Yewala

मांजरपाड़ा’ ला बाधा

मांजरपाड़ा’ ला बाधा

येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार

येवला : गेल्या तीन महिन्यांपासून देश कोरोनाशी दोन हात करतो आहे. कोरोनाविरुद्धच्या या जीवघेण्या लढाईत अर्थव्यवस्था डबघाईला आली आणि केंद्र व राज्य सरकारने अनेक कामांना ब्रेक दिला. जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पालाही कोरोनाची बाधा झाली असून, प्रकल्प रखडल्याने बाळापूरपर्यंत पोहोचलेले पाणी यंदाही डोंगरगावपर्यंत पोहोचेल की नाही, याबाबत साशंकता आहे.
सध्या दरसवाडी ते बाळापूर या ४० किमी अंतरात काम सुरू असून, पाणी पोहोचेपर्यंत अनकुटे रेल्वे क्रॉसिंगचेही काम पूर्ण होण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

२५ जुलै २०१९ रोजी मांजरपाडा प्रकल्पाचे जलपूजन झाले. मांजरपाडा प्रकल्प काही प्रमाणात अपूर्ण असताना गुजरातमध्ये वाहून जाणारे पाणी बोगद्याद्वारे पुणेगाव धरणात आले. मांजरपाडा प्रकल्पाच्या पाण्याने अवघ्या आठ दिवसात पुणेगाव, ओझरखेड, पालखेड भरले आणि ५ आॅगस्ट २०१९ रोजी ११० क्यूसेसने पुणेगावमधून दरसवाडीत पाणी सोडले गेले. १३ आॅगस्ट २०१९ रोजी अवघ्या आठ दिवसात ५९ किमी अंतर कापत पाणी चांदवड तालुक्यातील भाटगावपर्यंत आले. भाटगावच्या नदीत पाणी टाकून दरसवाडीत जाणे प्रस्तावित असताना परसूलच्या (ता. चांदवड) स्थानिक लोकांनी पाणी भाटगाव नदीऐवजी परसूल नदीत टाकण्याचा हट्ट धरला. परिणामी, पाणी परसूलमध्ये टाकले गेले. त्यासाठी परसूलचे ३ मोठे बंधारे भरावे लागले. २८ आॅगस्ट २०१९ रोजी सकाळी पाणी दरसवाडीत पोहोचले. पुढे २२ दिवसात मांजरपाड्याच्या पाण्याने दरसवाडी धरण भरले आणि २० सप्टेंबर २०१९ रोजी दरसवाडी कालव्याचे गेट उघडून पाणी येवल्याच्या दिशेने प्रवाहित
झाले.

दरसवाडी भरण्याची अपेक्षा
पुणेगाव ते दरसवाडीमधील १ ते २५ किमी कालवा रु ंदीकरण करून २२० क्यूसेस वहनक्षमतेचा करण्यात आला आहे. वणी येथील बोगद्याचे विस्तारीकरणाचे काम तांत्रिक कारणाने अपूर्ण राहिले असले तरी निश्चितच मागील वेळेपेक्षा जास्त वहनक्षमतेने पाणी प्रवाहित होणार आहे. पुणेगाव दरसवाडी १ ते ६३ किमीमधील कालवा सफाई झाली आहे. दरसवाडी धरणात ३३ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने दरसवाडी भरण्यास वेळ लागणार नाही. दरसवाडी ते बाळापूर या ४० किमीमध्ये कालवा दुरु स्ती, लेव्हलची कामे करण्यासाठी शासकीय यंत्रणा झटत आहे. कोरोना संकटामुळे मांजरपाडा प्रकल्पाचे अपूर्ण काम पूर्ण होऊ शकले नाही. तरीदेखील आहे त्या पाण्यात निश्चितच पाणी डोंगरगावपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोरोना संकट आले नसते तर मांजरपाडा प्रकल्प पूर्ण होऊन पूर्ण पाणी गोदावरी खोऱ्यात आले असते. तरीदेखील पुणेगाव-दरसवाडी कालवा रूंदीकरण आणि दुरु स्ती मार्च अगोदर पूर्ण झाली आहे. दरसवाडी ते बाळापूर या ४० किमीमध्ये काम सुरू आहे. पाणी येईपर्यंत अनकुटे रेल्वे क्र ॉसिंगचे काम पूर्ण होईल. पाणी डोंगरगावपर्यंत निश्चित पोहोचेल, अशी खात्री आहे.
– मोहन शेलार
आंदोलक, विखरणी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button