Akkalkot

श्री वटवृक्ष स्वामी महाराज पुण्यतिथी महोत्सवातील सर्व धार्मिक कार्यक्रमांना स्थगिती :- चेअरमन महेश इंगळे

श्री वटवृक्ष स्वामी महाराज पुण्यतिथी महोत्सवातील सर्व धार्मिक कार्यक्रमांना स्थगिती :- चेअरमन महेश इंगळे

कोरोना – लॉकडाऊनच्या पाश्वभूमीवर मंदिर समितीचा निर्णय

प्रतिनिधी कृष्णा यादव,

अक्कलकोट,दि.18 , :– श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने साजरा करण्यात येणारा श्री स्वामी समर्थ महाराजांचा १४२ वा पुण्यतिथी उत्सव यंदा सोमवार दिनांक २० एप्रिल २०२० रोजी आहे. कोरोना विषाणू संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासन आदेशाचे पालन करीत लॉकडाऊनमुळे दिनांक १७ मार्च २०२० पासून मंदिर बंद केले असल्याने श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवात मंदिर समितीच्या वतीने साजरे होणारे प्रभात फेरी, धर्मसंकीर्तन, पारायण सोहळा, सनई वादन, वीणा सप्ताह, भजनसेवा, प्रसाद वाटप, पालखी मिरवणूक, गोपाळकाला इत्यादी सर्व धार्मिक कार्यक्रमांना यंदा स्थगिती देण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली.

स्वामी पुण्यतिथी दिनी पहाटे ५ वाजता पुरोहितांच्या हस्ते काकड आरती होईल. देवस्थानच्या वतीने महेश इंगळे यांच्या हस्ते श्रींना पारंपारिक लघुरुद्र सकाळी ६ वाजता करण्यात येईल. सकाळी ११:३० वाजता अक्कलकोट राजघराण्याच्या वतीने श्रीमंत युवराज मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले यांच्या हस्ते श्रींना महानैवेद्य अर्पण करण्यात येईल. या प्रसंगी कोणत्याही भाविकांचा यावेळी सहभाग असणार नाही. स्वामी पुण्यतिथी निमित्त सालाबादप्रमाणे वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने संपन्न होणारा पालखी सोहळा यंदा रद्द करण्यात आले आहे. अशा पद्धतीने कोरोना विषाणू संसर्गाच्या पाश्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने यंदा श्री स्वामी समर्थांचा १४२ वा पुण्यतिथी महोत्सव साजरा होणार आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्याकरिता प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेत अखिल स्वामी भक्तांनी आपल्या घरीच राहून पारायण, नामजप, नामस्मरण करून कोरोना मुळे मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करावा. संपूर्ण सृष्टीवरील मानवी जीवनावर बळावलेल्या या कोरोना नामक संकटातून श्री स्वामी समर्थ आपणा सर्वाना नक्कीच तारून नेतील, त्यामुळे कोणीही स्वामींच्या दर्शनाकरिता मंदिराकडे न येता सर्व स्वामी भक्तांनी आपल्या घरीच यंदा स्वामींचा पुण्यतिथी उत्सव साजरा करावा असेही आवाहनात्मक स्पष्टीकरण महेश इंगळे यांनी यावेळी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button