेते यांना पुराव्यानिशी समर्पक उत्तरे देता आले नाही हे सर्व चाळीसगाववासियांनी विविध माध्यमातून पाहिले. याउलट मला बदनाम करण्यासाठी त्यांनी व त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले, सदर आरोप हे धादांत खोटे असून त्याबाबत मी या पत्रकाच्या माध्यमातून माझी भूमिका मांडणार आहे.

1) सदर पत्रकार परिषदेत माझ्यावर नागद चौफुली जवळील पाण्याची टाकी पाडण्यासाठी केलेल्या कामाच्या मोबदल्यात बील काढून देण्यासाठी मी ३ लाख रुपये घेतले असल्याचा आरोप यांचे सहकारी नगरसेविका पती फकीरा मिर्झा मार्फत यांनी केला. याबाबत वस्तुस्थिती अशी आहे की 2 वर्षापूर्वी फकीरा मिर्झा यांच्या पत्नी तथा शहर विकास आघाडीच्या नगरसेविका यास्मिना बेग फकीरा मिर्झा या ३ अपत्य असल्याने नगरसेविका या पदासाठी अपात्र ठरल्या होत्या. या अपात्रतेसाठी ज्यांनी अर्ज केला होता त्या श्रीमती प्रमिलाताई चौधरी यांना मी मदत केली असल्याचा राग फकीरा मिर्झा यांना होता. तसेच 2 वर्षापूर्वी घाट रोड, नागद चौफुली जवळील जीर्ण झालेली पाण्याची टाकी पाडण्याचा उल्लेख फकीरा मिर्झा याच्यामार्फत करताहेत त्या कामाशी फकीरा मिर्झा यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष काय सबंध येतो हे त्यांनी सिद्ध करावे ??? एव्हडी मोठी रक्कम मला देण्याच्या संदर्भात कायदेशीररीत्या माझ्या हातात अशी कोणती जबाबदारी अथवा अधिकार मला होते कि यांनी ती रक्कम मला देऊ केली?? यासंदर्भात जर यांनी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाला एव्हडी मोठी रक्कम देत असताना ज्यांनी ४५ वर्ष आम्ही गाव सांभाळले असा दावा करणाऱ्या आघाडीच्या गटनेत्यांना फकीरा मिर्झा याने २० महिन्यानंतर सांगावे याचा अर्थ काय समजावा??? मुळात मी केलेल्या आरोपांवरील लक्ष इतरत्र वळविण्यासाठी हा आरोपाचा खेळ खेळला गेला आहे. माझ्या माहितीनुसार या पाण्याची टाकीच्या कामासंदर्भात सत्यता अशी आहे की, सदर काम हे नगरपालिकेच्या निविदाप्रक्रियेनुसार पाचोरा येथील दत्ता पाटील यांना मिळाले होते त्यांनी नंतर हे काम सबटेंडर म्हणून चाळीसगाव येथील सलीम शेख नामक व्यक्तीला दिले असल्याचे कळते. नंतर काम पूर्ण होऊन कामाचे बिलदेखील नगरपालिकेच्या माध्यमातून दिले गेले असल्याचे कळते. यात कुठेही फकीरा मिर्झा अथवा माझा दुरान्वये हि सबंध नसल्याने मी आघाडीचे गटनेते राजीव देशमुख यांना आव्हान देतो की त्यांनी माझ्यावर केलेला आरोप सिद्ध करून दाखवावा. आरोप सिद्ध केल्यास मी राजकारणातून सन्यास घेईल अथवा सिद्ध न केल्यास नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी सन्यास घ्यावा अथवा आपल्या पदाचा त्याग करावा.

