Chalisgaon

कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना..आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट

कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना..आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट

शहरातील मोकळ्या मैदानांवर भरण्यासह इतर उपाययोजना बाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

मनोज भोसले

चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांची भेट घेत कोरोना प्रतिबंधासाठी करावयाच्या उपाययोजना बाबत पत्राद्वारे निवेदन दिले. यावेळी आमदार चव्हाण यांनी चाळीसगाव तालुक्यात शिवनेरी फाउंडेशन व भारतीय जनता पक्षाच्या वतीने १० हजार मास्क, दररोज १५०० गरजूंना जेवण, कार्यालयात मोफत जनसेवा क्लिनिक, ग्रामीण भागातील १५० गावांना निर्जंतुकीकरण साठी सोडियम हायपो क्लोराईड उपलब्ध करून देणे, संपुर्ण चाळीसगाव शहर एकाच दिवसात ७ अत्याधुनिक फवारणी यंत्रांद्वारे फवारणी आदी कामांची माहिती दिली.

आमदार चव्हाण यांनी दिलेल्या पत्रात पुढील मागण्या व उपाययोजना बाबत सूचना देण्यात आल्या आहेत,

1) चाळीसगाव तालुक्यातील सबस्टेशन येथील मुख्य ट्रान्सफार्मर बंद असल्याने मोठ्या प्रमाणात शेती व गावठाण भागात लोडशेडींग करण्यात येत होते. त्यामुळे शेती पिकांचे नुकसान होत असून लॉकडाऊन मुळे घरीच असलेल्या नागरिकांची विजेअभावी गैरसोय होत आहे, घरात वीज नसल्याने नाईलाजाने लोकांना घराबाहेर यावे लागत आहे. त्यासाठी वीज कंपनीने २५ MVA ट्रान्सफार्मर उपलब्ध करून दिले तरी देखील लोडशेडींग कमी होत नसल्याने त्याची क्षमता अजून ५० MVA ने तात्काळ वाढविण्यासाठी आदेश व्हावेत.

2) दिल्ली येथील निजामुद्दीन येथील मरकज प्रकरणातील संशयित हे चाळीसगाव जवळील अल्पसंख्यांक बहुल मालेगाव व धुळे येथे देखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यानुसार चाळीसगाव त्यांना स्थलांतर होण्यासाठी सर्वाधिक जवळचे असल्याने येथील मस्जिद व इतर प्रार्थनास्थळे यात स्थायिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी या पार्श्वभूमीवर चाळीसगाव तालुक्यातील सर्व धार्मिक प्रार्थनास्थळे सील करण्यात यावीत.

3) चाळीसगाव तालुक्यात रुग्णांना दवाखान्यापर्यंत ने आण करण्यासाठी असणाऱ्या BVG ग्रुपच्या १०८ सेवेअंतर्गत ३ रुग्णवाहिका सद्यस्थितीत बंद आहेत त्यामुळे रुग्णांना नाईलाजाने खाजगी वाहनाचा वापर करावा लागतो. दुर्दैवाने खाजगी वाहनातून कोरोना संशयित रुग्णाने प्रवास केल्यास त्याचा प्रादुर्भाव वाढू शकतो. तरी सबंधित यंत्रणेला रुग्णवाहिका तात्काळ दुरुस्त करून नियमित सुरु करणेबाबत मा.तालुका आरोग्य अधिकारी यांनी दि.१ एप्रिल २०२० रोजी विनंती केली असता सदर १०८ रुग्णवाहिका सेवेचे जिल्हा व्यवस्थापक यांनी ‘माझी खुशाल तक्रार कलेक्टर, आमदार, खासदार यांच्याकडे करा, मला काही फरक पडत नाही’ अश्या अतिशय अर्वाच्च भाषेत उत्तर दिले. तरी सदर व्यवस्थापकावर कारवाई होऊन सदर रुग्णवाहिका कार्यान्वित करण्याचे आदेश व्हावेत.

4) भविष्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू शकते हे पाहता चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर चे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे, त्यांचे राहिलेले दरवाजे, खिडक्या, विद्युतीकरण आदी कामे विशेष बाब म्हणून तात्काळ केल्यास जवळपास ५० आयसोलेशन / क्वारंटाइन रूम तयार होऊ शकतील, याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम व आरोग्य विभागाला व्हावेत.

5) चाळीसगाव शहरात 3 मोठी भाजीपाला किरकोळ विक्री मार्केट आहेत मात्र ती अतिशय अरुंद जागेत असल्याने सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन सोशल डीस्टन्स पाळला जात नाही. तरी चाळीसगाव शहरातील बलराम व्यायामशाळा मैदान, राष्ट्रीय विद्यालय / महाविद्यालय मैदान, अभिनव शाळा, भडगाव रोड समोरील मैदान असे अनेक पर्यायी जागा असून त्याठिकाणी आखणी व बॅरीकेटीग केल्यास संभाव्य कोरोना संसर्गाचा धोका बऱ्यापैकी कमी होऊ शकतो.

6) चाळीसगाव तालुक्यात १९५ रेशन दुकाने असून त्यामार्फत नियमित धान्य व्यतिरिक्त प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य मोफत दिले जात आहे. मात्र लॉकडाऊन मुळे आधीच भीतीच्या वातावरणात असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना याबाबत पुरेशी माहिती नसल्याने ते गैरसमज होऊन एकाचवेळी धान्य दुकानावर गर्दी करण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच गर्दीचा परिणाम सोशल डीस्टंसिंग वर होऊन दुकानदारासह नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तरी रेशन वितरणाबाबत कालबद्ध नियोजन करून कमीत कमी गर्दी होईल या दृष्टीने नियोजन करण्यात यावे तसेच ज्यांच्याकडे रेशनकार्ड आहे मात्र ते प्राधान्य कुटुंब यादीत नाव नाही त्यांना देखील लाभ मिळावा ही विनंती.

7) चाळीसगाव मतदारसंघातील अनेक नागरिक हे बाहेर गावी अडकली आहेत. त्यातील अनेक जणांना वैद्यकीय उपचार आवश्यक असल्याने त्यांना मुळगावी चाळीसगाव तालुक्यात आणणे अत्यावश्यक आहे तसेच अनेक विद्यार्थी – महिला – वृद्ध नागरिक यांची बाहेरगावी मोठी गैरसोय होत असल्याने त्यांना परत गावी आणण्यासाठी तालुकास्तरावर प्रशासनामार्फत उपाययोजना कराव्यात.

8) शहरी व ग्रामीण भागात अवैध गावठी दारू व पत्यांचे क्लब सुरु असल्याने त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पोलीस प्रशासन, स्थानिक पोलीस पाटील व ग्रामस्थांमार्फत त्यांना वारंवार सूचना व कारवाई करूनही चोरून लपून – रात्री अपरात्री संधीचा फायदा घेऊन हे प्रकार सुरु आहेत. तरी अश्या अवैध गावठी दारू व पत्त्यांचे क्लब चालविणारे यांची यादी करून त्यांना गावातील मराठी अथवा माध्यमिक शाळेत बंदिस्त करण्यात यावे, यासाठी स्थानिक गावकऱ्यांचे देखील सहकार्य लाभेल व पोलीस प्रशासनावरील भार कमी होऊन भविष्यात आणीबाणीच्या परिस्थितीत होणारा कोरोना प्रादुर्भाव देखील होणार नाही.

अश्या प्रकारच्या उपाययोजना आमदार चव्हाण यांनी सुचविल्या असता जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी एकूण घेत त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button