Pune

महिला स्वयंसहायता समूहामुळे स्त्रियांना आत्मनिर्भर होण्यास मदत.-रेश्माताई रेडके

महिला स्वयंसहायता समूहामुळे स्त्रियांना आत्मनिर्भर होण्यास मदत.-रेश्माताई रेडके

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे :महाराष्ट्र राज्य उमेद अभियानांतर्गत इंदापूर तालुक्यातील पडस्थळ येथे 14 महिला स्वयंसहायता समूहाची स्थापना करण्यात आली. यासाठी पंचायत समितीच्या समन्वयक राणी ननवरे व समाधान भोरखडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. पडस्थळ गावामध्ये महिला स्वयंसहायता समूहाची स्थापना व्हावी यासाठी वर्धा जिल्ह्यातील वनमाला कोहळे, रजनी बगाडे, नीतू पाठक व वैशाली येलोरे या वर्धिनीताईंनी ६ दिवस गावामध्ये फिरून स्वयंसहायता समूहाबद्दल माहिती देऊन जनजागृती केली.

काल नव्याने स्थापन झालेल्या 14 स्वयंसहायता समूहाची (बचत गटांची)एकत्रित बैठक ग्रामपंचायत पडस्थळ येथे संपन्न झाली. यावेळी सखी महिला स्वयंसहायता समूहाच्या अध्यक्षा रेश्माताई रेडके म्हणाल्या की महिला स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून आम्ही 165 महिला एकत्र जोडल्या गेलो आहोत. यामुळे महिलांना आर्थिक स्रोत उपलब्ध होणार असून प्रत्येक स्त्री स्वतःचा उद्योग उभारू शकते.यासाठी तिला बँकेमार्फत, ग्रामसंघामार्फत व स्वयंसहायता समूहामार्फत आर्थिक भांडवल मिळू शकते. आणखीन महिलांनी या अभियानात समाविष्ट होऊन योजनेचा फायदा घ्यावा. पुढे जाऊन आम्ही ग्राम संघाची स्थापना करणार आहोत व ग्रामसंघामार्फत आर्थिक उद्दिष्ट साध्य करणार आहोत. दर पंधरा दिवसांनी समूहाची बैठक घेतली जाणार आहे व त्यामधून महिलांच्या अडचणी दूर केल्या जाणार आहेत.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तालुका समन्वयक राणी ननवरे व प्रभाग समन्वयक समाधान बोरखडे यांनी सर्वांना सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी सरपंच वैशाली मारकड, उपसरपंच सपना बोंगाणे, महेंद्र रेडके, ग्रामसेवक महेश यादव, ग्रामपंचायत सदस्या विद्या बोंगाणे, प्रियंका गव्हाणे, रेश्मा रेडके व गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनमाला कोहळे यांनी केले तर वर्षा मुसळे यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button