Indapur

Indapur: हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेला जन्म देणारी माता म्हणजे राजमाता जिजाऊ – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

Indapur: हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेला जन्म देणारी माता म्हणजे राजमाता जिजाऊ – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे : इंदापूर येथे शिवभक्त परिवार व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे आयोजन कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूरच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते यावेळी बोलताना राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेला जन्म देणारी माता म्हणजे राजमाता जिजाऊ होय.
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज जयाजीराव बाजी मोहिते तसेच शिवभक्त परिवाराचे डॉ. लक्ष्मण आसबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले तसेच यावेळी राजमाता जिजाऊ उद्यानाचे उद्घाटन देखील मान्यवरांच्या हस्ते झाले.
सर्व आजी – माजी सैनिक, SRPF, CRPF यांच्या माता किंवा पत्नी यांचे जिजाऊ पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. इंदापूर तालुक्यातील अमर शहीद लक्ष्मण संतू डोईफोडे (बोराटवाडी) यांच्या वीरपत्नी श्रीमती सुवर्णाताई लक्ष्मण डोईफोडे यांना या वर्षीचा जिजाऊ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
श्री.नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूरचा माजी खेळाडू अक्षय बाळासाहेब मोरे याची दुबई येथे होणाऱ्या बेसबॉल युनायटेड लीगसाठी निवड झाल्याबद्दल राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारी माता म्हणजे राजमाता जिजाऊ होय. मुलावर संस्कार कसे करायचे यासाठी राजमाता यांच्याकडे आदराने पाहिले जाते. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा कसे धैर्याने पुढे जाऊ जायचे हे राजमाता जिजाऊ यांच्याकडून शिकायला मिळते. एवढे महान कार्य कर्तृत्व राजमाता जिजाऊंचे आहे. आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आजच्या दिवसाची आठवण ठेवून राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोरून हटवून देऊ नका. आपल्या कार्य कर्तृत्वसाठी युवा पिढीने सतत दक्ष रहावे याची शिकवण स्वामी विवेकानंद यांनी दिली.
जयाजीराव बाजी मोहिते म्हणाले की,’ इंदापूर नगरी ही शहाजीराजे भोसले यांची पावन नगरी असून इंदापूरच्या मातीला छत्रपती शिवाजीराजे भोसले घराण्याचा इतिहास आहे.आज या भूमीत आल्यानंतर धन्य झालो असून सिंदखेड या ठिकाणी ज्या पद्धतीने राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जातो ती परंपरा त्यानंतर सर्वात मोठी इंदापूरमध्ये होत असून या ठिकाणी वीर माता ,वीर पत्नी तसेच आजी-माजी सैनिकांचा या दिवशी सन्मान केला जातो ही परंपरा पुढे देश पातळीवर कार्यरत राहो.
डॉ. लक्ष्मण आसबे यांनी राजमाता जिजाऊंच्या कार्याचे अनेक दाखले देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना दिलेले संस्कार तसेच स्वराज्य स्थापनेची प्रेरणा व मार्गदर्शन संबंधी माहिती डॉ. आसबे यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जीवन सरवदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले.आभार प्रकाश खांबसवाडकर यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button