कोळी महासंघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग सावंतराव यांची मागणी
शासनाने गरिबांचा विचार करून लॉकडाऊन रद्द करावा
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूरमध्ये जुलै महिन्याच्या सुरवातीला कोरोनाच्या रुग्णात झपाट्याने वाढ होत होती.त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी व कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउनची आवश्यकता होती. तसेच त्यावेळी प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्याची मागणी कोळी महासंघाच्या वतीने आम्ही केली होती. मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे पंढरपुरमध्ये आज कोरोना रुग्णांची संख्या पाचशेपेक्षा अधिक झाली आहे.प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष न करता हा विषय त्यावेळी गंभीरपणे घेतला असता तर पंढरीतील लोकांवर अशी परिस्थिती ओढवली नसती.त्यानंतर आता लोकांनी आपली मानसिकता बदलत भीतीच्या सावटाखाली आपले उद्योग गेल्या महिनाभरात सुरू केले आहेत.लोकांनी कोरोनासोबत जगायला सुरुवात केली आहे.गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कोरोनामुळे झालेल्या उपासमारीवर उपाय म्हणून आता कुठे आपले उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केलेला असताना काही राजकिय पुढाऱ्यांच्या दबावाखाली ७ ऑगस्ट पासून पंढरपूर लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे.यामुळे अगोदरच संकटात सापडलेल्या गोरगरीब कष्टकरी लोकांच्या वर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याने शासनाने आपल्या मागणीचा पुनर्विचार करून आपला निर्णय मागे घ्यावा व गोरगरीब जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी कोळी महासंघाचे पंढरपूर तालुका अध्यक्ष पांडूरंग सावतराव यांनी केली आहे.






