India

Dilache Talk..! सण.. ती..आणि पाळी…

Dilache Talk..!सण.. ती..आणि पाळी…

लवकरच श्रावण महिना सुरू आहे. करोनानंतर दोन वर्षांनी थाटामाटात, वाजत गाजत सर्व सण साजरे केले जात आहेत.असं म्हणतात आला पोळा आणि सण झाले गोळा…दोन वर्षांच्या प्रदीर्घ गॅप नंतर सर्वच सण उत्सव अत्यन्त धुमधाम आणि उत्साहात साजरे केले जात आहेत. म्हणून सर्वजण अगदी तहान-भूक विसरून त्याची तयारी करत आहेत. मुंबई पुण्या सारख्या मोठ्या शहरांपासून ते छोट्या छोट्या गावांमध्ये सर्व सण साजरे केले जात आहे. सर्व भावंड मिळून घरातल्या सर्व सणांची तयारी करतात आणि अचानक तिच्या म्हणजे घरातील मुलगी किंवा स्त्रीच्या पोटात दुखायला लागत.
आणि तिला मासिक पाळी आलेली असते.… हो ‘ती’च जी दर महिन्याला प्रत्येक मुलीला किंवा स्त्रीला येते. पाळी आली म्हटल्यावर मग सर्वांचा चेहरा उतरला…उगाच गणपतीच्या काळात झाली म्हणून सर्वच गोंधळ झाला. शिवाशिव झाली, एकतर घरं लहान त्यात हे सर्व पाळणं कठीणच..!

सणाच्या दिवशी मासिक पाळीला इतकं महत्त्व का?

आपल्याकडे भारतात सण वार उत्सव या दरम्यान पाळी येणं म्हणजे त्या बाईने प्रचंड मोठा गुन्हा केला आहे. असा समज..सण आणि पाळी यांचं एकदम वितुष्ट..!अजिबात चालत नाही सण वारात पाळी येणं..!अनेक ठिकाणी पाळी पुढे करण्यासाठी किंवा लवकर येण्यासाठी दहा दिवस आधी खजूर, काळीमिरीचं पाणी यासारख्या गोष्टी खायला दिल्या जातात.गोळ्या दिल्या जातात..!देव जाणो कधी येणार तिला पाळी… ती पण मोकळी झाली असती तर बरं झालं असतं. तिची तारीख नेमकी २ सप्टेंबर आहे, आता जर त्या दिवशी तिला पाळी आली तर मामाकडे पाठवावं लागेल. काय करणार… आपल्याकडे पर्याय नाही. म्हणूनच तिला लवकर पाळी यावी अन् ती मोकळी व्हावी असं वाटतं.

सणवारात मासिक पाळी इतकी महत्त्वाची असते का? सणाच्या दिवशी मासिक पाळीला इतकं महत्त्व का दिलं जातं? ती आली नाही तरी दहावेळा घरातील मोठ्या स्त्रिया विचारतात आणि आता तिची ठरलेली वेळ पुढे ढकलण्यासाठी नको नको ते प्रयोग करत असतात.
एका लहान नुकतीच पाळी आलेल्या मुलीला हा प्रश्न पडला की देवानेच स्त्रियांना मासिक पाळी दिली. ती आवडो किंवा न आवडो याचा विचार देवाने कोणत्याच बाईबद्दल केला नाही. तिला भविष्यात काही त्रास होईल का याचंही कधी काहीच वाटलं नाही. पण मग मासिक पाळी आल्यानंतर मंदिरात जायचं नाही, दिवाबत्ती करायची नाही, देवाच्या पाया पडायचं नाही, कोणतंही चांगलं काम करायचं नाही, हे सर्व कशासाठी आणि का? याचे परिणाम माझ्यासारख्या मुलींना सहन करावे लागतात. कदाचित तू कधी या गोष्टी सांगितल्याही नसशील पण २१ व्या शतकात वावरणारी स्त्रीही या गोष्टी अगदी कटाक्षाने पाळते.

