पारधी समाजाच्या अत्याचारग्रस्त महिलेवर उपचार करण्यास शासकीय दवाखान्यात टाळाटाळ
कडूदास कांबळे
गेवराई तालुक्यातील अंबुनाईक तांडा खांडवी येथील आदिवासी पारधी समाजाच्या दरी मोहन भोसले या वयोवृद्ध महिलेसह अन्य पारधी समाजातील लहानथोर जातीय विद्वेषाच्या अत्याचाराला बळी पडले. दिनांक 18 सप्टेंबर 2020 रोजी जमावाने केलेल्या हल्ल्यात या वृद्ध महिलेचे दोन्ही हातावर जबर मारहाण झाल्याने दोन्ही हात फॅक्चर झाले. उपचारासाठी दरी आणि इतर अत्याचारग्रस्त गेवराईच्या शासकीय रुग्णालयात गेले. तिथे त्यांच्यावर थातूरमातूर उपचार करून त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात रेफर केले. दिनांक 19,20,21,22 या चार दिवस दोन्ही हात फॅक्चर असताना या महिलेचा साधा एक्स-रे सुद्धा शासकीय दवाखान्यात काढला नाही.
शेवटी या महिलेवर येथे उपचार करणार नसाल तर हिला सुट्टी द्या असे म्हणल्यावर 23 तारखेला एक्स-रे काढला. दोन्ही हाताचा फॅक्चर रिपोर्ट आल्यानंतर बीड येथील जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या महिन्याला दवाखान्यातून डिस्चीर्ज दिला आणि खासगी दवाखान्यात उपचार करण्याचा सल्ला दिला. योग्य उपचार वेळेवर न झाल्याने या महिलेचे दोन्ही हात सुजले आहेत. गेवराई येथील खाजगी डॉक्टरांनी योग्य औषध पाणी देऊन एक दिवसात सूज कमी केली. या महिलेच्या दोन्ही हाताला तीन ठिकाणी फॅक्चर आहे. हात उचलत नाही. पाणी पिता येत नाही. जेवण करता येत नाही. एका वेळच्या जेवणाची भ्रांत असणार्या या पारधी समाजाच्या महिन्याच्या ऑपरेशन साठी जवळपास एक लाख रुपयांच्या पुढे खर्च येणार आहे. शासकीय रुग्णालयातील संबंधित जबाबदार अधिकारी बेजबाबदारपणे वागले. आज ही वयोवृद्ध महिला अत्याचाराच्या व्याधीव्याधी सोबत झुंज देत मदतीची अपेक्षा करत आहे.






