Mumbai

जाणून घ्या सम्राट अशोकाच्या अज्ञात कन्ये बद्दल

जाणून घ्या सम्राट अशोकाच्या अज्ञात कन्ये बद्दल

बौद्ध साहित्यात सम्राट अशोक राजाची मुलगी संघमित्रा आणि मुलगा महेंद्र बद्दल खूप माहिती वाचण्यात आलेली आहे. परंतु सम्राट अशोक राजाला दुसरीही एक मुलगी होती आणि तिचे नाव चारुमती होते हे जास्त कोणाला ज्ञात नाही. सम्राट अशोक राजास पाच राण्या होत्या, त्या पैकी असंधिमित्रा ही दुसरी होती. तिने अशोक राजापासून दासीला झालेली कन्या दत्तक घेतली होती. तिचे नाव चारुमती होते. ती मोठी झाल्यावर तिचा विवाह नेपाळ येथील देवपाल क्षत्रिय या राजकुमारा बरोबर करण्यात आला. तेव्हापासून चारुमती ही तेथेच राहात होती.

पित्याच्या पावलावर पाऊल ठेवत तिनेसुद्धा काठमांडूच्या खोऱ्यात थेरवादी बुद्ध धम्माचा प्रचार केला. अशोक राजाच्या उतारवयात जेव्हा पुत्र महेंद्र आणि मुलगी संघमित्रा श्रीलंकेत स्थायिक झाले होते तेव्हा पित्याची काळजी चारुमतीने घेतली. तसेच त्याच्याबरोबर तिने धम्मयात्रा सुद्धा केली. तिच्या कारकिर्दीत तिने देवपटन येथे स्तुप बांधला तो चारुमती स्तूप म्हणून ओळखला जावू लागला. मात्र गेल्या हजारो वर्षात तो स्तुप हळूहळू विस्मरणात गेला. पुढे त्याचे नाव धनधोज स्तुप झाले व एक जुनी टेकडी म्हणून त्याची ओळख राहिली. तसेच त्याच्या आजूबाजूस वस्ती वाढल्याने त्याकडे दुर्लक्ष झाले. पुरातत्व खात्यालासुद्धा चारुमती स्तुप कुठे आहे हे ज्ञात होत नव्हते.

परंतु २००२ मध्ये धनधोज स्तूपाचे नूतनीकरण करण्याचे काम हाती घेतले तेव्हा तेथील उत्खननात असंख्य छोट्या स्तूपांच्या प्रतिकृती सापडल्या. तसेच शंभराच्यावर लहान बुद्ध मूर्ती सापडल्या.आणि मुख्य म्हणजे तेथील विटांवर चारू-व- ती असे ब्राम्ही लिपीत कोरलेलेे आढळले. तसेच स्फटिका बरोबर सोने-चांदी यांची किरती, लिच्छवि आणि मल्ल यांच्या काळातील नाणी सापडली. तेथील पुरातत्ववेत्ते प्रकाश दर्नल यांनी सांगितले की विटेवर धम्मचक्राचा ठसा असून, दोन स्वस्तिक चिन्हे व चारुमतीचे नाव आढळल्यामुळे हा महत्वाचा स्तुप इतकी वर्षे दुर्लक्षित कसा राहिला याचे आश्चर्य वाटते.श्रीलंकेतील बौद्ध साहित्यात चारुमती स्तूपाबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे नेपाळमध्ये जेव्हा चारुमतीचा स्तुप ओळखला गेला तेव्हा मार्गदर्शनासाठी व नूतनीकरणाच्या देखरेखीसाठी श्रीलंकेतील भिक्खू आले होते. त्यावेळेस केलेल्या आव्हानानुसार प्राप्त झालेल्या दानामधून त्याचे नुतनीकरण केले गेले. आता चारुमती स्तुप हळूहळू पर्यटकांचे आकर्षण होत आहे.

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button