Amalner

Amalner: खा शि निवडणूक…खानदेश शिक्षण मंडळातील कलियुग… (भाग-2)

Amalner: खा शि निवडणूक…खानदेश शिक्षण मंडळातील कलियुग…
(भाग-2)

अमळनेर – संयुक्त्ा खान्देशातील नामवंत ओळखली जाणारी शिक्षण संस्था म्हणजे खान्देश शिक्षण मंडळ. सन 1981 च्या आधीची संस्था ही सर्वार्थाने गुणवत्ता, निवड प्रक्रियेत काटेकोर जपली जात होती. अशा या चांगल्या शैक्षणिक संस्थेस अनेक डोमकावळ्याची नजर लागली आणि संस्थेची शैक्षणिक पत खालावली. निवडणूकांसाठी जातीपातीचे राजकारण करून जातीला वेठीस धरून स्वतःचा स्वार्थ साधला गेला. त्यामुळे संस्थेची एकंदरीत नावलौकीकाला मोठ्या प्रमाणावर तडा गेला. फक्त आणि फक्त नोकरभरतीचा रोजगार हमी योजनेवरचं काही संचालकांनी लक्ष केंद्रीत करून चांगल्या शैक्षणिक संस्था रसातळाला नेली. नोकरभरतीचा रोजगार हमी योजनेमध्ये अगोदर छोट्या प्रमाणात भ्रष्टाचार होत होता. परंतु मागील 10 वर्षात भ्रष्टाचाराने अनेक विक्रम मोडले. त्यामुळे संस्थाचालक लखोपती, करोडपती झाले. मागील तीन वर्षात संस्थेत बहुतांश संचालकांची नवे करोडपती म्हणून अमळनेरकरांना ओळख झाली. फक्त आणि फक्त सदासर्वदा पैशांचेच राजकारण करायचेआणि सर्व नितीमूल्ये मातीत घालायची. त्यामुळे संस्थेच्या जागरूक मतदारांमध्ये मोठया प्रमाणात नाराजी पसरलेली आहे. आणि या नाराजीचा फटका विद्यमान काही संचालकांना बसणार आहे. संस्थेचे पूर्वीचे लोकं घरचा पैसा संस्थेत टाकायचे आणि संस्थेचे पावित्र्य जपायचे. मात्र आताचे संचालक संस्थेचा पैसा घरी नेऊन आपआपली घरे-दारे चालवित आहेत. ज्याप्रमाणे एखाद्या कर्जदारांने आपल्या व्यवसायासाठी बँकेचे कर्ज घेतले तर त्या व्यवसायिकाला आपल्या दुकानात त्या बँकेची पाटी लावावी लागते. सदरचे दुकान हे बँकेने दिलेल्या कर्जावर सुरू आहे असा संदेश सर्वत्र जातो. विद्यमान संचालकांनी मागील तीन चार वर्षामध्ये नोकरभरतीच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेत करोडो रूपयाची माया गोळा केली. त्यामुळे लोकांची अशी अपेक्षा आहे की, या संचालकांच्या घरावर एक पाटी लावावी आणि त्या पाटीत लिहावे, की सदरचे घर श्रीमंत प्रतापशेठजी, दानशूर भांडारकर कुटुंब, कै.रावसाहेब बंगाली यांच्या कृपाशिर्वादाने सुरू आहे.
