Maharashtra

♥️ बॉयफ्रेंड…..

♥️ बॉयफ्रेंड…..

प्रा जयश्री दाभाडे…

ती सहजच बाहेर पडली.सांजवेळ झालेली होती. घरातील कामांचा रगाडा आवरून थकलेली निवांत क्षण शोधण्यासाठी थोडं फ्रेश व्हावं या उद्देशाने निघालेली..गोरी पान, सुंदर ,शेलाटी सुखी संसाराचे तेज अंगावर असणारी साधारणपणे 40 शी कडे झुकणारी..तिच्या विचारांमध्ये मग्न ..रस्त्याने सहजच फिरावं तसं हळूहळू रमत गमत चाललेली…मावळता सूर्य क्षितिजाकडे झेपावताना विविध रंग झटा बिखरवत जणू धरणीला भेटण्याची उत्सुकता आणि तिच्या बाहू पाशात अडकण्या साठी उतावीळ झालेला…तिची पावले मात्र संथ..हळुवार,मंद गतीने एका विशिष्ट दिशेला पडणारी…स्वतः च्याच धुंदीत,विचारात मग्न असणारी ती…चेहऱ्यावर सोनेरी किरणांची रंगी बेरंगी छटा तिला अधिकच खुलवत होती…आजूबाजूला होणाऱ्या निसर्गाच्या या रंग छटांकडे तिचे मात्र दुर्लक्ष…

अचानक ती अडखळली..पायातील थोडी उंच चप्पल तुटली की काय असा भास व्हावा त्यागत मटकन खाली बसली..विव्हळली..पायाच्या घोट्यात प्रचंड वेदना जाणवल्या..पाय मुरगळला होता…तोच समोरून तो आला थोडा धावतच…तिला मटकन खाली बसताना त्याने पाहिलेलं..त्याने तिचा हात धरून तिला उठवलं…आणि रस्त्याच्या कडेला नेऊन बसवलं…तिला वेदनांमुळे लक्षातच नाही आलं की कोणीतरी आपल्याला आधार देतंय आणि मदत करतंय…

रस्त्याच्या कडेला बसल्यावर त्याने तिच्या मुरगळलेल्या पायावर जवळ असलेल्या थंड पाण्याने शेकण्याचा प्रयत्न केला.. ती अजूनही तिच्याच विचारात मग्न होती की काय तिचं लक्षच नव्हतं…तो मात्र मन लावून तिच्या पायावर उपचार करून त्याची वेदना कमी करण्याचा प्रयत्न करत होता..अचानक तिची तंद्री भंगली आणि तिने मान वर करून त्याच्या कडे पाहिलं…

तो उंच सडपातळ,गहू वर्णीय… वैवाहिक जीवनाचे सुख आणि समाधान चेहरा आणि शरीरावर असलेला …मजबूत अंगकाठी, व्यायाम करून मिळविलेली शरीरयष्टी,कोपऱ्यावर चंदेरी छटा असलेले केस साधारणपणे 60 ते 70 वयोगटातील रेखीव चेहरा असलेला…तिने त्याच्या कडे पाहिलं आणि ती थोडी मागे झाली..एक अनोळखी पुरुष जवळ आला या भावनेने बावरली.. बिचकली आणि शंकेने त्याच्या कडे पाहू लागली…

पायाच्या वेदना कमी झालेल्या पण थोडं दुखणं होतच…तो तिला म्हणाला चला समोर च्या कॉफी शॉप मध्ये कॉफी घेऊ तुम्हाला बरं वाटेल.. तशी ती हळूच हो म्हणाली आणि दोघ कॉफी शॉप मध्ये गेले..जाताना तिला त्याच्या हाताचा सहारा घेऊनच जावे लागले..कॉफी घेतांना त्याने तिला प्राथमिक माहिती विचारली तिने ही आवश्यक तेव्हढी स्वतः बद्दल माहिती दिली… थोड्या वेळाने त्याने तिला तिच्या घरा जवळ सोडले आणि तो गेला…

पाय हळूहळू बरा झाला आणि ती पुन्हा कोणत्या तरी अनामिक ओढीने पुन्हा त्याच रस्त्यावर गेली..तिला कळत नव्हतं आपण का आलो..आजही विचार होतेच..तिला कळतंच नव्हतं ती का एव्हढी विस्कळीत झाली आहे…थोड्या वेळाने पुन्हा तो समोरून आला आणि तिला पाहिल्यावर मना पासून हसत तब्येतीची विचारपूस केली…तीही मन मोकळं हसली…दुसरी भेट…कॉफी शॉप आणि दोंघांच्या गप्पा…

बस ती अचानक पणे मोकळी झालेली तिची तिलाच जाणवली..जणू इतक्या दिवसांपासून मनातला कचरा निघत होता…ती सुरुवातीपासूनच खूप अवखळ,हसरी, मनमोकळी,कलांची आवड असलेली…नाटकांमध्ये अभिनय,वक्तृत्व स्पर्धा गाजवलेली…पण विवाहानंतर एका वेगळ्या च बंधनात अडकलेली…मनात खूप काही साठवून वावरणारी…जबाबदऱ्यांचं ओझं पेलणारी….इच्छा आकांक्षा चा बळी संसार रुपी यज्ञात आहुती देऊन आदर्श पत्नी,आई,सून म्हणून समाजात कठपुतली सारखी मिरविता यावी..तिच्या सुंदरतेच,आदर्श पणाचं ओझच जणू घेऊन फिरणारी…सतत कोणी तरी पाठलाग करत आहे अशी भावना मनात येणारी…

तो तर काय कुटुंबातील प्रमुख सदस्य,कमवता..जबाबदाऱ्या पेलणारे भक्कम हात केंव्हा दगडाचे झाले त्याच त्यालाच कळलं नाही… मुलं सुना पत्नी यांच्या गराड्यात अडकलेला..तरीही मनावर ओझं असणारा.. कुठे तरी काही तरी राहून गेलंय ही भावना मनात सतत टोचणारी… पण सांगता न येणारी..

दोघ भेटू लागली..तीच जागा कॉफी शॉप…एकमेकांशी बोलू लागली… आवड निवड,छंद,अपेक्षा, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन… राजकारण, अर्थकारण, सामाजिक घडामोडी अनेक विषय चर्चेचे…तसं तर काही विषयांशी त्यांचं काही घेणं देणं नाही पण एक चर्चा आणि त्यातून होणारा संवाद अत्यन्त महत्वपूर्ण होता.

खरं तर त्यांच्या नात्याला काही नाव नव्हतं.. परंतु तरीही एकमेकांच्या सान्निध्यात त्यांना जे सुख,आदर,प्रेम,स्नेह लाभत होते ते शब्दांच्या पलीकडचे होते…एक वयस्कर पुरुष आणि एक चाळिशीतील स्त्री यांची ही घट्ट मैत्री….तो पुरुष आणि तिचा मित्र म्हणून बॉयफ्रेंड… खरंच नात्याला काही नाव नसावे…तू ही रे माझा मितवा….

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button