Maharashtra

कांद्याचा पेचप्रसंग, पाकिस्तान अन् बरेच काही…

कांद्याचा पेचप्रसंग, पाकिस्तान अन् बरेच काही…

कांद्याचा पेचप्रसंग, पाकिस्तान अन् बरेच काही…

प्रतिनिधी नितीन माळे
नोव्हेंबर अखेरपर्यंत देशात कांद्याचा अभूतपूर्व तुटवडा भासणार आहे. आजपासून पुढील 75 दिवसांत देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांदा उत्पादन व पुरवठ्यात मोठी घट आहे. आकडेवारीत सांगायचे तर आजपासून (ता. 13 सप्टेंबर) येत्या 75 दिवसांत देशाची सुमारे 45 लाख टन कांद्याची मागणी वा गरज असणार आहे.
त्यातुलनेत पुरवठ्यातील घट किमान 25 ते कमाल 40 टक्के असू शकते. वरील मागणीच्या कांद्याच्या लागणी जुलै-ऑगस्ट महिन्यात व्हायला हव्या होत्या. पण, रोपलावणीच्या वेळी दुष्काळ आणि पुनर्लागणीच्या वेळी अतिपाऊस या चक्रात देशभरात लागणी घटल्या. 2018 मधील कांद्यातील मंदीमुळेही लागणी कमी झाल्या. जून – जुलै 2019 मध्ये कांदा बियाण्याची नीचांकी विक्री झाली होती. तेव्हाच तेजीचे संकेत मिळाले.