2) त्याचप्रमाणे आघाडीचे गटनेते व त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आमच्या सत्ताकाळात सन २०१७ -१८ वर्षात वस्तू खरेदीच्या संदर्भात ८५ रुपयांचे घमेले १८० रुपयांना घेतले गेले, ६० रुपयांची पावडी १८० रुपयांना खरेदी केली, २० रुपयांचा खराटा १५० रुपयांना विकत घेतल्याचा आरोप त्यांनी केला. मुळात सांगितलेले आकडे कसे दिशाभूल करणारे आहेत हे मी उदाहरण म्हणून सप्रमाण सिद्ध करीत आहे ते पुढीलप्रमाणे – नोव्हेंबर २०१६ पूर्वी नगरपालिकेत शहर विकास आघाडीची सत्ता होती. सन २०१३ -१४ मध्ये आघाडीचे गटनेत्यांचे निकटवर्तीय ठेकेदार संतोष मिश्रीलाल शर्मा यांच्या आदी इंजिनिअरींग नावाने हॉर्डवेअर साहित्य पुरविणे हे काम देण्यात आले होते. त्यावेळेस वर उल्लेख केलेले आमच्या काळात नगरपालिकेला १८० रुपयात पुरविण्यात आलेले घमेले यांनी सन २०१३ -१४ मध्ये २४९ रुपयांना पुरविले आहे, तसेच सदर घमेले २०१४ – १५ ला २६५ रुपयांना खरेदी करण्यात आले आहे. गंभीर बाब म्हणजे आमच्या काळात सन २०१७ – १८ मध्ये मशीन पंप ४८०० रुपयांना खरेदी करतो आहे तोच मशीन पंप यांनी त्यांच्या सत्ताकाळात सन २०१४ – १५ मध्ये आदी इंजिनिअरिंग च्या माध्यमातून दुप्पट म्हणजेच ९५०० रुपयांना खरेदी केल्याचे निदर्शनास येते.

६० रुपयांची पावडी हे १८० रुपयांना खरेदी केल्याचे सांगताहेत मुळात अश्या दरात कुठलीही खरेदी झालेली नसून झाली असल्यास त्यांनी ते कागदोपत्री सिद्ध करावे. अन्यथा जाहीर माफी मागावी. मी या प्रेसनोट सोबत सन २०१३ – १४ व सन २०१४ -१५ सन २०१७ -१८ चे दरपत्रक आपल्या माहितीसाठी देत आहे. विशेष म्हणजे जे स्प्रिंकलर खरेदी संदर्भात म्हणजेच ७० रुपयांची वस्तू ७५० रुपयात याच आदी इंजिनिअरींग फर्म ने नगरपालिकेला वर्षोनुवर्षे एव्हड्या मोठ्या तफावतीने पुरविल्याचा आरोप मी आघाडीचे गटनेते यांच्या निकटवर्तीय ठेकेदारावर केला होता त्याबाबत कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी मी वेळोवेळी चीफ ऑफिसर, जिल्हाधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार केली असून सद्यस्थितीत हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका क्रमांक ११८२५ / २०१९ नुसार दाखल केली आहे. आघाडीचे गटनेते यांनी केलेल्या वस्तू खरेदीच्या आरोपाबाबत त्यांनी आजवर चौकशीसाठी काय केले याचा कागदोपत्री खुलासा करावा.

हि झाली तफावत मात्र शहर विकास आघाडीच्या काळात अश्याच पद्धतीने झालेल्या कोट्यावधी रुपयांची बिले केवळ कागदोपत्री काढण्यात आल्याचे पुरावे मी लवकरच सादर करणार आहे.

3) सर्वात महत्वाची बाब अशी की, आघाडीचे गटनेते व त्यांच्या सहकाऱ्यांनी एका बाबीचा उल्लेख केला की, शहरांतर्गत पाणीपुरवठा योजनेचा १०३ कोटींचा आराखडा (डीपीआर) ६८ कोटींवर आल्याचे ते सांगतात. मुळात डीपीआर ची रक्कम शासनाच्या नियमानुसार अत्यावश्यक असलेल्या बाबी लक्षात घेऊन मंजूर केला जातो त्यासंदर्भात विरोधक हे दिशाभूल करत आहेत. कारण मूळ डीपीआर म्हणजे अधिकृत एजन्सीने तयार केलेला अंदाजित आराखडा असतो. सदर डीपीआर मध्ये शहरवासियांना २४ तास पाणीपुरवठा होण्यासाठी प्रत्येक घरोघरी जे फ्लोमीटर बसवून दिले जाणार होते ते शासनामार्फत मिळावे अशी तरतूद केली होती तसेच अत्यावश्यक असणाऱ्या शहरवासीयांच्या हिताच्या काही बाबी देखील त्या डीपीआर मध्ये समाविष्ट करण्यात आल्या होत्या. मात्र आघाडीचे गटनेते व त्यांचे सहकारी यांच्याशी वेळोवेळी सभागृहात चर्चा केली असता त्यांच्या सूचना मांडण्याची विनंती आम्ही केली होती. मात्र दुसऱ्याला नाकर्ते म्हणणारे हे सद्गृहस्थ व यांचे सहकारी यांनी यासंदर्भात डीपीआर अनावश्यक असणाऱ्या तपशीलवार सूचना सभागृहात मांडल्या असतील तर त्याचा लेखी पुरावा त्यांनी द्यावा. मुळात फक्त सदर पाणीपुरवठा योजना होऊ नये यासाठी अतोनात प्रयत्न करत विकासकामांना अडथळा यावा म्हणून विविध माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले गेले.

4) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासंदर्भात आघाडीचे गटनेते व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोप केला आहे की, ते जेव्हा पुतळा पाहण्यासाठी गेले होते तेव्हा घृष्णेश्वर पाटील गैरहजर होते. ही बाब जरी सत्य असली तरी वस्तुस्थिती अशी आहे की, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळातच गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा प्रश्न मार्गी लागला. भाजपा शासनाच्या माध्यमातूनच व भाजपाचेच लोकप्रतिनिधी यांच्या अथक प्रयत्नाने अनेक मंजुऱ्या, जागेचे अडथळे दूर झाले. आणि मला सांगताना अभिमान होतो की एक नगरसेवक या नात्याने नव्हे तर एक सच्चा शिवप्रेमी म्हणून सुरुवातीपासूनच महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत ज्या काही प्रक्रिया झाल्यात त्यात मी सक्रियपणे सहभागी होतो. तुम्ही ज्या पुतळ्याची फोर्मेलीटी म्हणून पाहणी केली ते पुतळेच काय असे अनेक पुतळे मी आधीच पाहून आलेलो होतो. पुतळा पाहण्याच्या प्रक्रियेत आमच्या नगराध्यक्षा यांच्यासह जेष्ठ नगरसेवक व अनेक सत्ताधारी नगरसेवक उपस्थित होते.

उलट यापलीकडे खेदाची व अतिशय लाजिरवाणी बाब म्हणजे दि.२० फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ स्मारक व शिवसृष्टी भूमिपूजन सोहळ्याचे निमंत्रण मी स्वत आघाडीचे गटनेते यांच्यासह सर्व आघाडीच्या नगरसेवकांना दिले होते. त्यांचे पत्रिकेत सन्मानाने नामोल्लेख असताना, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज युवराज संभाजीराजे स्वतः सोहळ्यासाठी आले असताना शहर विकास आघाडीचे एकही नगरसेवक अथवा पदाधिकारी सदर समारंभाला का उपस्थित नव्हते?

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत आघाडीचे गटनेते यांची अनेक वर्ष एकहाती सत्ता नगरपालिकेत असताना हा अस्मितेचा प्रश्न का मार्गी लावला नाही??

5) शहर विकास आघाडीचे गटनेते यांनी आपल्या पत्रकार परिषदेत त्यांच्या काळातील काही मुख्याधिकारी हे पूर्णकाळ तसेच चाळीसगाव नगरपालिकेसाठी काही अधिकारी यांची असलेली ओढ सांगून आताच्या बदली झालेल्या अधिकारी यांच्या संदर्भात त्यांनी शंका व्यक्त केली. यासंदर्भात आवर्जून सांगावेसे वाटते की, मागच्या काळातील अधिकारी पूर्ण कालावधी व त्यापेक्षा जास्त कालावधी टिकण्याचे कारण तसेच नगरपालिकेत ओढ असण्याचे कारण म्हणजे त्याकाळातील प्रत्येक टेंडर हे मूळ निविदा किमतीच्या ९.९९ टक्के जादा दराने दिली गेलीत. यात शेकडो कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. सत्ताधारी शहर विकास आघाडीचे व मागील काही अधिकाऱ्यांचे सबंध वर दिल्याप्रमाणे वस्तू खरेदी निवेदेतील फरक व कोट्यावधींचे कागदोपत्री काढण्यात आलेली बिले व जादा दराच्या निविदा दर्शवून जातात की, मलिदा खाण्यासाठी ही अभद्र युती चाळीसगांव वासीयांच्या कराचा – कष्टाचा पैसा वर्षानुवर्ष लुटत होती. आणि हे सर्व शहर विकास आघाडीचे सर्वेसर्वा तथा गटनेते व त्यांचे सहकारी यांच्या आशिर्वादाने सुरु असल्याचे लक्षात येते.

अश्या अनेक बाबी आम्ही यापुढेही मांडणार असून वर केलेल्या आरोपांचे लेखी व पुराव्यानिशी उत्तरे शहर विकास आघाडीचे गटनेते यांनी चाळीसगाव वासियांना द्यावीत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button