Nagpur

?” दुःख नये तेणे। करिता सायास।। कारण अभ्यास। तुका म्हणे ।।” विद्यार्थ्यांनो, कोरोना महामारीत अभ्यास सोडू नका- कृष्णकुमार जी. निकोडे

विद्यार्थ्यांनो, कोरोना महामारीत अभ्यास सोडू नका- कृष्णकुमार जी. निकोडे,

राजेश सोनुने

संपूर्ण विश्वभरातील कानाकोपऱ्यात तद्वतच आपल्या महाराष्ट्र राज्यात कोरोना नावाच्या महाभयंकर महामारीने प्रचंड उच्छाद मांडला आहे. या संसर्गाने विषाणू बाधीत लोकांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. ही भयावह परिस्थिती गांभिर्याने लक्षात घेऊन शासनाने संपुर्ण राज्यातील शाळा व महाविद्यालयांना ३१ मार्च २०२० पर्यंत सुट्ट्या जाहिर केलेल्या आहेत. आपल्याला भरपूर सुट्ट्या मिळाल्या आहेत, त्या केवळ मौजमजा करण्यातच खर्ची घातल्या पाहिजेत. असा विद्यार्थ्यांनी गैरसमज करून घेऊ नये. पालकांनीही फक्त कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकोपाच्या चिंतेत-विवंचनेत राहून आपल्या लाडक्या पाल्यांच्या अभ्यासाकडे कानाडोळा करता कामा नये. अशाही परिस्थितीत पाल्यांच्या अभ्यासाकडे जातीने लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या इतरत्र वारेमाप भटकण्याला वेळीच पायबंद घालणे इष्टच ठरेल. यामुळे महामारीच्या संसर्गालाही आळा घालता येईल. आपल्याला शिक्षकासारखे काही नाही शिकविता आले तरीही आपण त्यांच्याकडून झालेल्या अभ्यासाची उजळणी वारंवार घेऊन विस्मरण टाळू शकतो. झालेल्या भागांचे दृढीकरण करून घेऊ शकतो. आपण एवढचं करुया. “तुला शिक्षकांनी काय काय शिकवलंय त्यापैकी एक पाठ लिहून दाखव. वाचून दाखव. गणित सोडवून दाखव.” अशा साध्या साध्या सूचना देऊन अभ्यास पक्के करता येईल. आपण शिक्षकापेक्षा सद्यस्थितीत त्याच्या जास्त जवळ राहून वावरत आहात. हे अधिक महत्त्वाचे आहे.

विद्यार्थ्यांनीही आता शाळा लवकरच सुरू होईल आणि मगच आपण अभ्यासाला नेटाने भिडू, अशी हट्टीवृत्ती सोडून द्यावी. दिवसातून किमान एक तास तरी अभ्यास नित्यनेमाने करत रहावे. विषय कोणताही असू द्या. एकेका पाठाचा अभ्यास पूर्ण करत जा. एकदा-दोनदा पाठाचे समजपूर्वक वाचन करा. त्यातील साध्या साध्या वाक्यांना उत्तर समजून त्यांच्याकरिता प्रश्न तयार करून बघा. त्या एका उत्तरासाठी किती प्रकारचे प्रश्न तयार होऊ शकतात? ते पडताळून पहा. गणिताचे सरावसंच किंवा उदाहरण संग्रह वारंवार सोडवून बघा. त्याच धर्तीवर काही लेखी व तोंडी उदाहरणे स्वतः तयार करून सोडवण्याचा सराव करा. पाढे, मापे, परिमाण, वस्तू मापण इत्यादीसाठी कोष्टक पाठांतर अगत्यानेच करा. वस्तू, वजन, धारके आदी निरखून बघा. तोलून मापून पहा. मराठीच्या शब्दांसाठी इंग्रजी व हिंदीचे पर्यायी शब्द कोणते? स्थिर किंमती, संख्या लेखन व वाचन, सूत्रे, सिध्दांत इत्यादी गोष्टी पक्क्या मनात ठसवून घेतल्या पाहिजेत. म्हणतात ना :–

