Nandurbar

नंदुरबार पोलिसांची चमकदार कामगिरी

नंदुरबार पोलिसांची चमकदार कामगिरी

नंदुरबार/फहिम शेख

{राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा}

नंदुरबार, ता. १८ महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातील १८ खेळाडूंची निवड झाली होती. या खेळाडूंनी विविध क्रीडाप्रकरात आपली चमकदार कामगिरी करत राज्यात नंदुरबार जिल्हा पोलिस दलाचा नावलौकिक केला असून, त्यांचे अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र राज्य ३३ वी पोलिस क्रीडा स्पर्धा ७ ते १३ जानेवारीदरम्यान राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक १ व २ येथील मैदानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.या राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेमध्ये सांघिक व वैयक्तिक खेळ अशा एकूण १८ क्रीडाप्रकारांमध्ये १३ संघांतील दोन हजार ५९० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत पुरुष गटात सर्वाधिक पदके मिळवत राज्य राखीवपोलिस दलाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले, तर प्रशिक्षण संचालनालयाच्या महिला संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.
स्पर्धेमध्ये नंदुरबार जिल्हा पोलिस दलातील सांघिक व वैयक्तिक क्रीडाप्रकारातील एकूण १८ खेळाडूंची नाशिक परिक्षेत्रीय संघात निवड करण्यात आली होती. त्यांपैकी पुरुषांच्या हातोडाफेक क्रीडाप्रकारात नंदुरबार शहर पोलिस ठाण्यातील अंमलदार हेमंत वारी यांनी ५१.१० मीटर हातोडा फेकत प्रथम क्रमांक, तर विसरवाडी पोलिस ठाण्यातील अंमलदार भूषण चित्ते यांनी ४४.७३ मीटर हातोडा फेकत द्वितीय क्रमांक पटकावला.
वुशू या महिलांच्या ४९ किलो वजन क्रीडाप्रकारात निंबाबाई वाघमोडे यांनी प्रथम व तायक्वांदो क्रीडाप्रकारात द्वितीय क्रमांक पटकावून उत्कृष्ट महिला खेळाडूंचा पुरस्कार आपल्या नावावर नोंदविला. तसेच पुरुषांच्या बॉक्सिंगया क्रीडाप्रकारात ५१ किलो वजनगटात पोलिस अमलदार विश्वास वळवी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. पुरुषांच्या हॅण्डबॉल या क्रीडाप्रकारात नाशिक परिक्षेत्र संघाने नागपूर शहराचा ३२-२१ असा पराभव करत तृतीय क्रमांक पटकावला. या संघात नंदुरबार जिल्हा पोलिस दलातील अंमलदार अबिद रोटिवाला, आनंदा मराठे, राहुल गवळी व राजेश गांगुर्डे यांचा सहभाग होता.राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेमध्ये नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी पोलिस अधिकारी गटातून शूटिंग या क्रीडाप्रकारामध्ये दुसरे स्थान पटकावून नंदुरबार जिल्हा पोलिस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नाशिक परिक्षेत्र संघात निवड झालेल्या पदकप्राप्त सर्व खेळाडूंचा सन्मान करून पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेमध्ये सांघिक व वैयक्तिक खेळातून प्रावीण्य मिळविलेल्या खेळाडूंची ऑल इंडिया पोलिस गेम्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button