Yawal

संगणक परिचालकाच्या गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून साकळीची ग्रामसभा गाजली

संगणक परिचालकाच्या गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून साकळीची ग्रामसभा गाजली

शासकीय कार्यालयातील अधिकारी गैरहजर !
ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा ठराव करण्याची मागणी
.यावल (शब्बीर खान ): साकळी ता् .यावल येथील ग्रामपंचायतीची मागील आठवड्यात कोरम अभावी तहकूब झालेली ग्रामसभा दि.१३ रोजी घेण्यात आली. या सभेत सदर ग्रामपंचायतीतील संगणक परीचालकाकडून संगणक कक्ष अंतर्गत गेल्या पाच वर्षात झालेल्या आर्थिक गैरकारभाराबाबत काही नागरिकांच्या तक्रारी होत्या.या तक्रारीवरून संबंधित संगणक परिचालकावर फौजदारी गुन्हा दाखल केला जावा तसेच संगणक परिचालकावर वेळोवेळी तक्रारी करूनही ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून ठोस अशी कारवाई होत नसल्याने संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा ठराव करा अशी मागणी तक्रारदारांनी लावून धरत आजची ग्रामसभा चांगलीच गाजवली. तर काही नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या नागरी समस्या वेळेत सोडले जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. एकूणच जवळपास दोन तास चाललेली ग्रामसभा वादळी ठरली.या सभेस गावात शासकीय कार्यालयांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मात्र पाठ फिरवली होती.
याबाबत सविस्तर असे की, साकळी ता.यावल येथील ग्रामपंचायतीची शासन परिपत्रकानुसार दि.८ ऑगस्ट २०२२ रोजी ग्रामसभा आयोजित केलेली होती तथापि कोरम पूर्ण न झाल्याने ती ग्रामसभा तहकूब करण्यात आली.सदर तहकूब ग्रामसभा आज दि.१३ ऑगस्ट २०२२ रोजी ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.सुषमा विलास पाटील या होत्या तर या सभेस जि.प.माजी शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र सुर्यभान पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती सह यावल कृऊबाचे माजी संचालक विलासनाना पाटील, ग्रा.पं.सदस्य खतिब तडवी, सै.अश्फाक सै.शौकत,दिनकर माळी,शरद बिराडे,साहेबराव बडगुजर, जगदीश मराठे, माजी ग्रामपंचायत सदस्य जहांगीरखाँ कुरेशी, नूतनराज बडगुजर, साकळी नूतन विकासोचे संचालक राजेंद्र बडगुजर,माजी संचालक अशोक जंजाळे, भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सुनील पाटील या पदाधिकाऱ्यांसह अनेकांची उपस्थिती होती. सभेच्या सुरुवातीला ग्रामविकास अधिकारी हेमंत जोशी यांनी सभेच्या कामकाजा संबंधी वाचन केले. शासनाच्या विविध योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांना माहिती देणे व कागदपत्रांची पूर्तता करणे,मनरेगा व नरेगाचा चालू वर्षाचा कृती आराखडा तयार करणे तसेच आलेल्या परिपत्रक व अर्जांचा विचार विनिमय करणे त्याचप्रमाणे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत प्रत्येकाने आपल्या घरावर राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक फडकवण्यासाठी कोणती काळजी घ्यायची व कोणते नियमांचे पालन करायचे यासंबंधी सविस्तर माहिती दिली.
आजच्या ग्रामसभेत गावातील आरोग्य, शिक्षण, महसूल यांच्यासह विविध शासकीय विभागातील एकही अधिकारी व कर्मचारी हजर नव्हते.त्यावर या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना ग्रामसभेत उपस्थित राहणे बंधनकारक आहे का ? विविध विभागांना पत्र का दिले नाही? असे प्रश्न ग्रामस्थ विलास पवार यांनी ग्रामविकास अधिकारी जोशी यांना विचारला असतांना ग्रामसभेची दवंडी दिलेली होती.त्यानुसार सर्वांनी हजर राहणे गरजेचे होते असे जोशी सांगितले.मग शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या अनुपस्थितीवरून ग्रामविकास अधिकारी व विलास पवार यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाली व या गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस देण्याचा ठराव करण्यात यावा अशी मागणी केली.
साकळी ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक कक्ष परिचालक विजय पाटील यांनी सन २०१७ ते २०२२ या काळात संगणक कक्षाच्या व्यवहारातून ग्रामपंचायतीला आतापर्यंत फक्त दोन हजाराच्या आसपास रक्कम जमा केलेली आहे. तशी रक्कम जमा पावती आहे.बाकीच्या रकमेचा काही एक हिशोब नाही. तर संगणक परिचालक यांनी परस्पर खर्च सुद्धा केलेला आहे.या मुद्द्यावरून विलास पवार, नितीन फन्नाटे व किसन महाजन या तिन्ही नागरिकांचे तक्रार अर्ज आहेत. सदर अर्जावर चर्चा होत असताना सभा ठिकाणी वातावरण चांगलेच तापलेले होते. संबंधित संगणक परिचालकाच्या व्यवहारात अफरातफर झालेली आहे हे कागदोपत्री पुराव्यावरून स्पष्ट दिसून येत असतांना संबंधित संगणक परिचालकावर ग्रा.पं. प्रशासनाकडून अद्याप पर्यंत कुठलीच ठोस कारवाई झालेली नसून तीन महिने लेट नोटीस का दिली ? नेमकी ही हुकूमशाही आहे का ? असे प्रश्न उपस्थित करत संबंधित संगणक परिचालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठराव करा अशी मागणी नितीन फन्नाटे यांनी केली. त्यावर ग्रामविकास अधिकारी जोशी हे चांगलेच निरुत्तर झालेले होते. वारंवार बोलण्यावरून जणू काय ते संगणक परिचालकाची पाठराखण करत आहे असे दिसून येत होते.
संगणक परिचालक परस्पर खर्च करतो व तसा त्याला अधिकार आहे का? असा प्रश्न उपस्थित करत पुराव्यानिशी तक्रार करून ही संगणक परीचालकावर वेळीच कारवाई होत नसल्याने संबंधित ग्रामविकास अधिकारी हेमंत जोशी यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याचा ठराव करा अशी मागणी विलास पवार व किसन महाजन यांनी केली.
त्याचप्रमाणे युनूसशेठ यांच्या घराच्या जवळील सांडपाण्याचा पाईप वारंवार भरून जात असल्याने नागरिकांना खूप त्रास होतो.घाणीचा सामना करावा लागतो. तरी त्या ठिकाणची समस्या वारंवार सांगूनही सुटत नाही अशी तक्रार ग्रा.पं.सदस्य सय्यद अशपाक सय्यद शौकत यांनी केली. तर विकासोचे संचालक राजेंद्र बडगुजर यांच्या घराजवळील पिण्याच्या पाण्याची नविन पाईपलाईन टाकण्यात यावी.अशी मागणी स्वतः बडगुजर यांनी केली. तर आमचा थकीत पगाराचा प्रश्न सोडविला जावा यासाठी ग्रा.पं.च्या सफाई कर्मचाऱ्यांनी आमचे पगार लवकर करा मागणी केली.यासह नागरिकांनी मांडलेल्या काही तक्रारी व प्रश्नांचे लवकरात लवकर निरसन केले जाईल.असे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.ग्रामसभेत अधून- मधून गोंधळ होत होता.
या सभेस राजाराम पवार विलास पवार,नितीन फन्नाटे, वसीम खान, अयाज खान,बापू साळुंखे, किसन महाजन, नाना भालेराव, सुरेश बडगुजर, प्रमोद बडगुजर, नरेश महाजन, इकबाल भाई, दिनेश माळी,फारुख रिक्षावाले,ग्रा.पं.चे सफाई कर्मचारी यांच्यासह अनेक तरुण व नागरिक उपस्थित होते.

