Dhule

50 लाखांच्या रस्ता अपहराविरोधात बिरसा क्रांती दलाचा ‘ऊलगुलान’ रस्ता बनवणे, फौजदारी गुन्हे आणि काळ्या यादीत टाकण्याची प्रमुख मागणी

50 लाखांच्या रस्ता अपहराविरोधात बिरसा क्रांती दलाचा ‘ऊलगुलान’ रस्ता बनवणे, फौजदारी गुन्हे आणि काळ्या यादीत टाकण्याची प्रमुख मागणी

धुळे – प्रतिनिधी असद खाटीक

धुळे जिल्ह्यासह राज्यभरात गाजत असलेल्या शिरपूर तालुक्यातील रामा 1 ते दोंडवाडीपाडा ग्रामा 80 या रस्त्याच्या 50 लाखांच्या निधिचा अपहार करणारे ठेकेदार संदीप डी. पाटील व इतरांवर फौजदारी गुन्हे दाखल होणेकामी 2 ऑक्टोंबर रोजी बिरसा क्रांती दलाच्या वतीने जेलरोड येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण
करण्यात आले. यापूर्वी संघटनेच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी उपोषण करण्यात आले होते.
माहिती अधिकार कार्यकर्ते गेंद्या कैलास पावरा यांनी उपविभागिय अधिकारी सा. बां. उपविभाग शिरपूर 2 यांच्याकडे माहिती अधिकार अर्ज टाकला असता, अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती अशी की, रा. मा. 1 ते दोंडवाडीपाडा ग्रामा 80 हा रस्ता 0/0 ते 2/0 किमी सुधारणेसाठी रूपये 49 लाख 51 हजार 858 रूपयांना आदिवासी उपयोजनेतून महाराष्ट्र शासनाने प्रशासकिय मंजूरी दिलेली होती. मात्र ठेकेदार संदीप डी. पाटील व बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून सारा रस्ताच गिळंकृत करून, संपूर्ण बीलाची रक्कम अदा करून घेतलेली आहे. तसा संबंधित कार्यालयाचा चौकशी अहवाल व प्रत्यक्ष एक रूपयाचेही काम न झाल्याचा पंचनामा रिपोर्ट सांगतो.
आदिवासी भागाच्या विकासासाठी येणारा पैसा तेथेच खर्च होणे अपेक्षित असतांना, संबंधित ठेकेदार, अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करून आदिवासी भागातील रस्ताच गायब करून टाकलेला आहे. सदर मंजुर रस्त्याचे काम न करता संपूर्ण रकम हडपणारे ठेकेदार संदीप डी. पाटील व संबंधितांवर शासनाची फसवणूक, दिशाभूल करून आदिवासी समाजाला विकासापासून वंचित ठेवून समाजाचे आर्थिक, सामाजिक शोषण केलेले आहे. अशा भ्रष्ट प्रवृत्तिच्या ठेकेदार व इतरांवर फौजदारी गुन्हे दाखल करून, सरकारी पैशांची वसूली करून सदर मंजूर रस्ता तात्काळ तयार करून द्यावा.
दिनांक 22 सप्टेंबर रोजी रस्ता अपहाराच्या चौकशीला आलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. डी. भोसले मात्र चोरी गेलेल्या रस्त्यावर ऊभे राहून साफ खोटे बोलून आदिवासी समाजाची शुद्ध फसवणूक करत होते.
सदर रस्त्याच्या प्रत्यक्ष पाहणीसाठी मा. जिल्हाधिकारी, मा. जिल्हा पोलिस अधिक्षक आणि संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देवून, रस्त्याची पाहणी करून दोंडवाडीपाडा येथील आदिवासी जनतेला न्याय मिळवून देण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात येते. आणि सदर रस्ता तयार करून अपहारातील दोषिंवर फौजदारी गुन्हे नोंदवण्यात यावे. अन्यथा येत्या काही दिवसात दोंडवाडीपाडा येथील नागरिकांना घेवून संघटना तीव्र आंदोलन छेडेल. उपोषणात बिरसा क्रांती दलाचे जिल्हा सल्लागार विलास पावरा, तालुका कार्याध्यक्ष साहेबराव पावरा, तालुका सचिव गेंद्या पावरा, आदिवासी विकास परिषदेचे जळगाव जिल्हाध्यक्ष दारासिंग पावरा, विश्वास पावरा, शांतिराम पावरा, सागर मोरे यांनी सहभाग नोंदवला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button