Maharashtra

वर्तमानाला वर्धमानाची गरज आहे..? प्रा. नेमिनाथ धनपाल बिरनाळे, उपाध्यक्ष, शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य

वर्तमानाला वर्धमानाची गरज आहे..?
प्रा. नेमिनाथ धनपाल बिरनाळे, उपाध्यक्ष, शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य

कोल्हापूर प्रतिनिधी तुकाराम पाटील

आज जगभर भ. महावीर यांची जयंती साजरी होत आहे..कोरोना संसर्गाच्या भितीने अखिल विश्वातील मानव भयभीत झाला आहे.. लाॅकडाऊन असल्याने पुजारी मंदिरात आणि अनुयायी घरातच महावीरांना वंदन करीत आहेत.. ज्या ज्या वेळी या जगाला भ.बुध्द आणि भ.महावीर यांचा विसर पडतो त्या त्या वेळी या जगावर महाभयंकर संकटं आली आहेत. हे दोन महापुरुष जगातील सर्वश्रेष्ठ पर्यावरण तज्ञ आहेत.. त्यांनी अहिंसा म्हणजेच जगा आणि जगू द्या हे जे कल्याणकारी तत्वज्ञान सांगितले त्याचा विसर पडल्याने जगावर अरिष्टे येत राहिली..निसर्गावरील मानवी आक्रमणं ज्यावेळी वाढतात त्यावेळी मानवी जीवन धोक्यात येते. भ. महावीरांचा जयजयकार करणं हे फार सोपं आहे.. पण त्यांना जगणं हे कठीण काम आहे.. त्यांना जगता आलं तरच मानव जात जगेल हे सांगायला कुठल्या भविष्यवेत्याची गरज नाही.. चिनी लोकांची खानपान पध्दत ही महावीर आणि बुध्दांना नाकारते त्यामुळेच कोरोनाचे संकट निर्माण झाले असे आता लोक बोलतात.. याचा अर्थच असा आहे की, वर्तमानाला वर्धमानांची गरज आहे.. भ.महावीरांची पालखी वाहून नेण्यासाठी केवळ खांदे मजबूत असून चालणार नाहीत तर त्यांच्या विचारांची पालखी वाहून नेणाऱ्या मजबूत मेंदूची गरज आहे.. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी लोकशाहीची मूल्ये भारतीय संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घातली त्यांचा उगम भ.बुध्द आणि भ.महावीर यांच्या विचारातून झाला असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.आज भ. महावीर जयंती साजरी करताना भारतीय लोकशाही व संविधान मूल्य सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सर्व भारतीयांची आहे..भारत स्वतंत्र जरुर झाला परंतु स्वातंत्र्याची प्रतिष्ठा जपण्यात आम्ही कमी पडलो.. वैशाली गणराज्य हे लोकशाही शासन व्यवस्थेचा गौरव करणारी महावीर भूमी.. आज आपल्या देशातील निवडणुकांतील प्रकार पाहिले तर आम्हाला महावीरांचा विसर पडला आहे असेच म्हणावे लागेल. अहिंसा, अनेकांत व अपरिग्रह या तत्त्वांचे पालन करणे म्हणजे भ.महावीरांना जगणे होय. आमचे शत्रू बाहेरचे कोणीच नाहीत.. राग, द्वेष, मत्सर, मोह, माया, लोभ हे आमचे खरे शत्रू आहेत.. सत्ता, संपत्ती, घराच्या आणि शेतीच्या वाटण्या, मेल्यानंतर साडे तीन फुटाचा खड्डा पुरेसा असताना शेताच्या बांधावर एक फुटासाठी मुडदा पाडतील , कोर्ट, पोलिस स्टेशन यावर लाखो रुपये उधळतील पण गरीबांना मदत करणार नाहीत या साऱ्या विकृती नष्ट करण्यासाठी भ.महावीरांची गरज सर्वच भारतीयांना आहे. भ. महावीर हा माणुसकीचा झरा आहे.. तो अखंड वहात राहिला तरच भारत शांत व सुरक्षित राहणार आहे..
कोरोनाच्या भीतीने घरात लाॅकडाऊन सहज होईल पण दुर्गुणांचा संसर्ग टाळून माणूस बनण्यासाठी आपल्याला आपल्याच मनात लाॅकडाऊन करुण सदवर्तनाचे सॅनिटायझर आत्म्याला लावता आले तरच दुःखाचा संसर्ग कायमचा टाळता येईल ही महावीर वाणी आहे. भ.महावीर आणि भ.बुध्दांचा वावर हा संसदेत, विधिमंडळात, शेतात, कारखान्यात, चौकाचौकात झाला तरच या जगात शांती व निर्भयता नांदू शकेल.
कोणाची भाकरी हिरावून घेऊ नका..निसर्ग, प्राणी, पशुपक्षी, राष्ट्र यांच्यावर प्रेम करा, लोकांना भीती घालून लुबाडू नका, जात- पात- धर्म – पंथ हे मानव निर्मित आहेत.. यांच्या आधारावर माणसा-माणसात भेद करू नका हे महावीरांचे प्रतिपादन जगातील सर्वश्रेष्ठ समतेचे तत्त्वज्ञान आहे. हा महावीर विचार आपल्या भारतीय संविधानाचा आत्मा आहे. लोकांना काम द्या.. त्यामानाने दाम द्या.. कोणाचे शोषण, पिळवणूक करू नका.. स्त्री पुरुष समानता पाळा.. गरीब, कष्टकरी वर्गाचा अपमान व अप्रतिष्ठा करु नका.. मन, वचन आणि कायेने अहिंसा पालन करा.. दुसऱ्यांच्या भल्यासाठी स्वतःची शक्ती खर्च करा..एकही हरामाचा, बिनकष्टाच्या पैशाला हात लावू नका, सार्वजनिक जनतेच्या पैशाचा अपहार करू नका म्हणजे महावीर आणि बुद्ध जगणे सहज सोपे व सुलभ होईल. बाहेर डोकावणे खूप झाले.. आता आतमध्ये डोकावण्यासाठी अंतःकरणाचे लाॅकडाऊन करु या.. हा खरा संदेश भ. महावीर जयंतीचा आहे असे मला वाटते.
भ्रष्ट मार्गाने, अनीतीच्या मार्गाने मिळविलेली संपत्ती आणि दुष्ट वर्तन हे माणसाला बरबाद करते.. म्हणून वर्तमानाला वर्धमानाची गरज आहे.
विश्वातील सर्व मानव, पशुपक्षी, जीवजंतू यांना भ. महावीर जयंती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.. विशेषकरून डाॅक्टर्स, परिचारिका, पोलिस,सैनिक, शेतकरी, अग्नीशमन दल,वीजबोर्ड, पाणीपुरवठा, दूध विक्रेते, सफाई आरोग्य अधिकारी, कर्मचारी, शिक्षक.. शिक्षकेतर सेवक, कष्टकरी कामगार, भाजीपाला विक्रेते,किराणा दुकानदार यांना दीर्घायुरारोग्य लाभो अशा वर्धमान शुभेच्छा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button