Jalgaon

जळगांव: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘कोविड अनुरुप वर्तना’चे पालन करावे! जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आवाहन मार्गदर्शक सूचना जारी…

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘कोविड अनुरुप वर्तना’चे पालन करावे! जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आवाहन :

विभागनिहाय कर्तव्य व जबाबदारी निश्चित अन्यथा दंडात्मक कारवाई

जळगांव
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करणे व कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करावे. या पालनाबाबत जळगाव जिल्ह्यातील विविध आस्थापना, घटक, सेवा प्रदाते यांनी कोविड अनुरप वर्तनाचे पालन करावे, यासाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे, जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोविड -19 बाधित रुग्ण संख्या कमी होत आहे. कोविड -19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून लागू केलेल्या निर्बधांचे जिल्ह्यातील विविध आस्थापना, घटक, नागरिकांनी पालन केल्यामुळे व कोविड अनुरूप वर्तन विषयक शिस्त व ‘कवच कुंडल’ आणि ‘हर घर दस्तक’ या लसीकरण मोहिमेला नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे हे शक्य झालेले आहे.
मात्र, कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरणाचे जळगाव जिल्ह्यात 67 टक्के नागरिकांचा पहिला डोस व 24 टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. लसीकरणाचे प्रमाण हे राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेने कमी आहे. सद्य:स्थितीत दक्षिण आफ्रिका, बोस्टाना, केनिया व इतर आफ्रिकन देशांमध्ये Multiple Mutation Variant B.1.1.529 (Omicron) या नवीन व्हेरिएंटचा संभाव्य धोका लक्षात घेता 18 वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. जेणेकरुन संभाव्य धोका टाळता येईल, असे राज्य शासनाच्या टास्क फोर्स व तज्ञांचे मत आहे.
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करणे व कोविड अनुरुप वर्तनाच्या पालनाबाबत राज्य शासनाच्या महसूल व वन विभाग, आपत्ती व्य्वस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या 27 नोव्हेंबर, 2021 रोजीच्या आदेशान्वये निर्देश देण्यात आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करणे व कोविड अनुरुप वर्तनाचे (Covid Appropriatd Behaviour ) पालन करण्याबाबत जळगाव जिल्ह्यातील विविध आस्थापना, घटक, नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. आस्थापना, घटक, सेवा प्रदाते यांनी कोविड अनुरुप वर्तनाचे पालन करावे. त्यासाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

(अनुक्रमे सेवा प्रदाते व यंत्रणा, कर्तव्य व जबाबदारी, संबंधित विभाग या क्रमाने) :

सेवा प्रदाते व यंत्रणा- किरकोळ व घाऊक दुकानदार, मॉल व तत्सम गर्दी होणारी सर्व ठिकाणे, सर्व सेवा प्रदात्यांनी स्वत:चे व दुकानातील कर्मचारी यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करुन घ्यावे. सेवा घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण झाल्याची खात्री करुन कोविड अनुरुप वर्तन विषयक शिस्तीचे पालन करावे. आयुक्त, महानगरपालिका, जळगाव, उपविभागीय अधिकारी (सर्व), तहसीलदार (सर्व) मुख्याधिकारी (सर्व), गट विकास अधिकारी

पेट्रोलपंप : सर्व सेवा प्रदाते मालक, चालकांनी स्वत:चे व त्या ठिकाणी काम करणारे कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करुन घ्यावे. सेवा घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण झाल्याची खात्री करुन कोविड अनुरुप वर्तन विषयक शिस्तीचे पालन करावे, आयुक्त, महानगरपालिका, जळगाव, जिल्हा पुरवठा अधिकारी, उपविभागीय अधिकारी (सर्व), तहसीलदार

हॉटेल, रेस्टॉरंट, बार, लॉजिंग, खानावळ व तत्सम ठिकाणे : हॉटेल, रेस्टॉरंट, बार, लॉजिंग, खानावळ येथील मालक, चालकांनी स्वत:चे व काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करुन घ्यावे व सेवा घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण झाल्याचे खात्री करुन कोविड अनुरुप वर्तन विषयक शिस्तीचे पालन करावे, आयुक्त, महानगरपालिका, जळगाव, उपविभागीय अधिकारी (सर्व), तहसीलदार (सर्व), अन्न व औषध प्रशासन/ अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क, मुख्याधिकारी

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था : सर्व सेवा प्रदात्यांनी स्वत:चे व चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांचे तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या प्रवाशांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण असल्याची खात्री करावी. कोविड अनुरुप वर्तन विषयक शिस्तीचे पालन करावे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भुसावळ, पोलिस अधीक्षक, जळगाव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव, विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ, जळगाव.

सेतू सुविधा केंद्र, डान्स सेंटर, योगा सेंटर , जिम, जिम्नॅशिअम सेंटर व तत्सम ठिकाणे : सर्व सेवा प्रदात्यांनी स्वत:चे व इतर कर्मचाऱ्यांचे तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण
असल्याची खात्री करावी व कोविड अनुरुप वर्तन विषयक शिस्तीचे पालन करावे, आयुक्त, महानगरपालिका, जळगाव, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी (सर्व).

