India

? असंच थोडं वेगळं..पंचनामा – छान किती हे एप्रिल फुल

? असंच थोडं वेगळं..पंचनामा – छान किती हे एप्रिल फुल

आज पहाटे उठून आम्ही दोन तास व्यायाम केला. तेथून आल्यानंतर एका खासगी कामासाठी बाहरे पडलो. कात्रज चौकात आल्यानंतर आम्ही सहज आसपास पाहिले तर प्रत्येक दुचाकीचालकाने हेल्मेट व मास्क घातले होते. विशेष म्हणजे मागे बसलेल्या महिला व लहान मुलांकडेही हेल्मेट होते. आज काय ‘हेल्मेट दिन’ आहे काय? अशी शंका मनात आली. त्यानंतर पुढील चौकातील पोलिसांसमोर एका तरुण मुलाने गाडी थांबवली.
”साहेब, माझा मास्क दोनवेळा हनुवटीवर आला. दंड म्हणून पाचशे रुपये घ्या. दंडाबरोबर मी प्रायश्चित्तही घेतो.” असे म्हणून त्याने कान पकडत वीस उठाबशा काढल्या. ‘बस कर पगले, अब रूलाएगा क्या’ असे म्हणत, पोलिसाने त्याची गळाभेट घेत, पाठीवर हात फिरवला.
त्यानंतर आम्ही पुढे निघालो. बालाजीनगरच्या बसथांब्यावर सगळेच प्रवासी मास्क घालून, बसची वाट पाहत रांगेत उभे होते. तेवढ्यात शिवाजीनगरला जाणारी बस आली.
वाहकाने खाली उतरून, प्रवाशांना अभिवादन केले व ‘कोरोनाच्या नियमानुसार निम्म्या प्रवाशांनाच बसमध्ये बसण्यास परवानगी आहे. त्यानुसार एक जागा खाली आहे. कोणीही येऊ शकता,’ असे आवाहन केले. त्यानंतर प्रवाशांनीही एकमेकांकडे पहात, ”काका, तुम्ही जा.” ”आजी, तुम्ही चला.”, ”मावशी, तुम्ही जा,” असा एकमेकांना आग्रह होऊ लागला. सगळ्यांच्या आग्रहाने एक आजोबा बसमध्ये जाण्यास निघाले. वाहकाने त्यांना प्रेमपूर्वक नमस्कार घातला व हातावर सॅनिटायझर फवारले व त्यांच्या आसनाकडे ते घेऊन गेले. त्यानंतर आम्ही मार्केटयार्डमध्ये आलो. तिथे सर्वच विक्रेत्यांनी मास्क घातले होते. त्यांच्यासमोरील मोकळ्या जागेत गोल केले होते व ग्राहक सोशल डिस्टन्सिंग पाळत, त्या गोलावर उभे होते. विक्रेत्याने किंमत सांगितल्यानंतर कसलीही घासाघीस न करता ग्राहक भाजीपाला खरेदी करत होते व उलट दोन- चार रुपये जास्तच देत होते. विक्रेतेही थोडाफार शेतीमाल जास्त देत होते. कोठेही आरडा- ओरड नाही की गोंधळ नाही. सगळा प्रेमाचा व्यवहार चालू होता. थोडी खरेदी केल्यानंतर आम्ही पुढे आलो. अनेकदा आम्ही गल्लीबोळातून गाडी चालवली पण कोठेही खड्डा नव्हता, की कोठे खणून ठेवले नव्हते. सर्वच रस्ते चकाचक होते. कोणत्याही चौकात फ्लेक्स वा होर्डिंगही नव्हते. ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ चा जागोजागी प्रत्यय येत होता.
स्वारगेटला एका चोरट्याला पोलिसांनी पकडले होते व ‘चोरी करणे चांगले नाही, काहीतरी कामधंदा कर’ असा प्रेमाने सल्ला देत होते. लॉकडाउनमुळे बेरोजगार झाल्याचे त्याने सांगितले. ‘घरात अन्नाचा कण नाही,’ हे त्याने गहिवरल्या सुरात सांगितल्यानंतर पब्लिकने दहा- वीस रुपये गोळा करून, एक हजार रुपये त्याच्या हातात दिले. त्यानंतर पुढे आम्ही एका पोलिसचौकीत गेलो. पोलिसांनी लगेचच आम्हाला प्यायला पाणी दिले व बसायला खुर्ची दिली. ”साहेब, काय काम काढलंत”? असं प्रेमाने विचारले.
आम्ही लायसन हरविल्याचं सांगितल्यानंतर लगेचच आम्हाला ‘एफआयआर’ बनवून दिला. तोपर्यंत चहा आला होता. ”साहेब, चहा घ्या.” पोलिसाने आग्रह केला. निघताना आम्ही खिशात हात घातला. त्यावर आम्हाला थांबवत, ‘त्याची काही गरज नाही, आम्हाला पुरेसा पगार मिळतो,’ असे म्हटले. पोलिसांचे हे बोलणे ऐकून आमच्या डोळ्यात पाणी आले. थोड्यावेळाने आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो. तिथे कोणतीही पाटी नव्हती. हॉटेलचालकही प्रेमळ होता. आम्हाला पाहिल्यानंतर हात जोडत पुढे आला. ”काय हवंय आपल्याला”? असं विनम्रतेने विचारलं. ”एक कटिंग चहा द्या,” आम्ही म्हटलं. तेवढ्यात रेडिओवर ‘एप्रिल फूल बनाया, तो उसको घुस्सा आया’ या गाण्याने आमचे लक्ष वेधले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button