India

आरोग्याचा मुलमंत्र..रात्रीचे घोरणे थांबवा काही सोप्या उपयांसोबत

आरोग्याचा मुलमंत्र..रात्रीचे घोरणे थांबवा काही सोप्या उपयांसोबत

अनेकांना झोपेत घोरण्याची सवय असते. झोपेत अशा घोरणाऱ्यांना आपण घोरतोय हे ठाऊकही नसते. झोपेत घोरण्याच्या या सवयीमुळे अनेक शारीरिक व्याधी निर्माण होऊ शकतात. निद्राश्वसनरोध म्हणजेच ‘स्लीप अपनिया’ वेळीच ओळखायला हवा.
कुंभकर्णाची झोप ही गाढ व सुखी झोपेचा सर्वसाधारण मापदंड मानली जाते. म्हणूनच एखाद्या गाढ झोपणाऱ्या व्यक्तीला आपण कुंभकर्णासारखा झोपतो, असं सर्रास म्हणतो. अनेकदा अशा दीर्घकाळ झोपणाऱ्या व्यक्ती झोपेत घोरतही असतात. या घोरण्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, या घोरण्याच्या विकाराकडे वेळीच लक्ष द्यायला हवे. कारण, त्यामुळे निर्माण होणारे आजार हे आयुष्य व्यापणारे, शारीर समस्यांना आमंत्रण देणारे असतात. त्यामुळे उच्चरक्तदाब, हृदयविकार, श्वसनरोध, पक्षाघात अशा अनेक व्याधी येऊ शकतात.
अनेकदा गाढ झोपेतील व्यक्तीला त्याच्या घोरण्याविषयी अथवा श्वास रोखला जाण्याची जाणीव नसते. मात्र, असे हे घोरणे त्यांच्या श्वसनमार्गावर ताण निर्माण करणारे असते. त्यामुळे, शरीराला प्राणवायूचा पुरवठा कमी होतो आणि हृदयाच्या कामावरही त्याचा प्रभाव पडतो. अनेकदा, त्यामुळे दिवसा दम लागणे, झोप पूर्ण होऊनही ती पूर्ण न झाल्यासारखे वाटणे, रक्तदाब वाढणे अशा अनेक समस्या येतात. त्यामुळे स्लीप अपनिया म्हणजेच झोपेतील निद्राश्वसनरोधा विषयी दक्ष असणे अधिक गरजेचे आहे.

१) वाफ घ्या
त्वचेची काळजी घेण्यासाठी अथवा सर्दीपासून आराम मिळण्यासाठी तुम्ही बऱ्याचदा स्टीम म्हणजे वाफ घेतली असेल. सध्या कोरोना संक्रमण टाळण्यासाठी प्रत्येकाच्या घरी स्टीम घेण्याचे साहित्य असतेच. सर्दी खोकल्यावरील घरगुती उपाय म्हणून हा उत्तम पर्याय आहे. घोरणे बंद करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे झोपण्यापूर्वी वाफ घेणे. वाफ घेतल्यामुळे तुमचा श्वसनमार्ग मोकळा होतो. श्वसनमार्गात कफामुळे निर्माण झालेला अडथळा वाफ घेण्या मुळे कमी होतो. त्याचा चांगला परिणाम तुमच्या घशा आणि नाकाच्या कार्यावर होतो आणि तुमचे झोपेत घोरणे बंद होते.

२) तूप
नाक चोंदण्यामुळे झोपेत तुम्ही नाकावाटे श्वास घेण्याऐवजी तोंडावाटे श्वास घेता आणि सोडता. ज्यामुळे तुमच्या नाक आणि तोंडातून घोरण्याचा आवाज येऊ लागता. हा घोरण्याचा त्रास कमी करण्यासाठी सोपा उपाय म्हणजे नाकात तूप सोडणे. यासाठी रात्री झोपताना नाकपुड्यांमध्ये शुद्ध तूपाचे काही थेंब सोडा. नियमित नाकपुड्यांमध्ये साजूक तूप सोडल्यामुळे हळूहळू तुमचा घोरण्याचा त्रास कमी होऊ लागेल. तूप खाणे आरोग्यासाठी हितकारक आहेच शिवाय तुपाचा असा औषधाप्रमाणेही वापर करता येतो. यासाठी तूप खाण्याचे फायदे अवश्य जाणून घ्या.

३) निलगिरी तेल
जर तुम्हाला सतत सर्दीचा त्रास होत असेल आणि त्यामुळे तुम्ही घोरत असाल. तर झोपेत घोरणे बंद करण्यासाठी उपाय करून तुम्ही तुमची सर्दी आणि घोरण्याचा त्रास दोन्ही बरी करू शकता. निलगिरीचे तेल उग्रवासाचे आणि निर्जंतूक करणारे असते. ज्यामुळे तुमचे सर्दीचे इनफेक्शन लवकर बरे होते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात निलगिरीचे काही थेंब टाका आणि या पाण्याची वाफ घ्या. वाफ चेहऱ्यावर घेतल्यामुळे तुमचा श्वसनमार्ग मोकळा होईल आणि तुम्हाला शांत झोप लागेल. श्वसनमार्ग मोकळा झाल्यामुळे तुम्हाला घोरण्याची समस्याही कमी होईल.

४) पुदिना तेल
पुदिन्याचे फायदे आपल्यापैकी बरेच जणांना माहीत असतीलच. पुदिना तेलाचे काही थेंब कोमट पाण्यात टाका आणि त्या पाण्याने गुळण्या करा. सकाळी आणि रात्री या पाण्याने गुळण्या केल्यामुळे तुमचा घोरण्याचा त्रास कमी होऊ शकतो. कारण जर तुमच्या श्वसनमार्गाला सूज आल्यामुळे तुम्ही घोरत असाल तर या उपायाने ती सूज कमी होऊ शकते. सूज कमी झाल्यामुळे तुमचा श्वसनमार्ग मोकळा होईल आणि तुमचा घोरण्याचा त्रासही कमी होईल. घरच्या घरी घोरणे बंद करण्याचा उपाय करण्यासाठी ही एक सोपी युक्ती आहे.

हे उपाय करून देखील त्रास होतच असेल तर जवळील डॉक्टरांना त्वरित भेटा.

डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
( होमिओपॅथिक तज्ञ )

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button