सन 1981 च्या निवडणूकीनंतर निवडून आलेल्या संचालकांनी जातीपातीचे राजकारण सुरू केले. त्यामुळे अमळनेरातील अर्बन बँक, खान्देश शिक्षण मंडळ आणि अमळनेर नगरपालिका यांच्या अधिपत्याखाली आली. अर्बन बँक आज 95 व्या वर्षात पदार्पण झाले परंतु या बँकेची 95 वर्षात एकही शाखा निघाली नाही. अमळनेर नगरपालिकेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष कै.सुरेशशेठ ललवाणी यांनी मोठ्या धाडसाने मुंबईच्या रिर्झव्ह बँकेकडून तीन शाखा मंजूर करून आणल्या होत्या. परंतु काही झारीतल्या शुक्राचार्यांनी या तीनही शाखा सुरू होऊ दिल्या नाहीत. त्यामुळे अर्बन बँकेचे शाखांचे स्वप्न अपूर्णच राहिले. अर्बन बँकेत मोठया प्रमाणावर नको त्या लोकांना लाखों रूपयांचे कर्ज वाटप करून संस्था डबघाईस आणली. सन 1976 च्या अगोदर अमळनेरची अर्बंन बँक खूप नावाजलेली होती. या बँकेच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमास त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.वसंतदादा पाटील हे आलेले होते. त्यावेळी बँकेच्या सर्व सभासदांना स्टीलचे ताट, दोन वाट्या आणि एक ग्लास सुवर्ण महोत्सवाची आठवण म्हणून सप्रेम भेट देण्यात आली होती. त्यानंतर अर्बन बँकेचे अमृत महोत्सवी समारंभात सर्व सभासदांना महालक्ष्मीचे चांदीच्या शिक्के वाटप करण्यात आले होते. त्यावेळी अर्बंन बँक प्रत्येक वर्षी सभासदांना डिव्हीडंट देत होते. परंतु चुकीच्या लोकांच्या हातात अर्बंन बँक गेल्यामुळे आता सभासदांना पांच वर्षात एकदाच डिव्हीडंट मिळतो. काही लोकांनी अर्बंन बँक आणि खान्देश शिक्षण मंडळाचा वापर संस्था काबीज करण्यावर केला. त्यामुळे दोघंही नामांकित संस्था आज आपलं खरं अस्तित्व हरवून बसलेले आहेत.
खान्देश शिक्षण मंडळात पूर्वी दर्जेदार गुणवत्तेने परिपूर्ण प्राध्यापक, शिक्षक होते. ही मंडळी आपल्या विद्यार्थ्यांना आपले पाल्यच समजून शिकवित होते. त्यामुळे संस्थेतील विविध शाळा आणि प्रताप महाविद्यालयाचे निकाल चांगल्या प्रमाणावर लागत होते. पूर्वीच्या चांगल्या संचालकांनी नोकर भरती करतांना कधीच मध्यस्थी केली नाही. नोकर भरतीचे संपूर्ण अधिकार प्राचार्य आणि विविध शाळेतील मुख्याध्यापकांना होते. त्यामुळे शाळेचे शैक्षणिक वातावरण निकोप दर्जांचे होते. प्रताप कॉलेजला प्राचार्य दामले, प्राचार्य कानिटकर, प्राचार्य डॉ. का. झु. लाड, प्राचार्य वसंतराव नेने, प्राचार्य डॉ. अरविंदभाई सराफ , प्राचार्य डॉ. अ. नि. माळी यांच्यासारखे कर्तव्यदक्ष प्राचार्य लाभल्यामुळे कॉलेजच्ाा शैक्षणिक दर्जा खूपच उंचीचा होता. तसेच विविध शाळांमध्ये मुख्याध्यापक के. एन. शेख, पी. जी. कुलकर्णी, बी. टी. बेंद्रे, सौ. भावे मॅडम, के. जी. जोशी सर, इतबारखाँ पठाण, मधुकरराव भावे सर आदि मान्यवरांनी शाळेचा संपूर्ण विकास केला. त्यामुळे विविध शाळांचे 10 वी 12 वींचे निकाल चांगले लागत होते. त्यावेळी शाळा कॉलेजेंसमध्ये संपूर्ण तास घेण्याकडे विशेष कल असायचा. विद्यार्थ्यांकडून अभ्यास कसा करायचा यावर वरील मान्यवरांनी वेळोवेळी उत्कृष्ट मार्गदर्शन केलेले आहे. आमच्या पिढीला शाळा कॉलेजातील त्यावेळेचे शिक्षक आणि प्राध्यापक दिसले की, आम्ही आपोआप नतमस्तक व्हायचो, त्या शिक्षकांमुळेच आमची पिढी आज समाजाच्या विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहे.