विसरलात..!मासिक पाळीच्या चक्रामुळेच तर आपला जन्म झालाय!

मासिक पाळी असताना मंदिरात गेलं की देव श्राप देतो, तुम्हाला पाप लागतं असं खूप काही बोललं जातं. पण तेच एखादी महिला गर्भवती असताना तिला ९ महिने पाळी येत नाही, तेव्हा का बोललं जात नाही? मासिक पाळी दरम्यान स्त्री अशुद्ध असते, पण मग त्याच पाळीमुळे जन्माला येणारं बाळ हे शुद्ध कसं काय? मासिक पाळीदरम्यान तिला हात लावायचा नाही, तिच्या सावलीपाशीही जायचं नाही अशा विचारसरणीची माणसं आजही आपल्या जगात आहेत. पण त्या सर्वांना माझा एकच प्रश्न जर ‘ती’ची मासिक पाळी अशुद्ध असेल तर मग तुमच्या -माझ्या शुद्धतेचं काय ‘ती’च्या गर्भातून आणि मासिक पाळीच्या चक्रामुळेच तर आपला जन्म झालाय!

गणेशोत्सव, दिवाळी, दसरा, नवरात्रोत्सव किंवा इतर कोणताही सण असू दे तिच्या मासिक पाळीबद्दल चर्चा करण्यापेक्षा या जुनाट आणि त्रासदायक रूढींना कसा आळा बसेल, याचा आपण विचार करायला नको का? विनाकारण, पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेऊ नका, असं आवाहन स्त्रीरोगतज्ज्ञ करतील का? कदाचित त्यांनी सांगितल्यावर लोकांना पटेल… किंवा शाळांमध्ये लैंगिक शिक्षणाच्या तासाला शिक्षक मुलामुलींबरोबर या विषयावर चर्चा करू शकतील का?
सण आणि परंपरेपेक्षा त्या बाईचा जीव महत्त्वाचा आहे. एखाद्या मासिक पाळी आलेल्या महिलेला आधीच भयंकर मनस्ताप होत असतो, त्यात या अनिष्ट रुढी परंपरेने आपण त्यात भर घालतो. त्यापेक्षा कधीतरी तिची त्या काळात विचारपूस करा. पाप- पुण्य या संकल्पना किती मानायच्या किंवा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण असेलच त्यावर विश्वास तर पाळी आलेल्या महिलेला काय हवंय, काय नको ते विचारा, यामुळे तिच्या चेहऱ्यावर उमटणारी समाधानाची रेषा तुम्हाला ते खूप काही सांगून जाईल!
तुम्ही ज्या देवतेची भक्ती करता त्याच्यापायी हा तुमचा भाव नक्की पोहोचेल.

मासिकपाळीच्या काळातही तुम्ही सगळं घरातल्यांसकट सगळं घर सांभाळता, हॉर्मोंसच्या बदलामुळे होणारे मूड स्विंग साम्भाळत डोक शांत ठेवून सगळे व्यवहार करू बघता, पोटात दुखत असतानाही घरात आवरा आवर करता, पाय भरून आलेले असूनही घर ते नोकरी पायपीट करता, प्रवास करता, डोकं जड होत असूनही मुलांचा अभ्यास घेता, स्वत:च्या पोटात त्रास होत असूनही सगळ्यांसाठी जेवण करता, कपडे धुता, भांडी घासता…

एवढ्या सगळ्या दिव्यातून जावूनही तुमच्या मनात सणवार करता येतील का नाही ही चिंता लागून रहात असेल तर ती न समजण्याइतपत परमेश्वर रुक्ष असेल का?

आणि त्याला जर वरील गोष्टी समजतच नसतील तर तो पूजा करण्यायोग्य खरेच मानावा का?

