Aurangabad

लाच घेतांना पंचायत समितीचा वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात

लाच घेतांना पंचायत समितीचा वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री पंचायत समितीच्या वरिष्ठ लिपिकाला महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी शेतकऱ्यांकडून अडीच हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. संजय पांडुरंग सराटे (रा. मयूर पार्क, कार्तिकनगर) असे लाचखोर वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी त्यांच्या शेतात रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर खोदली होती. या विहिरीचे बांधकामही त्यांनी नुकतेच केले होते. या कामाचे पैसे मिळण्यासाठी त्यांनी फुलंब्री पंचायत समिती कार्यालयात अर्ज दाखल केला आहे.

पैसे मंजूर करून देण्यासाठी सराटे यांनी तक्रारदारांकडून चार हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारदारांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली, तेव्हा सराटे यांनी पुन्हा चार हजार रुपयांची मागणी केली आणि तडजोड करत अडीच हजार रुपये घेण्याची तयारी दर्शवली. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपीला पकडण्यासाठी फुलंब्री येथील पंचायत समिती कार्यालय परिसरात सापळा रचून सराटे यांनी तक्रारदार शेतकऱ्यांकडून लाचेचे अडीच हजार रुपये घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button