Ahamdanagar

?Breaking.. अगा हे पुन्हा घडलं? राष्ट्रवादी फोडून भाजपचा मध्यरात्री शपथविधी, सकाळी उलटला डाव!

?Breaking.. अगा हे पुन्हा घडलं? राष्ट्रवादी फोडून भाजपचा मध्यरात्री शपथविधी, सकाळी उलटला डाव!

अहमदनगर : गेल्या वर्षी महाराष्ट्रातील राजकारणात नाट्यमय पहाट उगवली होती. त्यावेळी सकाळीच गणिते बदलल्याचे महाराष्ट्राने पाहिलं होतं. भाजपने राष्ट्रवादीच्या आमदारांना फोडून सत्ता स्थापन केली होती. राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं होतं. परंतु राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तो डाव उलटवून भाजपला तोंडघशी पाडलं होतं. त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली. पक्ष तोच, घटनाक्रमही तसाच. शपथविधीची पद्धतही त्याच स्टाईलची. परंतु त्यातील पात्र मात्र वेगळी होती. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात लोणी हवेलीत हा प्रकार घडला. सरपंचपदाच्या निवडणुकीत घडलेली घटना सोशल मीडियातील व्हिडिओमुळे चर्चेचा विषय ठरलीय.

बिनविरोधचा प्रस्ताव धुडकावला होता

लोणी हवेलीसह सर्व तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी आवाहन करीत प्रयत्न केले होते. काही गावांनी त्यांच्या या आवाहनाला प्रतिसादही दिला. मात्र, लोणी हवेतील भाजप नेत्यांनी बिनविरोधचा प्रस्ताव धुडकावला. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, शत्रुघ्न नवघणे यांनी पॅनेल उभे केले होते. ही निवडणूक राष्ट्रवादीनेही प्रतिष्ठेची केली होती.
निवडणुकीत राष्ट्रवादीचे अशोक दुधाडे, जान्हवी कोल्हे, शिवाजी थोरे, सीमा कोल्हे, अमोल दुधाडे विजयी झाले. भाजपकडून शत्रुघ्न नवघणे, संजीवनी दुधाडे यांच्यासह चारजण निवडून आले होते. पाच विरूद्ध चार असे बलाबल झाले होते. राष्ट्रवादीच्या एका सदस्याला त्यांनी उपसरपंचपद देऊ करीत त्याला आपल्या बाजूने केले.

महादेव मंदिरात शपथ

तो सदस्य दुसऱ्या दिवशी फुटून जाईल, या भीतीने त्याला धार्मिक बंधनात अडकवण्यात आले. महादेवाच्या मंदिरात नेऊन तिथे शपथ देण्यात आली. सरपंच आणि उपसरपंचपदाचे तिथेच ठरलं. याची कानोकान कोणाला खबर नव्हती. मात्र, या अनोख्या राजकीय शपथविधीचा कोणीतरी व्हिडिओ बनिवला. त्यात हे सदस्य पूजा करताना दिसत आहेत. एकजूट राहण्याविषयी तसेच गावातील मतदानाविषयी चर्चा करताना त्या व्हिडिओत दिसत आहेत.

सकाळी पुढे आला शपथविधीचा व्हिडिओ

सकाळी उठल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कानाला कोणी तरी लागले. त्यांनी घटनेचा व्हिडिओच त्यांच्या पुढ्यात ठेवला. मग ते खडबडून जागे झाले. ते फुटलेल्या सदस्याच्या घरी गेले. त्यांनी त्याची समजूत घातली. त्याने पुन्हा सोबत राहण्याचे वचन दिले.

भाजपचे औट घटकेचे सरपंचपद

ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सरपंच निवडीचा कार्यक्रम ठरविला. त्यात भाजपच्या नेत्यांनी सरपंच व उपसरपंचपदासाठी अर्ज दाखल केले. परंतु राष्टवादीने पाच विरूद्ध चार अशी ही निवडणूक जिंकली. राष्ट्रवादीच्या जान्हवी दुधाडे सरपंच तर अमोल दुधाडे उपसरपंच झाले. त्यामुळे रात्रीच्या शपथविधी सोहळ्यातील सरपंचपद औटघटकेचे ठरले. त्यामुळे पुन्हा पहाटेच्या शपथविधी सोहळ्याच्या आठवणी ताज्या झाल्या. जिल्ह्यात या घटनेची चर्चा चवीने चर्चिली जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button