Mumbai

?Breaking.. मराठी माणसाला दुही चा शाप..कर्नाटक भूभाग केंद्रशासित घोषत करा.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मागणी ..

? Breaking.. कर्नाटक भूभाग केंद्रशासित घोषत करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मागणी

मुंबई: मराठी अस्मिता, मराठी शक्ती जोपर्यंत एकवटत नाही, तोपर्यंत कर्नाटक सीमवादाचा प्रश्न सुटणार नाही, असं सांगतानाच कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. महाविकास आघाडी सरकारने कर्नाटक सीमावाद सोडवला नाही तर हा प्रश्न कोणीही सोडवू शकणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
डॉ. दीपक पवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर लिहिलेल्या ‘संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं.
यावेळी त्यांनी ही मागणी केली. कोर्टात एखादं प्रकरण असेल तर त्यानुषंगाने कोणतेही निर्णय घ्यायाचे नसतात. कारण तो कोर्टाचा अवमान समजला जातो. पण कर्नाटक व्याप्त भूभागाचा प्रश्न कोर्टात प्रलंबित असतानाही कर्नाटक सरकारने बेळगावचं नामांतर केलं. बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला आणि विधिमंडळाचं अधिवेसनही घेतलं. कर्नाटकची ही मस्ती जिरवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता हा वादग्रस्त भागच केंद्रशासित करण्याची मागणी केली पाहिजे. कोर्टात ही मागणी करायला हवी, असं मुख्यमंत्री म्हणाले. कर्नाटक सरकार बेलगाम वागत आहे. जोपर्यंत हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. तोपर्यंत हा भूभाग केंद्रशासित झालाच पाहिजे, असं सांगतानाच कर्नाटक व्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही, असंही त्यांनी ठणकावलं.

मराठी माणसाला दुहीचा शाप

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील महाराष्ट्र एकीकरण समिती फुटली कशी? मराठी माणसाला दुहीचा शाप आहे. एकीकरण समिती ही मराठी माणसाच्या एकीची ताकद होती. आपण आपल्या मायबोलीची ताकद उधळून लावली. कशासाठी? तर राजकीय स्वार्थासाठी. या एकीकरण समितीत अपशकून नको म्हणून आम्ही कधी त्यात शिवसेना आणली नाही. ‘मार्मिक’ही आणलं नाही, असं सांगतानाच आता पुन्हा ही ताकद निर्माण करण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.

सरकार कुणाचंही असो मराठी माणसावर अन्याय होतोच

कर्नाटकमधील वादग्रस्त भागाबाबत विचार करताना आपण नेहमीच कायद्याचा विचार करतो. पण कर्नाटक कायद्याचा विचार करत नाही, असं सांगतानाच कर्नाटकात सरकार कुणाचंही असो मराठी माणसावर ते अन्याय करतातच. त्यामुळे कर्नाटकचा भूभाग आपल्याकडे आणण्यासाठी आपण एक दिलाने भिडलो तर हा भाग आपल्याकडेच येईल. पण तोपर्यंत हा भूभाग केंद्रशासित केला पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.

तर हा प्रश्न सुटणार नाही

कर्नाटकबद्दल आपला दुस्वास नाही. त्यांच्याबद्दल आकस नाही. पण त्यांच्याकडून होणाऱ्या अत्याचाराचा निषेध झालाच पाहिजे. मराठी अस्मिता, मराठी शक्ती जोपर्यंत एकत्र येत नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. तसेच या सरकारने हा प्रश्न सोडवला नाही तर कोणतंच सरकार हा प्रश्न सोडवणार नाही. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एका जिद्दीने हा प्रश्न सोडवला पाहिजे. कालबद्ध कार्यक्रम आखून हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे, त्यासाठी सर्वांनी मतभेद गाडून एकत्र या, असं आवाहनही त्यांनी केलं. महाराष्ट्रात प्रत्येकाची चूल वेगळी असून त्यावर कर्नाटक सरकार त्यांची पोळी भाजून घेत आहे, असंही ते म्हणाले.

रडकथा नको

पुस्तक म्हणजे रडकथा नको. तर जिंकण्याच्या दिशेने टाकलेल्या पावलांचा इतिहास पाहिजे, असं सांगतानाच या पुस्तकातून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाची माहिती मिळते. पण ज्यांनी हा संघर्ष अनुभवला. त्यांच्या अंगावर काटा येतो, असं ते म्हणाले.

तिच धग जागवायची आहे
यावेळी त्यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील आठवणींना उजाळा देतानाच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संघर्षाचा इतिहासही विशद केला. मोरारजी देसाई यांच्या ताफ्याने एका फोटोग्राफरला उडवलं. त्यानंतर मुंबई पेटली. त्यातच शिवसेना प्रमुखांना अटक झाली. त्यामुळे मुंबई दहा दिवस धगधगत होती. हीच धग आता आपल्याला पुन्हा जागवायची आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. सीमावादाचा हा निखारा आहे. त्यावर राख साचली आहे. कुणाला तरी ही राख बाजूला करण्यासाठी फुंकर मारावी लागते. ते काम या पुस्तकातून होत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button