Maharashtra

नाशिक मध्ये सार्वजनिक गणेश मंडळांच्या बैठकीत निर्णय, शहरात यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने होणार साजरा..

नाशिक मध्ये सार्वजनिक गणेश मंडळांच्या बैठकीत निर्णय, शहरात यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने होणार साजरा..

नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी आणि वरीष्ठ पोलीस अधिकारी यांची बैठक पोलीस आयुक्तालयात झाली, त्याबैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीस पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील,महानगर गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, राष्ट्रवादीचे मनपा गटनेते गजानन शेलार, माजी महापौर विनायक पांडे , प्रथमेश गिते, शंकरराव बर्वे, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, परिमंडळ-१चे पोलीस उपायुक्त अमोल तांबे, मुख्यालयाच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले , परिमंडळ-२ चे पोलिस उपायुक्त विजय खरात आदींसह इतर वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोविड-१९ विषाणुच्या पार्श्वभूमीवर शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे गणेशोत्सव मित्र मंडळांनी जास्तीत जास्त तीन फुटांच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा करून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. यावर्षी गणेशोत्सवादरम्यान गणेशमुर्ती प्रतिष्ठापणा मिरवणुक, विसर्जन मिरवणुक निघणार नाही, तसेच गणेशोत्सवा दरम्यान कोणत्याही प्रकारे डिजे , लाउडस्पिकर यांचा वापर केला जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला.
नाशिक शहर हे आरोग्याच्या दृष्टीने सर्वोत्तम शहर असून गणेशोत्सव मंडळांतर्फे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणे, कोणत्याही प्रतिष्ठापणा व विसर्जन मिरवणुका न काढणे, कोणत्याही प्रकारे डिजे, लाउडस्पिकरचा वापर न करण्याचा घेतलेला निर्णय हा अतिशय चांगला व स्वागतार्ह आहे. गणेशोत्सव महामंडळांनी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चांगला कृती आराखडा तसेच आचारसंहीता तयार करुन नाशिक शहराचा आदर्श संपुर्ण महाराष्ट्रात घालून दयावा, तसेच महाराष्ट्र शासन निर्णयांच्या अधीन राहुन गणेशोत्सव शांतता व सुव्यवस्था ठेवून पार पाडण्याचे आवाहन पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी नाशिकरांना केले आहे.शहरातील गणेशोत्सव मित्रमंडळांनी लॉकडाऊनच्या कालावधीत गोरगरीबांना अन्नधान्य, मास्क वाटप , औषधोपचार आदि सेवा पुरविल्या असून गणेशोत्सवा दरम्यान रक्तदान शिबीरे, आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करुन लोकांमध्ये जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच मंडळ सभासदांच्या पैशातुन मुख्यमंत्री सहायता निधीला मदत केली जाणार आहे. या निर्णयाव्यतिरीक्त शासनाने ठरवून दिलेले निर्णय मान्य करुन आपल्या निर्णयात सर्व पदाधिकारी बदल करतील असे मंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांनी महानगर गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने कळविले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button