Nandurbar

? महत्वाचे…लक्षात घ्या आपली जबाबदारी-भाग 4

लक्षात घ्या आपली जबाबदारी-भाग 4

फहिम शेख

कोरोनाच्या संसर्गाची शक्यता घराबाहेर पडल्यावर अधिक असते. ‘मिशन बिगीन अगेन’ ची प्रक्रीया सुरू झाल्यावर संसर्गाचे प्रमाणही वाढले आहे. अर्थव्यवस्थेला आणि नागरिकांचे व्यवहार पूर्ववत करण्यासाठी ‘अनलॉक’ची प्रक्रीया पुढे नेणे आवश्यक असल्याने वारंवार निर्बंध घालणे योग्य ठरणार नाही. अशावेळी नागरिकांची स्वयंशिस्त या लढ्यात महत्वाची ठरणार आहे.

बाजारात होणारी गर्दी आणि प्रवासात मुलभूत सुचनांचे पालन न केल्याने आपण स्वत:सोबत इतरांनाही संकटाकडे नेत आहोत. त्यामुळे कोरोना आपल्या व इतरांच्याही घरापर्यंत पोहोचतो आहे. त्याला रोखण्यासाठी बाजारात जाताना आणि प्रवासाला जाताना काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.

दुकाने/मंड्या/मॉल्समध्ये खरेदीसाठी जातांना

• बाजारपेठेत खरेदीला जातांना घरातील एकाच व्यक्तीने जाणे, तसेच कमी गर्दीच्या वेळी जाणे.
• दुकानाबाहेर तसेच आतमध्येही इतरांपासून सुरक्षित अंतर राखूनच वावर होईल, याची काळजी घ्यावी. गर्दी असल्यास तिथे प्रवेश करु नये. लिफ्टऐवजी शक्यतो जिन्यांचा वापर करावा. कठड्यांना स्पर्श करु नये.
• खरेदीला गेल्यानंतर तेथे प्रदर्शनार्थ ठेवलेल्या वस्तूंना स्पर्श करणे टाळावे.
• खरेदीसाठी प्राधान्याने ऑनलाईन पद्धतींचा वापर करावा.
• खरेदी करुन आणलेल्या वस्तू काही काळ घराबाहेर/ मोकळ्या जागेत/ जिथे कोणाचाही स्पर्श होणार नाही, अशा ठिकाणी ठेवाव्यात.
• दुकानदार/ व्यावसायिक यांना मास्क न लावलेल्या ग्राहकांना प्रवेश देऊ नये.
• दुकाने/ मंड्या/ संकूल येथे सुरक्षित अंतराच्या खुणा करुन मर्यादीत ग्राहकांनाच एकापाठोपाठ प्रवेश द्यावा.
• दुकानात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकासाठी शारीरिक तपमान, सॅनिटायझर यांची व्यवस्था करावे.
• दुकाने/ मंड्या/ संकूल येथे मर्यादीत संख्येनेच नोकर/ मदतनीस यांची नियुक्ती करावी.
• व्यवहारांसाठी शक्यतो ऑनलाईन/ डिजीटल पद्धतींचा अवलंब करावा. कमीत कमी चलन हाताळावे लागेल, याची काळजी घेतल्यास संसर्गाचा धोका कमी करता येतो.

खासगी/सार्वजनिकरित्या प्रवास करताना घ्यावयाची दक्षता

• सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करत असतांना मौन राखावे. सहप्रवाशांची विनाकारण बोलू नये.
• मास्कसमवेत फेसशिल्डचाही उपयोग केल्यास उत्तम किंवा चेहऱ्याभोवती रुमाल अथवा फडके गुंडाळावे.
• सार्वजनिक वाहनात एका आसनावर एकाच व्यक्तींने आसनस्थ व्हावे.
• वाहनांमध्ये गर्दी करुन, दाटीवाटीने प्रवास करु नये. असा प्रवास टाळणे उत्तम.
• वाहनांमध्ये दरवाजा, कठडा यांना शक्यतो स्पर्श करु नये. स्पर्श करावा लागणार असल्यास त्याआधी व वाहनातून उतरल्यानंतरही सॅनिटायझर हातांना लावावे.
• शक्यतो खासगी दुचाकी/चारचाकी वाहनाचा उपयोग प्रवासाच्या गरजेनुसार करावा. खासगी वाहनांमध्ये विनाकारण सहप्रवासी नेऊ नयेत.

कार्यस्थळी घ्यावयाची खबरदारी

• कार्यालय प्रमुखांनी सर्व कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित अंतर राहील, याप्रमाणे कामकाजाची रचना करावी.
• शक्यतो आळीपाळीने व गरजेनुसार कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलवावे. कामकाजाच्या वेळा विभागून द्याव्यात.
• कार्यालयांमध्ये शारीरिक तापमान, प्राणवायू पातळी आदिंची तपासणी, निर्जंतुकीकरण द्रव्य यांची संयंत्रे सर्वांसाठी उपलब्ध असावीत.
• बैठकांमध्ये दूर-दृश्य प्रणाली (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) पद्धत उपयोगात आणावी.
• कामकाजामध्ये शक्य तितका मानवी संपर्क कमी करुन डिजीटल पद्धतींचा उपयोग करावा.
• कार्यालयाची हवा कायम खेळती राहण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवणे. वातानुकूलन यंत्रणेचा वापर टाळावा.
• आत्यंतिक गरज नसल्यास, कार्यालयीन कामकाजविषयक दौरे टाळावेत.
• येणाऱ्या अभ्यागतांशी संवाद साधतांना संरक्षित अंतर राखून संवाद साधावा.
• कार्यालयात शक्यतो एकत्रित जेवायला बसू नये.

दुकानदार, विविध आस्थापना आणि खाजगी वाहतूक करणाऱ्यांची भूमीका कोरोनाविरुद्धच्या लढ्यात महत्वाची आहे. मास्क न घालणाऱ्या आणि खबरदारी न घेणाऱ्यांना जर विक्री किंवा सेवा देण्यास मनाई केली तर नागरिकांना नियम पाळण्याची चांगली सवय लागू शकेल. हा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे.

आपले दुकान, कार्यालय, वाहन हे कोरोना वाहकस्थळ होणार नाही याची दक्षता प्रत्येकाला घ्यावयाची आहे. उलटपक्षी कोरोना प्रतिबंधाची सुरूवात आपल्या ठिकाणापासून होईल हा निश्चय प्रत्येकाला करावा लागेल. कोरोनाला प्रत्येक ठिकाणी रोखल्यास त्याची साखळी खंडीत करणे शक्य होणार आहे. तेव्हा फक्त प्रशासनाची जबाबदारी म्हणून याकडे न पाहता आपला सहभाग निश्चित करा आणि कोरोनामुक्त जीवनाकडे एक पाऊल टाका.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button