” गणिताच्या भयावह जंगलातून जातांना,
सूत्रांची बंदूक हाती घ्यावी लागते! “

उर्वरित सर्व विषयांचीही अशीच तयारी करून घ्यावी. विविध प्रयोगांची यादी, प्रत्येक प्रयोगाच्या जुळणी व मांडणीस आवश्यक साहित्य, सिद्धता, निष्कर्ष, दक्षता आदी प्रॅक्टिकली करून बघावे. डेंजरस स्वरूपाचे प्रयोग लेबॉर्टीखेरिज करून पाहणे टाळलेलेच बरे! राज्यकर्ते, राजवट, ऐतिहासिक काळ यांची एकत्रित जंत्री करावी, घटनाक्रम व घटनाक्रम लक्षात घ्यावे. एकेका वाक्यांवर व परिच्छेदावर आधारित जोड्या लावा. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. खरे किं खोटे ते सांगा. कोणी व कोणाला म्हटले? टिपा लिहा. चित्र वाचून उत्तरे द्या, नकाशा वाचन करा. भौगोलिक माहीती विशद करा. पिकांची यादी करा. खणिज पदार्थांची माहीती गोळा करा. नैसर्गिक आपत्ती उद्भवण्याची कारणे जाणून घ्या. आपत्तीचे व्यवस्थापन कसे करता येऊ शकेल यावर मार्ग शोधा. इत्यादी आपण क्रमिक पाठ्यपुस्तकांच्या वाचन-लेखन प्रक्रियेतून सहज मिळवू शकता. अशा स्वतःच्या प्रयत्नांतून शिक्षण पूर्ण करण्याला स्वानुभव, स्वयं अध्ययन किंवा स्वाध्याय असे म्हणतात. जगद्गुरू संतशिरोमणी तुकारामजी महाराज जीवनात सफलता यामुळेच प्राप्त करू शकाल असे सांगतांना म्हणतात –

” दुःख नये तेणे। करिता सायास।।
कारण अभ्यास। तुका म्हणे ।।”

परमेश्वराच्या कृपेने या महामारीचे जीवघेणे संकट जर येत्या ३१ मार्च पर्यंत ओसरले तर मात्र विद्यार्थ्यांना तत्क्षणी परीक्षेला सामोरे जाऊन तोंड द्यावे लागणार आहे. म्हणून त्यांनी आपले धैर्य खचू देता कामा नये. त्यांनी स्वतःमध्ये जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, सहनशीलता, चिकित्सकवृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठासून भरला पाहिजे. याही परिस्थितीत *”आय विन! ऽऽ… परफेक्ट, आय विन!!ऽऽऽ…”* किंवा *”येस्ऽऽऽ… आय कॅन!”* अशी पॉझिटिव्ह थिंकिंग अंगिकारावी. या स्वयं अध्ययनातून आपल्यात अभ्यासूवृत्ती निमार्ण झाली, तर काय? काही विचारूच नका! जीवनात ‘तुच तुझ्या जीवनाचा खरा शिल्पकार’ म्हणून नावारूपाला याल. येणार्‍या परीक्षेत आपण या न्यायाने उतराल तर खरोखरच यशस्वी व्हाल. अशी मला पक्की खात्री आहे! समस्त गुरुजनांचे ह्रदयस्थ भाव मांडतांना मन गलबलून आले आणि अंतःकरणातून आवाज आला, *”आदर्श विद्यार्थ्यानों, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!”*

श्री कृष्णकुमार जी. निकोडे,
पदवीधर प्राथमिक शिक्षक,
जि. प. उच्च प्राथमिक केंद्रशाळा काटली,
पं. स. गडचिरोली, जि. प. गडचिरोली.
मो. नं. ७४१४९८३३३९ / ७७७५०४१०८६
ई-मेल : [email protected]

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button