गदिमा म्हणतात…

देव मूर्तीत ना मावे, तीथर्क्षेत्रात ना गावे
देव आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे
तुझ्या माझ्या जड देही देव भरुनिया राही
देव देव्हार्यात नाही, देव नाही देवालयी

म्हणजे मासिकपाळीमुळे जर का शरीर विटाळत असेल तर जो देव तुमच्या मनात तो ही विटाळेल. म्हणजे त्या चार दिवसात देव्हार्‍याकडे न जाणे टाळता येईल पण मनात वसलेल्याचं काय करावं?

पण जर तो आपल्या आत आहे, तर या सगळ्या त्रासाला तोंड देवून आपण केलेली धडपड तो रोजच बघत आलाय एवढी वर्ष त्याबद्दल त्याला कौतूक नसेल का? मग अशावेळी समजा एखाद्या वर्षी त्याच दिवसात एखादा सण आल्यास तुम्ही देव्हार्‍याजवळ गेल्यामुळे तो कसा कोपेल?

मग जर का आपल्या आत वसलेल्या देवाला जर ते समजत असेल तर आपल्या समोर त्याचं प्रतीक म्हणून ठेवलेल्या मूर्तीतूनही तोच बघतोय आपल्याकडे मग त्याला हरकत का असेल?

परमेश्वर सर्व ज्ञानी आहे असं आपण मानतो. म्हणजे पाळी पुढे ढकलण्यासाठी घेतलेल्या गोळ्यान्नी कसे शरीरात बदल होतात, कसे त्याचे साईड एफ्फेक्ट होतात हे त्याला समजणार नाही का? मग हे समजूनही केवळ ‘परंपरा’ म्हणून सणवार करताना पाळी नसावी या अपेक्षेने तुम्ही तुमच्या शरीराला गोळ्या घेवून अधीकच्या त्रासात घातलेलं त्याला चालेल का?

चालणार असेल, किंवा त्याची तीच अपेक्षा असेल तर खरच तो पूजनीय असेल का? आपण तापाने फणफणलेलो असतानाही आई – वडीलान्ना नमस्कार करायला वाकायला जावू तर ‘आधी आंघोळ करून ये’ असे ते आपल्याला सांगतील का?

त्यामुळे मनातील सर्व शंका दूर करा. कुठलाही देव कुठलाच नियम सांगत नाही. देवांची नावंही आपणच ठरवली, त्यांच्या मूर्त्यांचे आकारही आपणच ठरवलेत, त्यांचे सणवारही आपणच ठरवलेत, त्यान्ना पूजण्याचे नियमही आपणच ठरवलेत. पण या सगळ्या गोष्टी प्रत्येक जात – धर्म – देश – पंथ – कूळ या प्रमाणे कमी अधीक पद्धतीत बदलत जातात.

पण या सगळ्या पलीकडे न बदलणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे एका सर्वोच्च शक्तीसमोर मान झुकवून त्यांचा उत्सव साजरा करण्याची भावना. मग ती कधी रमझानसाठी असते, कधी ख्रिसमससाठी तर कधी पाडव्यासाठी. नावं, पद्धती, प्रथा बदलतील. बदलणार नाही ती त्यामागील भावना.

सध्या दुर्दैवाने बाकी सगळ्या गोष्टी योग्य असतात, ती एक भावना सोडून. तुमच्यात ती भावना जिवंत आहे अद्याप यात सर्व काही आलं. त्यामुळे इतर कोणत्याही गोष्टीचा विचार न करता नि:शंक मनाने तुमचे सण आनंदाने साजरे करा. तुमचा हेतू, भावना शुद्ध असेल तर केवळ मासीकपाळीत सणवार केले म्हणून कुठलही पातक तुमच्या हातून घडलेलं नाही.

काही महिलांशी बोलणं झालं नाव न सांगण्याच्या लिहिण्याच्या अटीवर..

– हो गोळी घ्यावीच लागते..!सण त्यातल्या त्यात पोळ्या नंतर येणाऱ्या सर्व सणांमध्ये बाधा नको म्हणून गोळी घ्यावी लागते.