मागील काही वर्षात संस्थेत सर्वच कामांसाठी पैसे मोजले जातात, त्यामुळे संस्थेत निकोप शैक्षणिक वातावरण राहिलेले नाही. दररोज दुपारून प्रताप कॉलेजमध्ये शुकशुकाट होवून जातो. काही प्राध्यापक तासावर येतच नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होते. श्रीमंताची मुले खाजगी शिकवणीला जावून आपला अभ्यास कव्हर करतात. मात्र गरीबांची मुले, शेतकऱ्यांची मुले नाईलाजास्तव चांगल्या शिक्षणापासून वंचित राहतात. खेडेगावातून येणारे विद्यार्थी कोणत्या परिस्थितीत कॉलेजला शिकण्यासाठी येतात परंतु पिरेडच होत नसल्यामुळे त्यांना मानसिक आणि शारिरीक त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी संचालक मंडळाने एक ठराव करावा, ज्या प्राध्यापकांनी पिरेड घेतले नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी परंतु शेतच कुंपण खात असल्याने प्राध्यापकांचे निभावून जाते. आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे ते अधिकच बेजबाबदार होतात. त्यासाठी ज्युनियर कॉलेज आणि सिनीयर कॉलेजच्या पाल्य आणि पालकांसोबत पालकमेळावा घेणे हे गरजेचे आहे. नुसत्या मोठया इमारती उभारून शिक्षणाचा दर्जा सुधारला जाणार नाही. त्यासाठी प्रामाणिक संचालक मंडळ निवडून येणे ही काळाची गरज आहे. नाहीतर पुढच्या अनेक पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. संचालक मंडळ प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचा कुठेच ताळमेळ नसतो. फक्त आणि फक्त संचालक मंडळ पैसे कमविण्यासाठी या संस्थेत जाती धर्माच्या नावावर निवडून येतात आणि करोडपती होतात. ह्यांचे सर्व कामांचे रेट ठरलेले असतात. नोकरभरतीच्या व्यतिरिक्त अनेक छोटे मोठे रोजगार हमी योजनेतूनही पैसे कमविले जातात. पूर्वी प्रताप कॉलेजचे शेकडो विद्यार्थी मेडीकल आणि इंजिनियरींगकडे गेलेले आढळतात. परंतु मागील 10 वर्षात प्रताप कॉलेजचा शैक्षणिक दर्जा खालावल्यामुळे चांगले आणि सुज्ञ पालक इ.10 वी नंतर जळगांव, धुळे, नाशिक, पुणे आणि मुंबई येथे आपल्या पाल्यांना शिकण्यासाठी पाठवितात. बाहेरगांवी मुलं शिकत असल्यामुळे पालकांना सात-आठ वर्ष आर्थिकदृष्टया तारेवरील कसरत करावी लागते. ज्या पालकांकडे पैसा नसतो त्यांचीच मुले नाईलाजास्तव प्रताप महाविद्यालयात शिकत आहेत. ही भयानक परिस्थिती पाहता आपलं अमळेनर काही झारीतील शुक्राचार्यांनी कुठे नेऊन ठेवलं ! याबाबतीत गंभीरपणे विचार करण्याची वेळ आलेली आहे.
