Satara

? गृह राज्यमंत्राच्या जिल्ह्यातच कायदा, सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर

गृह राज्यमंत्राच्या जिल्ह्यातच कायदा, सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर

सातारा – सातारा जिल्ह्यात आठवडाभरात कराड व सातारा येथे खुनाच्या चार घटना घडल्या. या घटनांमुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण आहे. खुद्द गृह राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात कायदा व सुव्यस्थेची लक्‍तरे वेशीवर टांगली गेल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी पोलिसांनी व राजकीय नेत्यांनी इच्छाशक्‍ती दाखवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सातारा आणि कराड येथे एकाच दिवशी, म्हणजे मंगळवारी (दि. 15) दोघांचे खून करण्यात आले. कराड येथे भाजी मंडई परिसरात तर सातारा शहरात समर्थ मंदिर परिसरात एकाचा खून करण्यात आला. त्या आधी कराडमध्ये बारा डबरी परिसरात खुनाची घटना घडली होती.

या खुनाच्या घटनांमधील रक्‍ताचे डाग ताजे असतानाच साताऱ्यात पॉवर हाऊस परिसरात एकाचा काल (दि. 18) रात्री खून केल्याची घटना घडली.
या चारही गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी संशयितांना अटक केली असली तरी कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्‍न केवळ गुन्हेगारांच्या अटकेमुळे सुटणारा नाही. संशयितांना अटक करून पोलिसांच्या दप्तराचे ओझे हलके होईल; पण भयभीत झालेले जिल्हावासीय भयमुक्त कसे होतील? अशा घटना घडल्या की, पोलिसांना दोष दिला जातो; परंतु या चारही घटनांमध्ये पोलिसांना थेट दोष देता येत नाही. असे असले तरी त्यांना ‘क्‍लीन चिट’ देणे चुकीचे ठरेल.

जिल्ह्यातील अनेक दादा, भाईंनी सध्या कोणत्या न कोणत्या राजकीय पक्षाचा आश्रय मिळवून ‘व्हाइट कॉलर’ होण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु त्या आडून त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
नेतेमंडळींही अशांना अभय देत असल्याने या गुंडांचे धाडस वाढतच आहे. पोलीस, गुन्हेगार, राजकारण यांच्यातील पाठशिवणीच्या खेळात सामान्यांच्या जिवाला घोर लागत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आणि राजकीय दबाव झुगारून देण्याचे धाडस केले पाहिजे. नेतेमंडळींनीही गुन्हेगारांना आश्रय न देता त्यांना आवर घालण्याची इच्छाशक्‍ती दाखवावी लागेल. तसे न झाल्यास सामान्य जनतेतून उद्रेक होऊ शकतो.

बिट मार्शल गतिमान करण्याची गरज

तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यात बिट मार्शल सुरू केले होते. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याला दुचाकी वाहने देण्यात आली होती. काही काळ सुरू असलेले हे बिट मार्शल सध्या थंडावल्याचे दिसत आहेत.
ग्रामीण भागात तर या गाड्या इतर कामांसाठी वापरल्या जात आहेत तर काही गाड्या दुरुस्तीसाठी साताऱ्यातील एका गॅरेजमध्ये पडून आहेत. बन्सल यांनी या गाड्यांचा उपयोग करण्याचा आदेश दिल्यास पोलिसांची गस्त वाढेल. त्यातून गुन्ह्यांना आळा घालण्यास मदत होईल.

अधिकाऱ्यांनी आळस झटकण्याची गरज

सातारा पोलीस चांगले काम करत असले तरी, केवळ गुन्हे घडल्यानंतर ‘डिटेक्‍शन’करून चालणार नाही. पोलिसांचा समाजात वावर असला पाहिजे, खबऱ्यांचे जाळे विस्तारायला हवे. त्यामुळे अनेक गुन्हे रोखणे शक्‍य होईल. पोलीस अधिकाऱ्यांनीही आळस झटकून कामाला लागले पाहिजे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button