Bollywood

Mollywood: का पहावा आणि का पाहू नये झोम्बिवली..!पहा रिव्ह्यू..!

Mollywood: का पहावा आणि का पाहू नये झोम्बिवली..!पहा रिव्ह्यू..!

मुंबई नुकताच 26 जाने रोजी मराठी चित्रपट झोम्बिवली प्रदर्शित झाला. आता मराठीत झोम्बि म्हणजे तस काही नवीन नाही..झॉम्बी हा प्रकार सगळ्यांना च माहीत आहे अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर आपल्याकडे भूतं असतात, हडळ असते, मुंज्या असतो, वेताळ असतो तशी फॉरेनची भुतावळ म्हणजे हे ‘झॉम्बी.’

आफ्रिकेतल्या हैती जमातींमध्ये या ‘झॉम्बीं’च्या कथा सांगितल्या जातात. तिथल्या लोककथांमध्ये याचा उल्लेख आढळतो. थोडक्यात तिथेच या ‘झॉम्बीं’चा जन्म झाला. तिथून मग वेगवेगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून हे भयानक ‘झॉम्बी’ जगभरात पोहोचले. 1932 मध्ये आलेला ‘व्हाईट झॉम्बी’ हा सिनेमा पहिला ‘झॉम्बी’पट मानला जातो. त्यातून पहिल्यांदाच या ‘झॉम्बीं’चं दर्शन जगाला झालं. मात्र अर्थातच त्यातले ‘झॉम्बी’ दिसायला तेवढे भयानक नव्हते. त्यांचं रुप तेवढं विद्रुप नव्हतं. त्यानंतर 1968 चा ‘नाईट ऑफ लिव्हिंग डेड’ हा सिनेमा आला. जो मॉडर्न ‘झॉम्बी’पट मानला जातो. त्यानंतर पॉपस्टार मायकल जॅक्सनने त्याच्या थ्रीलर या म्युझिक व्हिडिओमध्ये ‘झॉम्बीं’चं दर्शन घडवलं. ‘ट्रेन टू बुसान’मुळे तर हे ‘झॉम्बी’ भलतेच लोकप्रिय झाले आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचले. तर तेच ‘झॉम्बी’ आता भारतात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर थेट मुंबईजवळच्या डोंबिवलीत पोहोचले आहेत.
तर हे ‘झॉम्बी’ डोंबिवलीत कसे आले? कशामुळे आले? आणि त्यामुळं नेमकं काय काय घड़लं हे सगळं म्हणजे आदित्य सरपोतदारने दिग्दर्शित केलेला ‘झोंबिवली’ हा सिनेमा.
खरं तर या सिनेमाच्या नावामध्येच ‘झॉम्बी’ असल्यानं सिनेमाच्या पहिल्या फ्रेमपासून आपल्याला भयमिश्रित उत्सुकता असते. थोडक्यात त्या ‘झॉम्बीं’ची आपण वाट पाहात असतो. दिग्दर्शक पण आपली उत्सुकता फार न ताणता थेट विषयावर येतो. आणि ‘झॉम्बीं’चं भयानक दर्शन आपल्याला घडवतो. हे जे सुरुवातीचे सीन आहेत जिथं ‘झॉम्बी’ जन्म घेतोय म्हणजे सर्वसामान्य माणसं ‘झॉम्बी’ बनतायत. ते सीन कमाल शूट केले आहेत. एक एक शॉट अंगावर काटा येईल अशा पद्धतीने टिपला आहे.
कथानक थोडं सुमार असलं तरी तांत्रिकदृष्ट्या हा सिनेमा तगडा आहे. कॅमेरा, एडिटिंग, व्हिएफएक्स हे सगळं उत्तम पद्धतीनं हाताळलं गेलं आहे. सिनेमातल्या कलाकारांची टीमही उत्तम जुळून आली आहे. सुधीर जोशी या नावाचा पात्र कसं असू शकतं ते अमेय वाघला पाहिल्यावर एका नजरेत कळून जातं. म्हणजे तेवढ्या सहजपणे त्याने ती भूमिका पेलली आहे.
ललित प्रभाकरने उत्तम काम केलं आहे. झोपडपट्टीतला बंडखोर दादा, त्याचा अॅटिट्यूड, त्याची भाषा आणि विशेष म्हणजे त्याला मिळालेले संवाद या साऱ्याचंच त्यानं सोनं केलंय.
वैदेही परशुरामी हे नाव सध्या चांगलंच चर्चेत आहे. ‘सिम्बा’मधल्या तिच्या परफॉर्मन्सने तर तिला प्रचंड लोकप्रियता लाभलीय. अर्थात घाणेकर मधल्या तिच्या कामालाही विसरता येणार नाही. तर तीच वैदेही तिची आजवरची जी इमेज सिनेमात दिसली आहे त्याच्या पुढे जाऊन थोडी बोल्ड झाली आहे. अर्थात तिचं हे बोल्डपण दिसतं ते तिच्या संवादात आणि अॅटिट्यूडमध्ये.
हे तिघं या सिनेमात प्रमूख भूमिकेत असले तरी यातली ‘झॉम्बीं’ची जी फौज आहे त्यांना पैकीच्या पैकी मार्क्स द्यायला हवेत. कारण मॉब सीन असूनही त्यातला एकही ‘झॉम्बी’ खोटा वाटत नाही. मेकअप असेल किंवा मग त्यांची देहबोली हे सारंच पाहाणाऱ्याच्या अंगावर काटे यावेत इतपत छान जुळून आलं आहे.
पण शेवटी एखाद्या सिनेमासाठी या सगळ्या बाजू सपोर्टिव्ह म्हणूनच असतात. सिनेमाचा मुख्य डोलारा उभा राहातो तो त्याच्या कथेवर आणि ‘झोंबिवली’च्या बाबतीत नेमकी तिच बाजू कमकुवत आहे.
सिनेमा मग तो कोणताही असो अगदी जग उलथवून टाकणाऱ्या सुपरहिरोंचा असो किंवा मग रोहित शेट्टीचा गाड्या हवेत उडवणारा असो, ती गोष्ट पाहाताना आपल्याला त्या गोष्टी पटल्या पाहिजेत. त्याला भक्कम आधार असायला हवा. इथं नेमक्या त्याच बाबतीत सिनेमा कमी पडतो. ‘झॉम्बीं’चा या सिनेमातला उदय असो किंवा अस्त दोन्ही थोडे सुमारच आहे..असो पण एक वेगळा प्रयोग मराठी चित्रपटाने केला आहे.आणि मराठी चित्रपटाचं रूप पालटत आहे हे ही नसे थोडके..!

चला तर मग निव्वळ मनोरंजन म्हणून वेगळे पण म्हणून ,उत्तम एडिटिंग आणि व्हिएफएक्स साठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिनेमगृहे सुरू आहेत म्हणून हा चित्रपट पहायला काही हरकत नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button