– मला दोन मुलं आहेत. सासूबाई देवाचं खूप करतात. घरात दुसरी कोणी सवाष्ण बाई नसल्याने घरात पूजाअर्चा असेल तर कल्याणीलाच सगळी कामं करावी लागतात. अशात तिची पाळी आली तर मग कठीणचं.अशावेळी पाळी आली तर तिच्या घरच्यांची चिडचिड होते खूप टोमणे ऐकावे लागतात.

– सणवार काय कमी असतात का या सिझनमध्ये. माझ्या घरच्यांचं सोवळं-ओवळं कडक आहे. बरं, ज्यांच्या घरी मी काम करते त्या बायकाही विचारतात, गौरी-गणपतीच्या काळात पाळी तर नाही ना? – कामवाली ताई…

ऑगस्ट महिन्यापासून सणांचा सिझन सुरू होतो. फुलं, पूजेचं साहित्य, सत्यनारायणाच्या पोथ्या, धूप-अगरबत्ती आणि मिठाई यांच्याबरोबरच आणखी एका गोष्टीची मागणी खूप वाढते, ती म्हणजे पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या.

कारण एकच, सणावाराच्या काळात घरात ‘विटाळ’ नको. भारतासारख्या देशात अजूनही मासिक पाळीबद्दल खुलेपणाने बोललं जात नाही.

मासिक पाळीच्या काळात महिलांवर अनेक बंधनं असतात. अनेक राज्यांमध्ये अजूनही पाळीच्या काळात महिलांना घराबाहेर वेगळं बसावं लागतं, थंडी-वाऱ्यात गोठ्यात झोपावं लागतं. अशात धार्मिक कार्यांमध्ये सहभागाची तर बातच नको.

पण धार्मिक कार्यांची, सणावारांची सगळी जबाबदारी तर घरातल्या बायकांवरच असते. अशात त्यांची पाळी आली तर मग ढीगभर कामांची उस्तवार कोण करणार? ती उस्तवार करण्यासाठी बाई ‘मोकळी’ राहावी म्हणून विज्ञान आहे ना मदतीला.

सणावारात, पूजेअर्चेत पाळीचं ‘विघ्न’ नको म्हणून महिला या गोळ्या सर्रास आणि सतत घेतात.

आमच्याकडे या गोळ्या घेण्यासाठी येताना महिला कोणत्याही डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन आणत नाहीत. सहसा त्यांनी डॉक्टरला काही विचारलेलं नसतं. त्यांच्या घरी काही कार्य असलं की, त्या गोळ्या घेतात. सहसा तीन गोळ्या पुरतात, पण आजकाल बायका सहा-सात गोळ्याही घेऊन जातात एका वेळेस..

गणपती-महालक्ष्म्यांच्या काळात या गोळ्यांची मागणी प्रचंड वाढते. बायका खास करून याच काळात या गोळ्या घेतात. दिवसाला कमीत कमी 10-15 स्ट्रीप्स जातात..एक मेडीकल दुकानदार..
या गोळ्यांचे काही साईड इफेक्ट?
स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. मनीषा अहिर म्हणतात, “या गोळ्या स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर रेकमेंड करत नाहीत. त्या पुढे सांगतात, “इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टोरॉन असे दोन हार्मोन्स स्त्रियांच्या शरीरात असतात, त्यावर पाळीचं चक्र आधारित असतं. पाळी उशिरा यावी म्हणून या हार्मोन्सच्याच गोळ्या घ्याव्या लागतात. एका परीने या गोळ्या हार्मोन्सच्या चक्रावर परिणाम करतात.नैसर्गिकरित्या चाललेलं पाळीचं चक्र पुढेमागे केल्याचे अनेक वाईट परिणामही होऊ शकतात.