हातगाडीवाले, फेरीवाले, फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, मांस विक्रेते, दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्रेते व तत्सम ठिकाणे : सर्व सेवा प्रदात्यांनी स्वत:चे व इतर कर्मचाऱ्यांचे तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण असल्याची खात्री करावी व कोविड अनुरुप वर्तन विषयक शिस्तीचे पालन करावे, आयुक्त, महानगरपालिका, जळगाव, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी

हमाल, माथाडी कामगार : हमाल / माथार्डी कामगारांनी स्वत:चे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण असल्याची खात्री करावी व कोविड अनुरुप वर्तन विषयक शिस्तीचे पालन करावे, सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव.
सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, खासगी कार्यालये, संस्था, मंडळ, बँक : सर्व कार्यालय प्रमुखांनी त्यांचे स्वत:चे व अधिनस्त असलेले सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण असल्याची खात्री करावी, कोविड अनुरुप वर्तन विषयक शिस्तीचे पालन करावे. तसेच कार्यालयात येणारे सर्व अधिकारी, कर्मचारी अभ्यागतांना कोविड लसीकरणाचे प्रमाणपत्र सोबत बाळगण्याबाबत निर्देश द्यावेत. सर्व विभागप्रमुख, कार्यालय प्रमुख, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक जळगाव.

सर्व शाळा, महाविद्यालये, खासगी कोचिंग क्लासेस : मुख्याध्यापक, प्राचार्यांनी त्यांचे स्वत:चे व अधिनस्त असलेले सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण असल्याची खात्री करावी व कोविड अनुरुप वर्तन विषयक शिस्तीचे पालन करावे. तसेच कार्यालयात येणारे सर्व अधिकारी / कर्मचारी अभ्यागतांना कोविड लसीकरणाचे प्रमाणपत्र सोबत बाळगण्याबाबत निर्देश द्यावेत, आयुक्त, महानगरपालिका, जळगाव, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), गट विकास अधिकारी (सर्व)

गॅस पुरवठादार, रास्त दुकानदार व ग्राहक : सर्व सेवा प्रदात्यांनी स्वत:चे व इतर कर्मचाऱ्यांचे तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण असल्याची खात्री करावी. कोविड अनुरुप वर्तन विषयक शिस्तीचे पालन करावे, जिल्हा पुरवठा अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार (सर्व)

औद्योगिक आस्थापना : सर्व औद्योगिक आस्थापना मालकांनी त्यांचे स्वत:चे व इतर सर्व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण असल्याची खात्री करावी, कोविड अनुरुप वर्तन विषयक शिस्तीचे पालन करावे, क्षेत्रीय व्यवस्थापक, एमआयडीसी, जळगाव, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव. मंगल कार्यालये / बंदिस्त सभागृहे व तत्सम ठिकाणे : सर्व सेवाप्रदात्यांनी स्वत:चे व इतर कर्मचाऱ्यांचे तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण असल्याची खात्री करावी व कोविड अनुरुप वर्तन विषयक शिस्तीचे पालन करावे : आयुक्त, महानगरपालिका, जळगाव, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी
शासन आदेशात नमूद केल्यानुसार जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिक, आस्थापना, घटकांनी कोविड अनुरुप वर्तन विषयक शिस्तीचे पालन करावे, तसेच कोविड अनुरुप वर्तन विषयक शिस्तीचे पालन करण्यासाठी जबाबदारी निश्चित केलेला विभाग, कार्यालयाने त्यांच्या अधिनस्त फिरते तपासणी, पडताळणी पथकाची नियुक्ती करुन कोविड अनुरुप वर्तन विषयक शिस्तीचे उल्लंघन करणारे सर्व सेवा प्रदाते / आस्थापना / घटक यांच्यावर दंडात्मक कारवाई करीत दंडात्मक रक्कम शासन जमा करावी. कोविड अनुरुप वर्तन विषयक शिस्तीचे पालन न करणाऱ्या व्यक्तीस 500 रुपये दंड आकारण्यात यावा. ज्यांना आपले अभ्यागत, ग्राहक, इत्यादीवर कोविड अनुरुप वर्तन लादणे अपेक्षित आहे, अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही परिवास्तूत (जागेत) जर एखाद्या व्यक्तीने कसूर केल्याचे निदर्शनास आले, तर त्या व्यक्तीवर दंड लादण्याव्यतिरिक्त अशा संस्थांना किंवा आस्थापनांना सुध्दा दहा हजार रुपये दंड आकारता येईल. कोणतीही संस्था किंवा आस्थापना तिचे अभ्यागत, ग्राहक, इत्यादिंमध्ये कोविड अनुरुप वर्तन विषयक शिस्त निर्माण / सुनिश्चित करण्यात नियमितपणे कसूर करीत असल्याचे दिसून आल्यास कोविड – 19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत, अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल. एखादया संस्थेने किंवा आस्थापनेने स्वत:च कोविड अनुरुप अनुरुप वर्तनाचे (Covid Appropriate Behaviour) किंवा कोविड नियमावलीचे (SOP) उल्लंघन केल्यास त्या संस्थेस / आस्थापनेस प्रत्येक प्रसंग 50 हजार रुपये दंडाची आकारणी करण्यास पात्र राहील. वारंवार कसूर केल्यास कोविड -19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यत, अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ( चारचाकी वाहने, बस) यांनी कोविड अनरुप वर्तनाचे पालन न केल्यास कसूर करणाऱ्या व्यक्तींना रुपये 500/- इतका दंड व सेवा पुरवठादारांना रुपये 500/- इतका दंड आकारण्यात येईल. तसेच टॅक्सी किंवा खासगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये कोविड अनुरुप वर्तनाचे (Covid Appropriate Behaviour) उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस रु. 500/- इतका दंड व सेवा पुरविणारे वाहनचालक, मदतनीस, किंवा ग्राहकांना देखील रु. 500/- इतका दंड आकारण्यात येईल. तसेच बसेसच्या बाबतीत मालक, परिवहन एजन्सीज यांनी कसूर केल्यास प्रत्येक रुपये 10 हजार दंड आकारण्यात येईल. वारंवार कसूर केल्यास कोविड -19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत एजन्सीचा परवाना निलंबित किंवा रद्द करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button