Ausa

ज्वारी काढणीस मजूर मिळेना… शेतकऱ्यांची होतेय दैना..

ज्वारी काढणीस मजूर मिळेना… शेतकऱ्यांची होतेय दैना..

तपसे चिंचोली परिसरातील चित्र….शेतकऱ्यांची होतेय धावपळ

औसा प्रतिनिधी:- प्रशांत नेटके

औसा तालुक्यातील अनेक गावांत रब्बी हंगामातील ज्वारी काढणीस सुरुवात झाली असून हे काम करण्याकरीता मजूर उपलब्ध होत नाहीत.अनेक गावांत मजुरटंचाई ची समस्या भेडसावत आहेत.मजुरांच्या टंचाईमुळे शेतकरी मजुरांचा शोध घेतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे वाढीव मजुरी देत शेतकरी ज्वारीची काढणी करत आहेत. लष्करी अळीचे आक्रमण,ढगाळ वातावरण यांचा ज्वारीच्या पिकावर विपरीत परिणाम झाल्याने उत्पादनात घट आली आहे. सध्या ज्वारीच्या काढणीला सुरूवात झाली, असून उत्पादनात झालेली घट व मजुरांचे गगनाला भिडलेले दर यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जास्त दराने रोजंदारी देऊनही मजूर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आल्याचे चित्र दिसून येत आहे.

शेतकऱ्यांना उत्पादनात घट होण्याची भीती

_”वारंवार होणाऱ्या हवामानातील बदलाचा ज्वारी पिकाला फटका बसला आहे.पावसाच्या लांबणीमुळे ज्वारी पेरणीस उशिर झाला त्यातच ज्वारीची उंची मोठ्या प्रमाणावर वाढली परंतु बहुतांश ठिकाणी कणसामध्ये दाणेच भरले नाहीत. रोगट वातावरणामुळे ज्वारी पिकांवर चिकटा पडल्यामुळे ज्वारी काळी पडली आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांतुन वर्तवली जात आहे._”

ज्वारी काढणीस मजूर मिळेना... शेतकऱ्यांची होतेय दैना..

हस्त नक्षत्रात रब्बी ज्वारीची पेरणी झाल्यानंतर परतीच्या चांगल्या पावसाने ज्वारी पीक चांगले आले.त्यातच मध्यंतरीच्या काळात हवामानातील बदलामुळे ज्वारी पिकांवर कीड अळीचा प्रादुर्भाव झालेला आढळून आला त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या शिताफीने फवारणी करून ज्वारीचे पीक चांगले टिकवण्यासाठी प्रयत्न केले. रब्बी हंगामातील पेरलेल्या ज्वारीचे पीक काही शेतकऱ्यांनी मोडून पुन्हा एकदा ज्वारीची दुबार पेरणी केली होती. पण सुरुवातीला हस्त नक्षत्रामधील ज्वारी तशीच ठेवलेली होती ती ज्वारी काढणीस गेल्या चार दिवसांपासून सुरुवात झाली आहे. ज्वारी पिकावरती चिकटा व किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आणि ज्वारीची पिकाची उंची भरपूर वाढल्याने ती काढण्यासाठी शेतकऱ्यांना कठीण होत आहे. त्यामुळे मजूर या कामासाठी टाळाटाळ करत आहे.थोडेफार जो मजूरवर्ग येत आहे तो जास्त रोजगार मागत आहे.
काही मजूर रोजगाराऐवजी ज्वारी काढणीस तीन ते चार हजार रुपये एकरने गुत्ते घेत आहेत.परतीच्या पावसाने सोयाबीन पीकाला पाणी लागण्याने सोयाबीन उत्पादनात प्रचंड घट दिसून आली.दमदार पावसामुळे ज्वारीच्या भरपूर प्रमाणात पेरण्या झाल्यामुळे ज्वारी क्षेत्रात वाढ झालेली आहे.त्यामुळे मजुरांची टंचाई जाणवू लागली आहे व रोजंदारी वाढली आहे.

मजुरी व उत्पन्न काढणीस येणारा खर्च याचा विचार केला असता ज्वारीचे उत्पन्न परवडत नाही; परंतु उन्हाळ्यात जनावरांना चारा ज्वारीच्या कडब्यापासून मिळत असल्यामुळे व वर्षभर भाकरी लागत असल्याने शेतकरी ज्वारी पीक घेत आहेत. ज्वारी काढणीस मजूर आपल्या शेतात यावेत म्हणून शेतकरी सकाळ – संध्याकाळ मजुरांच्या घराकडे हेलपाटे मारत असल्याचे दिसून येत आहेत.शेतकरी मजूर वर्गांना खुश ठेवण्यासाठी जास्तीचा रोजगार देऊन खुश करत आहेत.सध्या पती-पत्नी जोडीस पाचशे रुपये रोजगार दिला जातो.तसेच मजुरांना शेतात ये – जा करण्यासाठी वाहनांची सोय करावी लागते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button