Usmanabad

?️ धुमशान ग्रामपंचायतीचं.. तर तुमचा उमेदवारी अर्ज रद्द होऊ शकतो!

?️ धुमशान ग्रामपंचायतीचं… तर तुमचा उमेदवारी अर्ज रद्द होऊ शकतो!

सलमान मुल्ला उस्मानाबाद

उस्मानाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना जात पडताळणी प्रमाणपत्र किंवा त्यासाठी ऑनलाईन अर्ज केल्याची प्रत जोडणे अनिवार्य आहे.

जात पडताळणीच्या ऑनलाइन अर्जाची प्रत दाखल न केल्यास उमेदवारी अर्ज रद्द होऊ शकतो.

डिसेंबर 2020 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील 428 तर कळंब तालुक्यातील 59 ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

जात प्रमाणपत्राची पडताळणी करुन जात वैधता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया एक ऑगस्ट 2020 पासून पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. या प्रक्रियेमध्ये अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज भरणे, अर्जात परिपूर्ण माहिती भरणे, त्याचे शुल्क ऑनलाईन भरणे, आवश्यक ते दस्तऐवज स्कॅन करुन अपलोड करणे आणि अर्ज ऑनलाईन सबमिट करावयाचा आहे. त्यानंतर अर्जाची हार्डकॉपी काढून पूर्वीच्या पद्धतीप्रमाणेच या समितीच्या कार्यालयात हजर राहून अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.

महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी निवडणुकीचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारवेत, ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारु नयेत, असे स्पष्ट कळविण्यात आले आहे. तथापि काही अर्जदार पूर्वीप्रमाणेच हस्तलिखीत पद्धतीने जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सादर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे हस्तलिखीत अर्ज समितीस स्वीकारता येणार नाहीत. त्यामुळे या समितीचे अधिकारी-कर्मचारी व अर्जदार यांचेमध्ये वाद उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीशी संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर केले जातील याची खबरदारी घ्यावी.

निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या कोणत्याही उमेदवारास जात वैधता प्रमाणपत्राचा अर्ज सादर केला नाही म्हणून निवडणुकीपासून वंचित रहावे लागणार नाही, याबाबत हे निर्देश देण्यात आल्याची माहिती कळंबचे तहसीलदार मंजुषा लटपटे यांनी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button