दिव्यांग दांपत्याच्या हस्ते चाळीसगावच्या एकदंताची आरती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार मंगेश चव्हाण यांच्या जनसेवा कार्यालयात “श्रीं”ची स्थापना
नितीन माळे
चाळीसगाव – आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या अंत्योदय जनसेवा कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या “चाळीसगाव चा एकदंताची” आरती जनसेवा कार्यालयात सेवा देणाऱ्या ओझर येथील दिव्यांग गजानन भिकन पाटील व त्याची दिव्यांग पत्नी सौ.रंजना गजानन पाटील या दांपत्याच्या हस्ते करण्यात आली. आपण सर्व ईश्वराचीच लेकरे असून श्री गणेशाजवळ जात – पात – छोटा – मोठा – सक्षम – दिव्यांग असा भेद नसल्याचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला. आरतीचा मान मिळाल्याने दिव्यांग पाटील दाम्पत्य देखील भारावून गेले होते.
मागील वर्षी आमदार मंगेश चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने “चाळीसगाव चा एकदंत” या नावाने गणेशोत्सव सुरू करण्यात आला होता. श्री गणेशांची भव्य मूर्ती व तीची शहरातून पारंपरिक वाद्यांसह निघालेली आगमन मिरवणूक, एकदंत महोत्सवाच्या निमित्ताने १० दिवस विविध सांस्कृतिक – अध्यात्मिक – ज्ञानोपयोगी कार्यक्रमांची मेजवानी आयोजित करण्यात आली होती. चाळीसगाव शहरात सलग १० दिवस प्रथमच असा महोत्सव साजरा होत असल्याने चाळीसगाव वासीयांनी देखील भरभरून प्रतिसाद देत हा महोत्सव यशस्वी केला होता. चाळीसगाव चा एकदंत महोत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निश्चय त्यावेळी आमदार मंगेश चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आला होता. मात्र यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सण उत्सवांना आलेल्या मर्यादा लक्षात घेत “चाळीसगाव चा एकदंत” ची स्थापना अतिशय साधेपणाने आमदार मंगेश चव्हाण यांच्या जनसेवा कार्यालयात घरगुती वातावरणात करण्यात आली आहे.
कोरोनाच्या काळात तालुक्यातील जनतेसाठी ई पासेस काढण्यापासून ते आर्सेनिक अल्बम होमिओपॅथिक औषधी तयार करून तिचे वितरण करेपर्यंत लॉक डाऊन काळात एकही दिवस कार्यालय बंद नव्हते. सेवा देत असताना कार्यालयातील २ कर्मचारी यांना कोरोनाने गाठले होते. तेदेखील आता कोरोनामुक्त होऊन कामावर रुजू झाले आहेत. त्यांच्या कामप्रति कृतज्ञता म्हणून यावर्षी चाळीसगाव च्या एकदंताची सकाळ व संध्याकाळ ची आरती जनसेवा कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते करण्यात येत असल्याची भावना सौ. प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली.






