Ahamdanagar

?सावधान…. हनीट्रॅप मध्ये अडकविण्याचे रॅकेट

?सावधान…. हनीट्रॅप मध्ये अडकविण्याचे रॅकेट

अहमदनगर : सुंदर अन् हायप्रोफाईल लाईफ जगणारी तरुणी संपर्कात आली तर बहुतांशी पुरुषांचे मन विचलित होते. याच मानसिकतेचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी ऑनलाईन फसवणुकीचा नवीनच फंडा शोधून काढला आहे. तरुणींच्या व्हाॅटसअ‍ॅप व्हीडिओ कॉलमध्ये अडकून नगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक कॉलेज तरुण, व्यावसायिक व विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या लोकांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

व्हॉटसअ‍ॅपवर व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून फसवणूक झाल्याच्या आठवड्यातून तीन ते चार तक्रारी सध्या येथील सायबर पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत आहेत. व्हॉटसअ‍ॅप प्रोफाईल व स्टेटसला सुंदर फोटो असलेली तरुणी प्रथम सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात येते.

चॅटिंगच्या माध्यमातून ती मैत्री वाढविते. तिच्या अनेक पर्सनल गोष्टी समोरील पुरुषाशी शेअर करते (तसेच भासविते). मैत्री थोडी घट्ट झाली की, ती तरुणी तीन ते चार वेळेस व्हॉटसअ‍ॅपवरून व्हिडीओ कॉल करते. यावेळी ती दिलखुलास गप्पा मारते, लाघवी बोलते. तिच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीला वाटते ही आपल्या प्रेमातच पडली आहे. प्रत्यक्षात तो एक दिखावा असतो. समोरील व्यक्ती आपल्यात अडकला आहे, असा अंदाज येतो, तेव्हा ती पुन्हा व्हिडीओ कॉल करून समोरील व्यक्तीला बंदखोलीत एकांतात जाण्यास सांगते.

व्हिडीओ कॉल सुरू असतो तेव्हा ती तरुणी स्क्रिनवर तिचे संपूर्ण शरीर दाखवून स्वत:चे कपडे उतरविते. यावेळी समोरील व्यक्तीलाही तसेच करायला सांगते. तरुणीच्या मायाजालात अडकलेला हा व्यक्ती ती सांगेल तसेच करत जातो. याचवेळी समोरील तरुणी व तिचे साथीदार स्क्रीन रेकॉर्डींगच्या माध्यमातून नग्न झालेल्या तरुणाचा व्हिडीओ व त्याचे संपूर्ण बोलणे रेकॉर्ड करून घेतात. व्हिडीओ मिळताच दुसऱ्याच क्षणी ती तरुणी या व्यक्तीला फोन करून पैशांची मागणी करते. पैसे देण्यास नकार दिला तर त्यांच्याकडे असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली जाते. अशावेळी घाबरून गुन्हेगारांनी दिलेल्या अकाऊंटवर पैसे पाठविले जातात. फसवणूक करणाऱ्यांनी वारंवार पैशांची मागणी केल्यानंतर शेवटी वैतागून सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली जाते.

फसवणूक करणाऱ्या टोळ्या परप्रांतीय

व्हॉटसअ‍ॅप व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून ब्लॅकमेल करणाऱ्या टोळ्या या झारखंड, नोयडा, मध्य प्रदेश या परिसरातील असल्याचे सायबर पोलीसांची माहिती आहे. अशा फसवणुकीसंदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतरही तांत्रिक अडचणीमुळे या गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे पोलिसांना शक्य होत नाही.

अशी येते ‘ती’ तरुणी संपर्कात

सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या ऑनलाईन फसवणुकीसाठी सोशल मीडियावर टार्गेटचा शोध घेतात. प्रथम फेसबुकवरून अकांऊंटधारकाला अनोळखी तरुणीची फ्रेण्डरिक्वेस्ट येते. ही रिक्वेस्ट स्वीकारली की, ती मेसेंजरच्या माध्यमातून संपर्कात येते. कधी चॅटिंग तर कधी मेसेंजरच्या माध्यमातून कॉल असा सिलसिला सुरू होतो. नंतर ती व्हाॅटसअ‍ॅप नंबर मागते. त्यानंतर व्हाॅटसअ‍ॅपवरून कॉल करून अडकविले जाते.

फसवणुकीसाठी प्रथम सायबर गुन्हेगार विविध प्रकारचे आमिष दाखवितात. नागरिकांनी अशा कुठल्याच आमिषाला बळी पडू नये. फेसबुकवर अनोळखी व्यक्तीची फ्रेण्डरिक्वेस्ट स्वीकारू नये. प्रत्येकाने आपले फेसबुक अकाऊंट प्रायव्हेट करावे. अनोळखी व्यक्तीने संपर्क केला तर त्याला आपली कुठल्याच प्रकारची वैयक्तिक माहिती देऊ नये. नागरिकांनी अशी काळजी घेतली तर फसवणुकीचे प्रकार कमी होतील.
-प्रतीक कोळी, पोलीस उपनिरीक्षक सायबर पोलीस स्टेशन, अहमदनगर

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button