Mumbai

Mumbai Diary:  नंदुरबारमधील शिक्षण व्यवस्थेसाठी आ.तांबे यांची धाव..शालेय शिक्षणमंत्र्यांसोबत पत्रव्यवहार शिक्षण क्षेत्रात विशेष योजना आणण्यासाठी प्रयत्न

Mumbai Diary: नंदुरबारमधील शिक्षण व्यवस्थेसाठी आ.तांबे यांची धाव..शालेय शिक्षणमंत्र्यांसोबत पत्रव्यवहार शिक्षण क्षेत्रात विशेष योजना आणण्यासाठी प्रयत्न

प्रतिनिधी
राज्याच्या उत्तर टोकाला असलेल्या आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्याचा क्रमांक निरक्षरतेच्या बाबतीत राज्यात पहिला आहे. मात्र ही ओळख पुसून नंदुरबारला नवी ओळख मिळवून देण्यासाठी आता आ. सत्यजीत तांबे यांनी बाह्या सरसावल्या आहेत. नंदुरबारमध्ये निरक्षर लोकांचं प्रमाण एवढं जास्त का आहे, याचा शास्त्रोक्त अभ्यास करून शासनाने त्रुटी दूर करणारी एखादी शिक्षण योजना जाहीर करावी, अशी मागणी करणारं पत्र आ. तांबे यांनी शालेय शिक्षणमंत्र्यांना पाठवलं आहे. लवकरच नंदुरबार हे शिक्षण क्षेत्रासाठी नंदनवन करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नव-भारत साक्षरता कार्यक्रमासाठी राज्यात २०११ च्या जनगणनेच्या आधारे सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणाद्वारे राज्यात सर्वाधिक म्हणजे ६८ हजार ८२० एवढे निरक्षर नंदुरबार जिल्ह्यात आहेत. त्याखालोखाल मुंबई शेजारच्या ठाणे जिल्ह्याचा क्रमांक आहे. नंदुरबार जिल्हा हा आदिवासी-बहुल जिल्हा आहे. अनेक गरीब कुटुंबं इथे राहतात. गरिबी हेदेखील निरक्षरतेमागील कारण आहे. त्याशिवाय या जिल्ह्यातील लोक रोजगारासाठी नाशिक, मुंबई, नगर अशा जिल्ह्यांमध्ये येत असल्यानेही शिक्षण व्यवस्थेवर त्याचा परिणाम झालेला दिसतो.

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी मात्र नंदुरबारमधील या निरक्षरतेबाबत नाराजी व्यक्त केली असून ही निरक्षरता दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी त्यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना पत्र लिहून नंदुरबार जिल्ह्यासाठी विशेष शिक्षण योजना राबवण्याची मागणी केली आहे. नंदुरबारमधील जिल्हा परिषदेच्या शाळा अधिक सशक्त करायची गरज आहे. त्याशिवाय इथे शिक्षणाबद्दल जागृती निर्माण करणारे कार्यक्रमही हाती घ्यावे लागतील, असं आ. तांबे यांनी या पत्रात म्हटलं आहे.

नंदुरबारच नाही, तर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात निरक्षर जनतेचं प्रमाण एवढं जास्त असणं चांगलं नाही. नंदुरबार माझ्या जवळचा जिल्हा आहे, त्यामुळे माझ्या आपल्या जिल्ह्यात निरक्षरांची संख्या एवढी मोठी असेल, तर खूप काम करायची गरज आहे. त्याची तयारीदेखील आहे. म्हणूनच सर्वात पहिली पायरी म्हणून आम्ही शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेचा विकास करण्यासाठी विशेष योजना आखावी, अशी विनंती केली आहे, असं आ. तांबे यांनी सांगितलं.

नंदुरबारला शिक्षणाचं नंदनवन करू
राज्याच्या उत्तर सीमेवरचा हा जिल्हा अनेकदा दुर्लक्षित राहतो. आतापर्यंत प्रयत्न कमी पडल्याने असेल कदाचित, पण इथे निरक्षरांची संख्या सर्वात जास्त आहे. पण पुढल्या पाच वर्षांच्या काळात नंदुरबारला शिक्षणाचं नंदनवन करण्याचा आमचा प्रयत्न असेल. इथल्या प्रत्येक घरातील मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध असेल. तसंच प्रौढ शिक्षण वर्गांच्या माध्यमातून वयाने मोठ्या विद्यार्थ्यांनाही साक्षर करण्यावर भर दिला जाईल.
– आ. सत्यजीत तांबे.
………………….

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button