* ग्रामविकास अधिकारी हतबल- आजच्या ग्रामसभेदरम्यान गोंधळ होण्याची ग्रामविकास अधिकाऱ्यांना कुणकुण होती. त्यामुळे ते आज चांगलेच ॲक्शन मोड मध्ये आलेले दिसून येत होते मात्र नागरिकांच्या तक्रारीच्या पाढा व संगणक परिचालकाच्या आर्थिक गैरकारभाराच्या तक्रारीवरून ग्रामविकास अधिकारी हेमंत जोशी चांगलेच हतबल झालेले होते.सबळ पुरावे असूनही संगणक परिचालकावर कारवाई होत नाही यावर तक्रारदार नितीन फन्नाटे संताप व्यक्त केला.

*पत्रकारास अरेरावी-ग्रामसभा संपल्यानंतर ग्रामविकास अधिकारी जोशी यांना पत्रकार चंद्रकांत नेवे यांनी ग्रामसभेदरम्यान नागरिकांच्या तक्रारीवरुन कोणते ठराव केले जाणार आहे.अशी लेखी माहिती मागितली असता श्री.जोशी यांनी वेगळाच अर्थ धरत नेवे यांना अरेरावी केली व कार्यालयात अपमानास्पद वागणूक दिली.तरी अशा या मनमानी व हुकुमशाही कारभार करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर वरिष्ठ कार्यालया कडून निलंबनाची कारवाई करण्याची गरज आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button