या हार्मोन्सचं सातत्यानं अतिसेवन केलं तर ब्रेन स्ट्रोक, पॅरालिसिस, फिट येणं अशा केसेस आम्हाला पाहायला मिळतात. पाळी लांबवण्यासाठी बायका दहा-पंधरा दिवस या गोळ्या घेत राहतात. त्याही हाय डोसमध्ये. त्याचे परिणाम फार घातक असतात.

या गोळ्या कोणी घेऊ नयेत?

डॉ. अहिर म्हणतात बायका कोणत्याही डॉक्टरला गोळ्या घेण्याआधी विचारत नाहीत. या गोळ्या मेडिकल स्टोअरमध्ये सहज मिळतात. बायका त्यांच्या मनाने त्या गोळ्या घेतच राहतात.कोणत्याही गोळ्या देण्याआधी पेशंटची हिस्ट्री महत्त्वाची असते. बाईला जर व्हर्टिगोचा, मायग्रेनचा त्रास असेल, आधी कधी स्ट्रोक येऊन गेला असेल, हाय किंवा लो ब्लडप्रेशर असेल, तिचं वजन जास्त असेल तर या गोळ्यांचा त्या बाईला जास्त त्रास होऊ शकतो.

महिला खेळाडू गोळ्या घेतात का..?

स्पर्धांदरम्यान अनेक महिला खेळाडू पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेतात. त्यांना याचा त्रास होत नाही का? याबद्दल बोलताना डॉ. अहिर सांगतात, खेळाडूंची गोष्ट वेगळी असते. त्यांचं डाएट चांगलं असतं, त्यांचं शरीर सशक्त असतं, व्यायाम होत असतो, त्यामुळे त्यांच्यावर या गोळ्यांचे साईड इफेक्ट होण्याची शक्यता कमी असते.

या खेळाडू काही पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या वारंवार घेतातच असंही नाही. पण धार्मिक कारणांसाठी पाळी पुढे ढकलणाऱ्या महिलांचं प्रमाण प्रचंड आहे आणि त्या या गोळ्या सतत घेत असतात.”

पाळीत महिलांना घराबाहेर बसवण्याचे प्रकार किमान शहरी भागात कमी झाले असले तरी धार्मिक कार्यांमध्ये पाळी सुरू असताना महिलांनी सहभागी होणं अजूनही निषिद्धच आहे. त्यामुळेच अनेक महिला या गोळ्यांचा वापर करताना दिसतात.

“देव असं म्हणत नाही की पाळीत माझी पूजा करू नका किंवा धार्मिक कार्य करू नका. त्यामुळे चुकीच्या समजुतींमुळे आरोग्याशी खेळू नका,” असं डॉ.अहिर सांगतात.

असं धर्मशास्त्रात सांगितलेलं नाही

मासिक पाळीच्या काळात महिलांनी धार्मिक कार्य करू नयेत असं कुठल्याही धर्मशास्त्रात सांगितलेलं नाही, असं प्रतिपादन केलं आहे पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी.पूर्वीच्या काळी महिलांना आराम मिळावा आणि स्वच्छता पाळली जावी म्हणून महिलांना बाजूला बसायची पद्धत होती. पण आता त्याची गरज नाही.

महिला जर गोळ्या घेऊन पाळी लांबवत असतील तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. एक लक्षात घ्यायला हवं की, देव रागवत नाही, शासन करत नाही, तो क्षमाशील आहे. त्यामुळे देव कोपेल असं सांगत धर्ममार्तंड जी भीती लोकांना घालतात, त्या भीतीपोटी लोकांनी, विशेषतः महिलांनी त्यांच्या आरोग्याचं नुकसान करू नये,” असंही ते पुढे सांगतात.

या गोळ्यांचे साईड इफेक्ट होतातच फक्त जुनाट, कुप्रथांसाठी महिला त्यांच्या आरोग्याला असणारा संभाव्य धोका पत्करणार आहेत का हा प्रश्न आहेच.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button