Aurangabad

पतीच्या निधनाने खचून गेलेल्या पत्नीने गळफास घेऊन संपवले जीवन

पतीच्या निधनाने खचून गेलेल्या पत्नीने गळफास घेऊन संपवले जीवन

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : कोरोना महामारी मध्ये कोरोनाने पतीचे निधन झाल्यामुळे मानसिकरित्या खचून गेलेल्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बीड बायपासवरील सुमित्रा पॅराडाईज येथे घडली. रुपाली किशोर देशमुख (वय ३४) वर्षे असे मृत महिलेचे नाव असून रुपाली यांचे पती इंदूरला नोकरी करत होते. लॉकडाऊनमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे किशोर देशमुख यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर रुपाली या चार वर्षांच्या मुलीसह आई-वडिलांकडे राहत होत्या.

पतीविरहामुळे त्या पुरत्या खचल्या होत्या. बुधवारी दुपारी त्यांचे आई-वडील घराबाहेर गेले होते. त्यानंतर रुपाली यांनी दरवाजाला आतून कडी लावून घेत आतील खोलीत पंख्याला ओढणीने गळफास घेतल्याची घटना घडली. घरी परतलेल्या आई-वडिलांनी आवाज दिल्यानंतर प्रतिसाद मिळाला नाही. रुपाली दरवाजा उघडत नसल्याचे पाहून त्यांनी शेजाऱ्यांना बोलावले. दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा रुपाली यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांना बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि चार वर्षांची मुलगी आहे. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस नाईक पृथ्वीराज चव्हाण पुढील तपास करत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button