Mumbai

?आताची मोठी बातमी..APMC मध्ये कोट्यावधीचा सेस घोटाळा; व्यापारी आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने तिजोरीची लूट

?आताची मोठी बातमी..APMC मध्ये कोट्यावधीचा सेस घोटाळा; व्यापारी आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने तिजोरीची लूट

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध मार्केटमध्ये बाजार फी, देखरेख फी, तोलाई आणि लेव्ही अशा वसूल केल्या जाणाऱ्या सेसमध्ये कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा ठपका वैधानिक लेखा परिक्षण अहवालात ठेवला आहे. वाहतूकदारांनी दिलेल्या बीलांची शहानिशा न करता प्रवेशद्वारावरील कर्मचारी सेसचा भरणा करीत असल्याचा दोष लेखा परिक्षणाच्या अहवालात आहे. ज्या पद्धतीने सेस वसूल केला जातो यात बदल केल्यास मोठ्या प्रमाणात बूडीत जाणाऱ्या सेसची रक्कम वाचू शकते असा गंभीर शेरा वैधनिक लेखा परिक्षणाच्या अहवालात नोंद करण्यात आला आहे.

समितीमध्ये प्रत्यक्ष खरेदीदाराकडून बाजार फी, देखरेख खर्च वसूल केला जातो.
बाजार फी हे बाजार समितीचे खरेखुरे उत्पन्न आहे. तसेच तोलाईवर आकारण्यात येणारी लेव्ही ही मापाड्यांची असते. ही रक्कम असुरक्षित कामगार मंडळामार्फत बाजार समितीला अदा केली जाते. जेव्हा खरेदीदाराकडून समितीकडे सेसचा भरणा केला जातो. तेव्हा त्याने खरेदी केलेल्या मालाची किंमत ही बरोबर आहे, की नाही. तसेच फी भरणा करण्यात येतो की नाही. याची शहानिशा करण्यात येत नाही. त्यामुळे बाजार फी आणि देखरेख फी पूर्ण वसूल होत नाही असा ठपका अहवालात आहे.

खरेदीदाराने खरेदी केलेल्या मालाची बिले संबंधित स्थानिक वाहतूकदाराकडे देऊन त्यांचे मार्फत वसूली खिडकीवर बाजार फी, देखरेख खर्च व लेव्ही आदींचा भरणा करण्यात येतो. मात्र, या बिलाची प्रत्यक्षात तपासणी कृषी बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांमार्फत केली जात नाही. उदा. बाजार भावानुसार मालाची किंमत, एकूण विक्री केलेल्या मालाची संख्या व त्याच बिलाचे आवाक-जावक प्रवेशद्वारावरून ये-जा करण्यात आलेला माल सेस भरल्याचे आहे की नाही याची तपासणी होत नाही. त्यामुळे माल सेस न भरताच जावक प्रवेशद्वारावरून बाहेर जात असल्याचा गंभीर ठपका वैधानिक लेखा परिक्षण अहवालात आहे. या चूकीच्या पद्धतींमुळे कोट्यावधी रूपयांचा सेस बूडीत जात आहे. याबाबत सचिव अनिल चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

कसा होतो अपहार :
एखादे शेतमाल घेऊन जेव्हा वाहन प्रवेशद्वारावर येते. तेव्हा त्यांच्याकडे असलेल्या मालाच्या कागदोपत्री बाबी पाहून संगणकात नोंद केली जाते. नंतर त्या नोंदी संगणक व सर्वरमधून डिलीट केल्या जातात. डिलीट केलेल्या नोंदींची तुलना करून नंतर हिश्‍यांचे वाटप केले जाते. अशी एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली.

अहवालातील दोष

‘अ’ वर्ग व्यापारी वाहतूकदार व आडते यांचे परवाने नुतनीकरण करताना कागदपत्रे तपासली असता विविध दोष आढळून आले.

भाजीपाला विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना लेखी अदा केले जाते. परंतु, त्याप्रमाणे दरमहिन्याला कामाचा आढावा घेतला जात नाही.

पेटी कॅश बुक रोजच्या रोज बंद करून रोख शिल्लक दाखवली जात नाही.

काही परवानाधारकांचा परवाना नुतनीकरण केल्याचे रजिस्टरला नोंद नाही.

बिगर गाळाधारकांकडून अनामत रक्कम घेतलेली नाही, याची रजिस्टरला नोंद नाही.

परवानाधारकांचे मागील थकबाकी व चालू वसूली केल्याची नोंद नाही.

उपसचिवांवर दोष
कांदा-बाटाटा मार्केटमध्ये विभागामार्फत प्राप्त होणाऱ्या तोलाई पत्रकाच्या आधारावर बाजार फी, देखरेख फी, तोलाई व लेव्हीची आकारणी केली जाते. परंतु प्रत्यक्षात व्यापाऱ्यांची उलाढाल किती हे तपासण्याची यंत्रणा बाजार समितीकडे नाही. कांदा-बटाटा मार्केटमधील निरीक्षकांनी व्यापाऱ्यांनी दरवर्षी सेस किती भरला आहे याची खातरजमा करायला हवी. तसेच निरीक्षकांमार्फत तपासण्याचे काम होत नसल्याने उपसचिव यांनी त्यांच्यामार्फत सेस वसूल होते की नाही याची तपासणी केली जात नसल्याने सेस बूडत असल्याचे खापर उपसचिवांवर फोडण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button