शैक्षणिक दर्जा सुधारायचा असेल तर चांगले निष्ठावंत निस्वार्थी आणि पैशाची हाव नसलेले संचालक मंडळ निवडून येणे गरजेचे आहे. जर या निवडणूकीत बदल घडवून आला नाही तर ही संस्थाच पुढील 10 वर्षामध्ये विकली गेलेली आपणास पहावयास मिळेल. सबका साथ सबका विकास या दृष्ट प्रवृत्तीने खान्देश शिक्षण मंडळास किमान 50 वर्ष मागे आणलेले आहे. संस्थेत नवीन कोर्सेस येणं बंद झालेलं आहे. जे आहे ते सांभाळण्याची कुवत या संचालक मंडळात नाही. फक्त आणि फक्त माल लगाओ माल मिलेगा या व्यापारी दृष्टीने संस्था वेठीस धरली जात आहे. ज्याप्रमाणे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना बदनाम करून सरदार वल्लभभाई पटेलांचा उदो-उदो करण्याचा काही र्निबुध्द लोकांनी प्रयत्न चालविला आहे. आणि विशेष म्हणजे हा प्रयत्न वरील दोन्ही मान्यवर नेत्यांच्या पश्‍चात होत आहे. सत्य परिस्थिती अशी होती पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल हे राष्ट्रपिता म. गांधीचे लाडके शिष्य होते. त्यामुळे भारतीय जनता नेहरू आणि पटेलांना एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणत असत. त्या धर्तीवर आजच्या सत्त्ााधाऱ्यांनी श्रीमंत प्रताप शेठजीं यांचे महत्व वाढवून दानशूर भांडारकर कुटुंब, कै. रावसाहेब बंगाली यांचे महत्व व योगदान कमी करण्याचा नादान प्रयत्न केलेला आहे. याठिकाणी देखील श्रीमंत प्रताप शेठजी दानशूर भांडारकर कुटुंब, कै. रावसाहेब बंगाली यांचे आपसातील संबंध अतिशय सलोख्याचे, प्रेमाचे आणि वात्सल्याचे होते. या प्रकरणाची सध्या अमळनेरात सर्वत्र चर्चा चाललेली आहे. मागील दोन वर्षापूर्वी विद्यमान संचालकांनी श्रीमंत प्रताप शेठजीं आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांचे पुतळे प्रताप महाविद्यालयाच्या आवारात वाजत गाजत आणले ही बाब संपूर्ण अमळनेरकरांना भूषणावह अशीच होती. कारण की, श्रीमंत प्रताप शेठजींचे संस्थेतील योगदानही मोठे होते. परंतु त्यासोबत गंगाराम सखाराम हायस्कूलमध्ये कै.गंगारामशेठ भांडारकर व द्रौ. रा. कन्या शाळेत श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्रशेठ भांडारकरांचाहि पुतळे उभारावयास पाहिजे होते. पुतळ्याच्या राजकारणातसुध्दा सत्ताधाऱ्यांचा कुटील डाव होता. असो नियती आपले काम चोख बजावित असते. नियतीचे कालचक्र आणि कर्माची चांगली वाईट फळे ज्याला त्याला भोगावीच लागतात. त्याशिवाय कोणाचीही सुटका होत नाही.
आता फक्त श्रीमंत प्रताप शेठजींच्या आणि शेठानींच्या पुतळ्यासमोर नोकरभरतीच्या रोजगार हमी योजनेचे पैशाचे वाटप होण्याचेच बाकी राहीलेले आहे. कदाचित या पुतळ्यांसमोर काही मंडळी रमीचा डाव सुध्दा मांडतील. नको त्या लोकांच्या हातात संस्था गेल्यामुळे आपल्याला ही कठीण परिस्थिती पहावी लागत आहे. त्यामुळे आम्ही खान्देश शिक्षण मंडळाचा पेट्रन, व्हा. पेट्रन आणि फेलोंना अशी कळकळीची विनंती करितो की, आतातरी जागे व्हा आणि चांगले संचालक मंडळ निवडून आणा या वेळेस आपण काही चूक केली तर आपल्याला इतिहासहि माफ करणार नाही आणि पुढील अनेक पिढ्या आपल्याला शिव्या घालतील. आज आपण एक निश्‍चय करू या ! मागील सर्व विसरून श्रीमंत प्रताप शेठजी, दानशूर भांडारकर कुटुंब व कै. रावसाहेब बंगाली यांच्या शैक्षणिक स्मारकास गतवैभव प्राप्त करून देवू त्यासाठी मतदार राजा रात्र वैऱ्यांची आहे जागत रहा, आणि चांगल्या उमेदवारांना मतदान करा.
आम्ही या संस्थेतील शाळा कॉलेजेसमध्ये शिकलेले असल्यामुळे आम्हाला या संस्थेविषयी पराकोटीची आस्था, प्रेम व वात्सल्य आहे. त्यामुळे आम्ही दि.13 फेब्रुवारी 2022 रोजी होणाऱ्या निवडणूकी दरम्यान निर्भिडपणे पांच लेख लिहून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडलेले आहे. आता वेळ कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी मतदारांवर येवून ठेपलेली आहे. आमच्या या लेखांमुळे काही लोकांना त्रास झाला असेल परंतु भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते म्हणून हा लेखन प्रपंच आम्ही चालविला. जय हिंद! जय महाराष्ट्र !!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button