Jamner

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळवून देणार : ना. पाटील ! पालकमंत्र्यांची थेट बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना दिला धीर; तात्काळ मदतीची ग्वाही

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळवून देणार : ना. पाटील ! पालकमंत्र्यांची थेट बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना दिला धीर; तात्काळ मदतीची ग्वाही

कमलेश पाटील जामनेर

जामनेर : आम्हाला जेव्हा निवडणुका लढायच्या तेव्हा पक्षीय विचार करू, मात्र शेतकरी हितासाठी आम्ही सर्व एकत्र आहोत. याच एकोप्याच्या भावनेतून जामनेर तालुक्यात नुकसान झालेले शेतकरी आणि नागरिकांना तात्काळी भरपाई मिळणार असल्याची ग्वाही आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. तीन दिवसांपूर्वी झालेली अतिवृष्टी आणि चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करतांना ते बोलत होते.*

जामनेर तालुक्यात तीन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी आणि चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे मुंबईत असल्याने त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आधीच निर्देश दिलेले आहेत. तर जिल्ह्यात आल्यानंतर पालकमंत्र्यांनी आज जामनेर तालुक्यातील ओझर बु. व ओझर, हिंगणे न.क.; तोंडापूर येथे नुकसानग्रस्तांची भेट घेतली. त्यांनी नुकसान झालेल्या नागरी भागाची पाहणी करून आपत्तीग्रस्तांना धीर देत राज्य शासन त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. तर नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या थेट बांधावर जाऊन त्यांनी शेतकर्‍यांच्या व्यथा जाऊन घेत तात्काळ मदतीचे आश्‍वासन दिले.

याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलतांना ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जामनेर तालुक्यात अतिवृष्टी आणि चक्रीवादळामुळे सुमारे चार हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाल्याचा अंदाज असून सुमारे तीनशे पेक्षा जास्त घरांची पत्रे उडाली आहे. या आपत्तीत केळी, मका, कपाशी आदी पिके उध्वस्त झालेली आहेत. या हानीची पाहणी करण्यासाठी आज आम्ही सर्वपक्षीय नेते तालुक्यातील आपत्तीग्रस्तांची भेट घेत आहोत. निसर्गाच्या या प्रकोपानंतर आम्ही प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश केलेले आहेत. मुक्ताईनगर, सावदा, रावेर आदी परिसरातील झालेल्या नुकसानीच्या भरपाईचे पैसे आता सरकारकडून देण्यात आलेले आहेत. याच धर्तीवर चाळीसगाव आणि जामनेर तालुक्यातील आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मी या संदर्भात मुद्दा उपस्थित केला. यावर मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी जिल्हाधिकार्‍यांना तात्काळ मदतीचे अधिकार असल्याचे नमूद करत त्यांना याबाबत निर्देश दिले आहेत.

*दरम्यान, या पाहणी दौर्‍यात पालकमंत्री हे भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्यासोबत पाहणी करत असल्याबद्दल विचारणा केली असता, ना. पाटील म्हणाले की, शिष्टाचारानुसार पालकमंत्री जेव्हा नुकसानीची पाहणी करतात, तेव्हा त्या तालुक्याचे आमदार आणि सर्व पक्षाच्या पदाधिकार्‍यांना सोबत घेतात. आम्ही गेल्या आठवड्यात याच प्रकारे चाळीसगाव तालुक्यात पाहणी केली होती. याच प्रकारे सर्व पक्षाच्या नेत्यांसोबत जामनेरात पाहणी करत आहोत. कोण कोणत्या पक्षाचा हा मुद्दा गौण आहे. निवडणूक लढवायची तेव्हा आम्ही पक्षाचा विचार करू. मात्र शेतकरी हितासाठी आम्ही एकत्र आहोत. या एकजुटीने आम्ही आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत मिळवून देणार असल्याची ग्वाही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली.*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button