Akkalkot

पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमास अक्कलकोट मध्ये चांगला प्रतिसाद ..पाचशे गणपती दान

पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमास अक्कलकोट मध्ये चांगला प्रतिसाद

■पाचशे गणपती दान

नगर परिषद, रोटरी आणि बसवेश्वर साहित्य परिषदेचा पुढाकार

प्रतिनिधी कृष्णा यादव

अक्कलकोट दि,0१- नगर परिषद अक्कलकोट, रोटरी क्लब आणि महात्मा बसवेश्वर साहित्य परिषद, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपुरक गणेश विसर्जन, निर्माल्य दान अभियानास अक्कलकोट मध्ये चांगला प्रतिसाद मिळाला.
नगरपालिका आणि साहित्य परिषदेने स्वामींनाथ हरवाळकर यांच्या पुढाकाराने गेल्या पाच वर्षांपासून हे विधायक उपक्रम राबवित आहेत,यंदाच्या वर्षांपासून रोटरी क्लब यांचीही मदत घेण्यात आली.संकलीत बाप्पाचे कृत्रिम जलकुंडात विसर्जन करण्यात आले.या अभियानाचा समारोप अक्कलकोटच्या तहसीलदार अंजली मरोड यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा शोभा खेडगी या होत्या.

या वेळी बोलताना तहसीलदार मरोड म्हणाल्या पुढच्या पिढीसाठी पाणी आणि निसर्ग वाचवायचे असल्यास या अभियानाचे चळवळीत रूपांतर झाले पाहिजे. शहरालगतच्या विहिरी, तलाव प्रदूषित होऊ नये यासाठी ही पुरोगामी चळवळ अक्कलकोटकरांचा उत्सव साजरा करण्याची पद्धत बनावी यासाठी ही चळवळ असल्याचे रोटरीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार जाजू आणि सचिव अँड सुनिल बोराळकर यांनी सांगितले.
कोल्हापूर,सांगली या सारख्या जिल्ह्यात ही योजना शंभर टक्के यशस्वी ठरत आहे. सोलापूर जिल्ह्यात या बाबत खूप अंधश्रद्धा असल्याचे स्वामींनाथ हरवाळकर यांनी सांगितले. यंदा कोरोना महामारीमुळे कमी प्रमाणात गणेश प्रतिष्ठापना झाल्याचे मूर्तिकारांनी सांगितले. कार्यक्रमास डॉ. अशोक राठोड, प्रभारी मुख्याधिकारी संजय राऊत, नगरसेवक अशपाक बलोर्गी, बसलिंगप्पा खेडगी आदि मान्यवर उपस्थित होते.

गणेशमूर्ती संकलनासाठी फिरत्या पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. भक्तांनी आपल्या घरातून गणेशमूर्ती,निर्माल्य सामाजिक अंतर ठेवून जमा केली. यासाठी मंगरुळे चौक, एसटी स्टँड, कारंजा चौक, अन्नछत्र मंडळ चौक येथे फिरते वाहन उभे करण्यात आले होते. यासाठी देविदास कौटगी, चनप्पा हुली, देवा ढाले आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. सर्व गणेश भक्तांनी या पुरोगामी उपक्रमात सहभागी करण्यासाठी नगरसेवक बसलिंगप्पा खेडगी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. नवव्या, दहाव्या आणि अकराव्या दिवशी घरगुती आणि मोठ्या मंडळांनी आपल्या गणेशमूर्ती दान दिल्या. यासाठी नगरपालिकेचे अभियंता भागवत संगोलकर, मलिक बागवान, नवनाथ शिंदे, विठ्ठल तेली, मल्लिनाथ स्वामी, सुरज राऊत, नितीश सोनवणे या अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

ज्योतिषी प्रा.संतोष अगरखेड यांनी सूत्रसंचालन केले तर प्रसाद काळे यांनी गणेश आरती आणि मंत्रपठण केले.
——-

फोटोओळ :
श्री गणेशाची आरती करताना तहसीलदार अंजली मरोड, नगराध्यक्षा खेडगी, मुत्तु खेडगी, अशपाक बळोर्गी आणि इतर दिसत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button