कांद्याचा पेचप्रसंग, पाकिस्तान अन् बरेच काही…
शिवाय, सध्या चाळीत साठवलेल्या उन्हाळ कांद्याचा कॅरिओव्हर म्हणजे शिल्लक साठाही ऑक्टोबरमध्ये खूप कमी आहे. गेल्या वर्षी देशाची दोन महिन्यांची गरज भागवेल इतका अतिरिक्त उन्हाळी कॅरिओव्हर होता.
कांद्यातील टिपीकल तेजी-मंदीचे हे सायकल आहे. उदा. 2015 तेजीत तर 2016 मंदीत, 17 तेजीत 18 मंदीत आता 19 पुन्हा तेजीत. ( कॅलेंडर वर्षाचा सरासरी भाव)
केंद्र सरकारकृत एमएमटीसी कंपनीने परवाच 2 हजार टन कांदा आयातीचे टेंडर काढलेय आणि त्याचे शिपमेंट नोव्हेंबरच्या अखेर अपेक्षित आहे. टेंडरमध्ये चीन, अफगाणीस्तान, पाकिस्तानसह अन्य कुठल्याही देशाचा कांदा असा उल्लेख आहे.
माध्यमांनी त्यातला पाकिस्तान उचलला आहे आणि बातम्या केल्या. संबंधित कालावधीत 45 लाख टन मागणी आणि त्या तुलनेत 2 हजार टन आयात म्हणजे काहीच नाही. स्टॉकिस्टला इशारा देण्यासाठी हे पाऊल उचलले असावे. पण त्यांनाही डिमांड सप्लायचे बॅलन्सशीट चांगले माहिती आहे.
आजच, ता. 13 सप्टेंबर रोजी कांद्याचा किमान निर्यात दर (एमईपी) कृत्रिमरित्या 850 डॉलर प्रतिटन म्हणजे सहा हजार रु. प्रतिटनावर नेण्याचे नोटीफिकेशन वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेय. आजघडीला 26 ते 29 हजार प्रतिटन देशांतर्गत बाजारभाव आहेत. थोडक्यात, कांद्याचे निर्यात मूल्य वर नेऊन देशातून जाणारा कांदा अडवणे. देशातून दरमहा दीड ते दोन लाख टन निर्यात होत असते. स्वाभाविकपणे देशांतर्गत बाजारात जर तुटवडा असेल तर आणि दर चढे राहणार असतील, कुठल्याही सरकारसाठी निर्यात थांबवणे क्रमप्राप्त ठरते. ( समर्थन नाही.)
भारतात कांदा आयात व्यवहार्य ठरत नाही…
सार्क देश, आग्नेय आशियायी, आखाती हे भारतासारखे खानपान असणारे देश भारतीय कांद्याचे ग्राहक आहेत. भारतात कांद्याचे दर वाढले ही वरील देशांतही दर वाढतात. आजघडीला पाकिस्तानमधील कांद्याचा दर ही भारताच्या रेंजमध्ये आहे. भारत ज्या प्रकारचा कांदा पिकवतो, त्याच्या निर्यात मार्केटमध्ये भारताचा सर्वांत मोठा वाटा आहे. भारताची गरज भागवू शकेल इतका सरप्लस जगात कुठल्याही देशात नसतो. भारतीय कांद्याचा रंग,आकार,चव आणि झटका पाकिस्तान वगळता अन्य देशातील कांद्यात नसतो. त्यामुळे भारताला फक्त भारतीय शेतकरीच कांदा खावू घालू शकतो.
भारतीय कांदा निर्यातीचा आकडा पाकिस्तानाच्या एकूण कांदा उत्पादनापेक्षा जास्त असतो
कांदा निर्यातीचे चित्र – एप्रिल-मार्च 18-19 आर्थिक वर्षांत भारतातून 21.8 लाख टन कांदा निर्यात झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 37.9 टक्के वाढ आहे. 17-18 मध्ये 15.8 लाख टन कांदा निर्यात होती. वरील निर्यातवृद्धीचा सध्याच्या बाजारभावाशी संबंध जोडता येणार नाही. कारण ती गेल्या आर्थिक वर्षांतील आहे. चालू आर्थिक वर्षांत – एप्रिल 2019 पासून पुढच्या निर्यातीचा प्रभाव आजच्या बाजारभावावर असेल.
देशाच्या एकूण उत्पादनाशी 18-19 मधील निर्यातीचे प्रमाण जवळपास दहा टक्के येते. एका ट्रेड साईट नुसार 2018 मध्ये कांद्याचा जागतिक एक्स्पोर्ट सेल्स 3.4 अब्ज डॉलर्स (रु.23 हजार कोटी ) मूल्याचा होता. 2018 मध्ये डॉलर व्हॅल्यूत जगामध्ये नेदरलॅंड क्रमांक एकचा निर्यातदार होता. एकूण जागतिक डॉलर रुपी मूल्यात 19 टक्के वाटा नेदरलॅंडचा होता. त्यानंतर चीन (15%), मेक्सिको (12.7%) आणि भारताचा (12.5%) क्रम आहे. अपेडा साईटनुसार 2017 मध्ये नेदरलॅंड पहिला तर भारत दुसऱ्या क्रमांकावर होता.
भारताचा शेजारी स्पर्धक देश पाकिस्तानचा जागतिक निर्यात मार्केटमध्ये केवळ 1.4 टक्के वाटा आहे. भारतीय कांदा निर्यातीचा आकडा पाकिस्तानाच्या एकूण कांदा उत्पादनापेक्षा जास्त असतो. नेदरलॅंडचा कांदा प्रामुख्याने युरोपीय देशांत सॅलड्ससाठी निर्यात होतो. भारतीय कांद्याचे मार्केट प्रामुख्याने सार्क, आखाती व आग्नेय आशियायी देश आहेत – ज्यांचे खानपान भारतासारखे तिखट, तेज आहे.
युरोपला सॅलडसाठी कमी तिखट कांदा लागतो. भारतात युरोपसाठीच्या सॅलड कांद्याच्या लागणीचे प्रयोग गेल्या दशकात झाले आहेत, मात्र व्यापारी तत्वावर त्याचे यश ऐकिवात नाही. अलिकडच्या वर्षांतील आकडेवारीनुसार जागतिक कांदा उत्पादनात चीन पहिल्या क्रमांकावर आहे,तर भारत दुसरा आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button