Nashik

नाशिकला विशेष ग्रंथालय आणि स्पर्धा परीक्षा दालनाचे उदघाटन..

नाशिकला विशेष ग्रंथालय आणि स्पर्धा परीक्षा दालनाचे उदघाटन..

प्रतिनिधी : उदय वायकोळे

नाशिक : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४५ व्या जयंतीनिमित्त शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२० रोजी नाशिक शहरात इंदिरा नगरमधील श्रीनिवास हॉस्पिटलच्या वास्तूमध्ये समाजाच्या तसेच राष्ट्रहिताच्या दृष्टीने आवश्यक असणारी जीवनरेखा म्हणजेच विशेष ग्रंथालय आणि स्पर्धा परीक्षा दालनाचा उदघाटन सोहळा लेवा उत्थान फाऊंडेशन, भुसावळ आणि लेवा भ्रातृमंडळ, पिंपळे-सौदागर, पुणे यांच्या संयुक्त प्रयत्नांनी पार पडला.
सदर ग्रंथालय व स्पर्धा परीक्षा दालनाचे फित कापून उदघाटन श्रीनिवास हॉस्पिटलचे डॉ. ब्रिजभूषण महाजन यांच्या आई श्रीमती चारुलता श्रीनिवास महाजन यांनी केले. तर सदर उपक्रमाच्या नामफलकाचे अनावरण लेवा साहित्यिक डॉ. नि. रा. पाटील-डोंबिवली, लेवा समाजभूषण डॉ. प्रमोद हरी महाजन-नाशिक आणि जेष्ठ मार्गदर्शक डॉ. के. जी. झांबरे-भुसावळ यांनी केले.
या उपक्रमाच्या माध्यमातून भविष्यात समाजबांधवांसाठी थोर आजी-माजी लेवा साहित्यिक लिखित विविध भाषेतील साहित्य रूपातील अनमोल ठेवा एकत्रित पणे उपलब्ध करून दिला जाणार आहे. जेणे करून सर्वांना लेवा साहित्यिकांच्या ग्रंथांची/पुस्तकांची/कवितांची/लेखांची माहिती एकत्रितपणे मिळू शकेल. सोबत विविध प्रकारचे व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या, विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी/समाजबांधवांसाठी आवश्यक ती संदर्भपुस्तके, मासिके इ. येथे वाचनासाठी उपलब्ध राहणार आहेत. हे विशेष ग्रंथालय तसेच स्पर्धा परीक्षा दालन इतर सर्व समाजातील बांधवांसाठी देखील खुले राहणार आहे.
उपस्थित सर्वांना संबोधतांना ग्रंथालये हे निरोगी समाज घडवण्यासाठी एक अद्वितीय आणि मौल्यवान संसाधन आहे असे उद्गार डॉ. नि. रा. पाटील यांनी काढले. तर डॉ. प्रमोद महाजन यांनी या उपक्रमाकडे ज्ञान देण्याची तसेच आयुष्य जगण्याची प्रयोगशाळा म्हणून बघण्याचे आवाहन केले. डॉ. के. जी. झांबरे यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून समाज जोडला जातोय म्हणून आनंद व्यक्त केला. तर श्रीमती कुमुदिनी फेगडे यांनी मार्गदर्शक बनून विशेष ग्रंथालय आणि स्पर्धा परीक्षा दालनाच्या रूपाने लावलेल्या इवल्याश्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होण्यासाठी शुभाशीर्वाद दिलेत.
माननीय प्रा. डॉ. राम नेमाडे यांनी व्हिडीओ संदेश पाठवून त्याद्वारे त्यांचे अनमोल मार्गदर्शन केले व मनोगत मांडून संपूर्ण समाजाला या उपक्रमासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. तसेच त्यांनी नवीन पुस्तकांच्या खरेदीसाठी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन आयोजकांना दिले. त्याचबरोबर लेवा भ्रातृमंडळ, पिंपळे-सौदागर, पुणे या संस्थेचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम पिंपळे यांनी सुद्धा त्यांचा व्हिडीओ संदेश पाठवून सदर उपक्रमाला आवश्यक ते सहकार्य करण्यासाठीचा पाठिंबा जाहीर केला. श्री. सुहास दादा कोल्हे व श्री. सोपानदेव पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्यात.

या ज्ञानदानाच्या तसेच समाज घडविण्याच्या उपक्रमास पाठिंबा म्हणून डॉ. प्रमोद महाजन, श्री. सोपानदेव पाटील, डॉ. विजय चौधरी, श्री. हरुल पाटील, श्री. योगेश पाटील, श्री. जगदीश ढाके, श्री. पितांबर बोंडे, श्रीमती कुमुदिनी फेगडे आणि सौ. प्रतिभा चौधरी या दात्यांनी पुस्तके दान केलीत.
सदर उपक्रमास श्री. विरेंद्र झोपे, श्री. लालजी पाटील, श्री. सुहास कोल्हे, श्री. आशुतोष झांबरे, डॉ. नरसिंग माने, श्री. सोपानदेव पाटील, सौ. प्रतिभा चौधरी, सौ. सुरेखा बोंडे, सौ. सुवर्णा फेगडे, डॉ. पल्लवी महाजन, डॉ. जानकी महाजन-माने, सौ. हर्षा भोळे यांची विशेष उपस्थिती लाभली.

सूत्रसंचलन श्री. सचिन भोळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्री. नितीन सरोदे यांनी केले. त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी लेवा उत्थान फाऊंडेशन, भुसावळ चे पदाधिकारी श्री. विनित पाटील, श्री. योगेश पाटील, श्री. राजेश महाजन, श्री. अतुल बोंडे, लेवा टीचर्स फाऊंडेशन ऑफ इंडिया आणि श्रीनिवास हॉस्पिटलचा स्टाफ या सर्वांचे अनमोल सहकार्य लाभले.
या उपक्रमासाठी ज्यांना ज्यांना पुस्तके दान करायची असतील त्यांनी
श्री. सचिन भोळे – 9921321765
श्री. नितिन सरोदे – 9823802881 किंवा
श्री. पुरुषोत्तम पिंपळे – 9595406516 यांना संपर्क करावा असे आवाहन लेवा उत्थान फाऊंडेशन, भुसावळ आणि लेवा भ्रातृमंडळ, पिंपळे-सौदागर, पुणे यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button