इंदापूर

ऊस तोड मजूरांची कमी उपलब्धता, घटलेला साखर उतारा

ऊस तोड मजूरांची कमी उपलब्धता, घटलेला साखर उतारा

दत्ता पारेकर

इंदापूर : ऊस तोड मजूरांची कमी उपलब्धता, घटलेला साखर उतारा यामुळे यावर्षीचा गळीत हंगाम साखर कारखान्यांसाठी जिकीरीचा बनला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १६ साखर कारखान्यांनी २२ लाख ७३ हजार टन उसाचे गाळप करून २२लाख १२ हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. साखरेचा उताराही गतवर्षीपेक्षा ०.६६ टक्क्यांनी घटला असून दैनंदिन गाळपही १० हजार टनांनी घटलेले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंतच्या काळात सर्वाधिक २ लाख ५५ हजार टन उसाचे गाळप बारामती अॅग्रो कारखान्याने केले आहे. त्याखालोखाल दौंड शुगर (२ लाख ३८ हजार ९५५ टन), विघ्नहर (२ लाख १३ हजार ९९० टन) अशी क्रमवारी आहे. सध्या जिल्ह्यात सोमेश्वर कारखान्याचा सर्वाधिक म्हणजे सरासरी १०.७० टक्के साखर उतारा आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन सरासरी ३६ दिवस पूर्ण झालेले आहेत. यावर्षी थंडी म्हणावी तशी अजूनही पडलेली नाही, सतत बदलणाऱ्या हवामानामुळे साखरेचा उतारा वाढलेला नाही. मागील वर्षी २५ डिसेंबरपर्यंतच्या काळात जिल्ह्यातील सरासरी साखर उतारा हा १०.७४ टक्के होता, तो आजमितीस अवघा १०.०८ टक्के एवढाच आहे. थोडक्यात एक टन ऊस गाळल्यानंतर मागील वर्षी याच दिवशी १०७.४ किलो साखर मिळत होती, ती आता १००.८ किलो एवढीच मिळत आहे, त्यावरून हा फटका लक्षात येऊ शकतो. थंडी वाढल्यास साखर उताऱ्यात वाढ होऊ शकते, मात्र सध्या तरी घटलेला साखर उतारा हा कारखान्यांना प्रतिटन उसामागे सरासरी ७ किलो साखरेचा म्हणजे प्रतिकिलो ३० रुपयांनुसार २१० रुपयांचा फटकाच बसलेला आहे.
यावर्षी बहुतेक सर्वच कारखान्यांनी नोंदवलेल्या व करार पूर्ण केलेल्या ऊस तोडणी यंत्रणेपैकी पूर्ण यंत्रणा कारखान्यांपर्यंत पोचली नाही. बीड, नगर, उस्मानाबाद जिल्ह्यात दिर्घकाळापर्यंत चाललेल्या पावसामुळे तेथे पाणी पुरेसे उपलब्ध झालेले आहे व इकडेही दुष्काळामुळे गळीत हंगाम तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ चालणार नाही हे जाणून मजूरांनी एवढ्या कमी कालावधीत मुकादमांकडून उचल घेतल्यास किंवा बैलजोडी खरेदी केल्यास फिटणार नाही हा आडाखा बांधून हंगामातून माघार घेतली, त्याचा फटका कारखान्यांना बसला आहे. सरासरी ३० टक्क्यांपर्यंत मजूर कमी आल्याने जिल्ह्यातील दैनंदिन गाळपही गतवर्षीच्या तुलनेत १० हजार टनांनी कमी झालेले आहे. मागील वर्षी याच दिवशी जिल्ह्यातील सर्व कारखान्यांचे दैनंदिन गाळप ७८ हजार टनांवर होते, ते आजच्या दिवशी ६७ हजार टनांपर्यंत घटले आहे. एकूणच ही आकडेवारी यंदा जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा उत्पादन खर्च वाढविणारी अशीच ठरणार असल्याचे संकेत दिसत आहेत.

प्रशांत काटे, अध्यक्ष, छत्रपती साखर कारखाना भवानीनगर – यावर्षी ऊस तोड यंत्रणा कमी आल्याने गाळप कमी होत असून त्याचा परिणाम प्रक्रिया खर्चाच्या वाढीत झाला असून उसाच्या गाळपावरही त्याचा परिणाम होताना दिसत आहे. `छत्रपती`च्या दोन कारखान्यांऐवजी एकच कारखाना यावर्षी चालू ठेवावा लागला.
सुखदेव सानप, मुकादम भवानीनगर व सचिव राज्य ऊस तोडणी कामगार महामंडळ – यावर्षी सरासरी ३० टक्के मजूर आलेले नाहीत. गावाकडे पाऊस चांगला झाला, त्यामुळे तेथील पिके घेण्यात त्यांनी रस दाखवला. हंगाम जास्त काळ चालणार नाही ही त्यांना भीती होती.
मगनदास यादव, ऊस तोड मजूर, पाटोदा (बीड)- यावर्षी उचल फिटणार नाही अशी भीती आहे. ऊसच तेवढा नाही. त्यामुळे अर्धाच सिझन होईल. त्यामुळे गावातूनही नेहमी येणारे मजूर आले नाहीत.
पांडूरंग रायते, जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना – मजूर कमी आले ही काही कारणे नाहीत. शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर तुटण्यासाठी कारखान्यांनी यंत्रणा उभी करणे जरूरीचे आहे.
आकडेवारी
जिल्ह्यात आजअखेर उसाचे गाळप – २२.७३ लाख टन
मागील वर्षी याच दिवसापर्यंत उसाचे गाळप होते -४०.१७ लाख टन
जिल्ह्यात आजचा सरासरी साखर उतारा – १०.०८ टक्के
जिल्ह्यातील आजचे साखर उत्पादन (क्विंटलमध्ये)- २२.१२ लाख क्विंटल.
जिल्ह्यात मागील वर्षीचा आजचा सरासरी साखर उतारा होता – १०.७४ टक्के
जिल्ह्यातील मागील वर्षी याच दिवसापर्यंतचे साखर उत्पादन- ४२.२९ लाख क्विंटल

Leave a Reply

Back to top button