Delhi

आदिवासींच्या विविध मागण्यांबाबत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या शिष्टमंडळाने महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतली भेट

आदिवासींच्या विविध मागण्यांबाबत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या शिष्टमंडळाने महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतली भेट

नाशिक । सुशिल कुवर

देशातील विविध राज्यामधील आदिवासी समाजाच्या समस्या सोडवण्याचे साकडे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार सोमाभाई डामोर, राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा केंद्रीय पोलाद व ग्रामविकास राज्यमंत्री फगन सिंह कुलस्ते, शंकरराव बोडात, कार्याध्यक्ष माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड, संयुक्त सचिव माजी शिक्षण मंत्री गीताश्री उरांव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राष्ट्रपती भवनात महामहिम द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या शिष्टमंडळाने द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि राष्ट्रपती म्हणून देशाचे सर्वोच्च पद भूषवणारी आदिवासी समाजातील पहिली महिला म्हणून तिचे अभिनंदन केले.

चर्चेदरम्यान आदिवासींची स्वतंत्र जनगणना करून आदिवासी धर्मकोड लागू करावा. प्रत्येक राज्यात आदिवासींचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे, भारतीय सैन्य दलामध्ये आदिवासी बटालियन तुकडी स्थापन करावी आदी मागण्या शिष्टमंडळाने केल्या.

दरम्यान महाराष्ट्रातील अनुसूचित क्षेत्रातील सर्व विभागातील पेसा पदभरती करण्यात यावी. कसारा घाटाला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे, तर इगतपुरी तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील भावली धरणाला आदिवासी क्रांतिकारक राया ठाकर यांचे नाव द्यावे. आदी मांगण्याचे निवेदन महामहिम द्रौपदी मुर्मू यांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी दिले. यावेळी राष्ट्रीय युवा अध्यक्ष जितेंद्र मोघे, रामसाहेब चव्हाण, गणेश गवळी, सोमनाथ खोटरे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रात पाचवी अनुसूचीची अंमलबजावणी करावी, जयंपालसिंह मुंडा यांचा इतिहास सर्व विद्यापीठांमधील अभ्यासक्रमात शामिल करावा, आदिवासी क्षेत्रातील बेकायदेशीर जमिनीचे हस्तांतर थांबवावे, महाराष्ट्रातील आदिवासींची 2017 ची रखडलेली विशेष पदभरतीची अंमलबजावणी करावी, गायरान व वनजमिनी आदिवासींच्या नावावर कराव्या, आदिवासी कलाकारांना मासिक मानधन मिळावे, आदिवासींचे धर्मांतर रोखण्यासाठी सक्षम कायदे बनवणे अशा विविध मांगण्या मांडण्यात आल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button