Pune

कुर्बानीकडे पूर्वग्रह दूषित मानसिकतेतून नव्हे सकारात्मक दृष्टिकोनातून बघणे गरजेचे

कुर्बानीकडे पूर्वग्रह दूषित मानसिकतेतून नव्हे सकारात्मक दृष्टिकोनातून बघणे गरजेचे

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: लेखक – समीर सय्यद
(पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते)

काल गणनेतील शेवटच्या जिलहज्ज या अरबी महिन्यात जगभरातील कोट्यवधी मुस्लिम कुर्बानी करतात. कुर्बानी म्हणजे त्याग, आत्मसमर्पण. ही कुर्बानी केवळ एक प्रथा नसून, आत्मसमर्पपणाची प्रेरणा देणारा महान उत्सव आहे. असा उत्सव जो वंदनीय विश्व निर्मात्या समोर नतमस्तक होण्याची आणि वेळ प्रसंगी वाट्टेल त्या गोष्टीचा त्याग करण्याची प्रेरणा देतो. समाजातील अनिष्ट चालीरिती, वाईट रूढी परंपरा नष्ट करण्याकामी ईश्वरीय आदेशानुसार चळवळ चालवून समाज प्रबोधनाचे महान कार्य करणाऱ्या पैगंबर इब्राहिम आणि पैगंबर इस्माईल यांच्या त्यागाच्या अविस्मरणीय आठवणींना पुनरुज्जीवित करण्याचा हा सण. समाज परिवर्तनाच्या चळवळीत आपल्या पोटच्या गोळ्याला कुर्बान करण्यासाठी तयार झालेल्या आणि स्वतःला कुर्बान करण्यासाठी क्षणात हो म्हटलेल्या पैगंबर बाप लेकाच्या आठवणींना उजाळा देणारा हा उत्सव. या उत्सवाला धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक पैलू जुडलेले आहेत.

१४ वर्ष वनवासाला न जाता प्रतिकात्मक स्वरूपात दीप प्रज्वलित करून श्रीरामजींचा वनवास संपल्याचा आनंद आपण दरवर्षी दीपावलीच्या माध्यमातून साजरा करतो. तर स्वतःच्या मुलीला दहन न करता प्रतिकात्मक स्वरूपातील होळी भोवती ओरडत होलिकाला जिवंत जाळण्याचा आपण निषेध करतो. अगदी अशाच प्रकारे पैगंबर इब्राहिम यांनी ईश्वराच्या आज्ञेला समर्पित होत स्वतःचा मुलगा कुर्बान करण्याचा आणि ईश्वराच्या प्रसन्नतेसाठी वडिलांच्या हाकेला ओ देत चक्क मृत्यूला कवटाळण्यासाठी तयार होणाऱ्या पैगंबर इस्माईल यांच्याविषयी असणारी कृतज्ञता आणि ईश्वरावरील श्रद्धा जगभरातील मुस्लिम दरवर्षी प्रतीकात्मक स्वरुपात प्राण्यांची कुर्बानी देऊन व्यक्त करत असतात.

खरं तर ‘जिओ जीवष्य जीवनम’ हा सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे प्राण्यांची कुर्बानी ही सृष्टी नियमांच्या अनुकूलच आहे. माणूस हा केवळ शाकाहारी किंवा मांसाहारी नसून, तो मिश्रहारी प्राणी आहे. भारतासह जगभरातील माणसांची मोठी संख्या (१००० मागे ९५०) मांसाहारी आहे. जगभरातील ७०० कोटी मांसाहारींची गरज भागवण्यासाठी ७० कोटी प्राण्यांची कत्तल केली जाते. त्यामुळे कुर्बानीला विरोध करण्याचा नैतिक अधिकार कोणालाच नाही. माणसाची शारीरिक संरचना देखील याला अनुरूप अशीच आहे. आधुनिक विज्ञानाने झाडे, पाले, भाज्या ह्या देखील सजीव असल्याचे सिद्ध केल्याचे वेगळे सांगण्याची गरज नाही. शेतातील पीक जोपासत असताना कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर करून शेतकरी कळत नकळत करोडो कीटक, जीव जंतू मारत असतो. हेच प्रयोग आपल्या घरातही चालू असतात. कोषात गेलेल्या आळीला उकळत्या पाण्यात ठार मारूनच रेशीम बनवले जाते. त्यामुळे जीवहत्या, पशुदया, मांसाहार पाप वगैरे वगैरे विषयांवर चर्चा आता निरर्थक झाली आहे. कोणाला शाकाहारी राहायचेच असेल तर तो त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे.

भारतातील बहुसंख्य लोकसंख्या ही देखील (७०-८०%) मांसाहारी आहे. अनेक राज्य केवळ मांसाहारावर निर्भर आहेत. अनेकांच्या रोजच्या आहारात मांस असणे नित्याचे आहे. मौज, मजा, मस्ती म्हटलं की पार्टी, आणि पार्टीची व्याख्याच आपल्याकडे मटण, चिकन, मच्छी, अंडी आपल्या थाळीत सजलेली असणे आणि त्यावर आपण यथेच्छ ताव मारणं हीच आहे. मात्र गोर गरीबांची कसली पार्टी, कसला ताव? वर्षानुवर्षे मटण न चाखलेल्या गोर गरीबांसाठी कुर्बानी ही मोठी पार्टीच असते. कारण कुर्बानीच्या मटणाचा मोठा हिस्सा गरीबांमध्ये वितरित केला जातो. ग्लोबल हंगर इंडेक्सच्या आकडेवारी नुसार जिथे दरवर्षी हजारो गरिबांचा भूकबळी जातो तिथे कुर्बानी सारख्या उपक्रमातून गरिबांचे पोट भरत असेल आणि गरिबांना अन्न दान करण्याची प्रेरणा अनेकांना मिळत असेल तर त्यात चूक काय? मी तर म्हणेल गोर गरीबांचे पोट भरण्यासाठी रोज कुर्बानी झाली पाहिजे. असो !

कुर्बानीचा आर्थिक पैलू देखील समजून घेतला पाहिजे. मागील काही वर्षात मांस निर्यातीबाबत भारताची आकडेवारी, त्यातून मिळणारे अरबो खरबोंचे परकीय चलन पाहता कुर्बानीला व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहणे देखील गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. उलट कुर्बानी जणू मोठा अपराध असल्याचा गवगवा केला जात आहे. खरं तर कुर्बानीतून होणारी आर्थिक उलाढाल शेतकऱ्यांसाठी मोठे वरदान ठरत आहे. हवामानाची अनिश्चितता, दुष्काळ, अनिश्चित बाजारभाव, खतांच्या वाढलेल्या किमती या कारणांमुळे अल्प व मध्यम भूधारक शेतकरी मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालन, शेळीपालन यासारख्या खात्रीशीर उत्पन्न देणाऱ्या पशुपालन व्यवसायाकडे वळला आहे. विशेष म्हणजे शेतकरी फक्त आणि फक्त कुर्बानीसाठी वेगवेगळ्या जातीच्या बकऱ्यांची जोपासना करत आहेत. यातून कुर्बानीच्या फक्त ३ दिवसांतच वर्षभराचे उत्पन्न शेतकरी कमवित आहेत. या जोडधंद्यामुळे लाखो शेतकरी आत्महत्या करण्यासारख्या टोकाच्या भूमिका घेण्यापासून परावृत्त होत आहेत. या आणि अशा अनेक कारणांमुळे कुर्बानीकडे पूर्वग्रह दूषित मानसिकतेतून न बघता शासन आणि समाजाने सकारात्मक दृष्टिकोनाने पाहणे आवश्यक आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button