पंचायत समिती सभापती सौ.स्मितलताई दिनेश बोरसे यांच्या संकल्पनेतून सन्माननीय सभापती यांच्या फोटो प्रतिमा व स्वागत कमान अनावरण
मनोज भोसले
पंचायत समिती सभापती सौ.स्मितलताई दिनेश बोरसे यांच्या संकल्पनेतून चाळीसगाव पंचायत समिती मधील आजवर झालेले सर्व सन्माननीय सभापती यांच्या फोटो प्रतिमा व स्वागत कमान अनावरण पंचायत समितीच्या मुख्य सभागृहात करण्यात आल्या.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री एम के अण्णा पाटील व खासदार उन्मेषदादा पाटील यांच्यासह सर्वपक्षीय माजी सभापती, प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
आज खऱ्या अर्थाने चाळीसगाव पंचायत समितीच्या इतिहासात सोनेरी अक्षरात नोंद व्हावा असा अविस्मरणीय दिवस आहे.
जेव्हा एखादी जबाबदारी, एखाद्या पदाची धुरा कुणाच्या खांद्यावर येते तेव्हा त्या व्यक्तीचे कुटुंब हे आईवडील, पत्नी मुलबाळ एव्हड्यापुरते मर्यादित न राहता आपण ज्यांचे प्रतिनिधित्व करतो ती सर्व जनता त्यांच्या कुटुंबाचे घटक होतात.
मग त्या पदावर, जबाबदारी वर तो व्यक्ती जोपर्यंत असतो त्या काळात या सर्व लोकांच्या समस्या सोडविणे हीसुद्धा जबाबदारी असते. त्यांच्या जीवनातील एक आठवणीतले असे हे पर्व असत त्यामुळे त्यांच्या भावना या पदाशी जुळलेल्या असतात.
आजवरच्या माजी सभापतींच्या कार्यकाळात अनेक चांगली कामे झालेली आहेत. त्यांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे अनेकांचे आयुष्य बदललेलं असत. दीन-दलित- वंचित घटकांना मदत करण्याचे पुण्याचे काम या काळात झालेले असत. या सर्व सन्माननीय सभापतींच्या कार्याची स्मृतीरूपी आठवण येणाऱ्या पिढीला राहावी म्हणून सौ. स्मितलताईनी जी संकल्पना मांडली आणि आपल्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने आज ती प्रत्यक्षात उतरवली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून अभिनंदन केले.
एक मोठी परंपरा आपल्या पंचायत समितीला असून अनेक थोर विभूतींनी आपल्या सभापती पदाच्या कार्यकाळात जनतेच्या हितासाठी चांगले काम केले. आहे. ही सर्व मान्यवर मंडळीनी मग ती कोणत्या पक्षाची असो, जाती – धर्माची असो महिला असो व पुरुष असो या सर्व चौकटीच्या बाहेर जावून आपण या तालुक्याचे जबाबदार लोकप्रतिनिधी आहोत या भावनेने सर्वांनी आपल्या कार्याची छाप पाडली आहे.
त्यात आपल्या पंचायत समितीचे पहिले सभापती पद माझ्या वाघळी गणाला सुधीरदादा सोनवणे यांच्या रूपाने मिळाले. सुधीर दादांनी १९६२ ते १९७९ या कार्यकाळात ३ वेळा हे पद भूषविण्याचा मान मिळविला याचा मला अभिमान आहे.
त्यांनतर खास उल्लेख करावा म्हणजे ज्यांना दलितमित्र उपाधी मिळाली असे स्व. हाजीसाहेब उर्फ महारु म्हसू पाटील यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाने २ वेळा हे पद भूषवून या पदाची उंची वाढवली. आज त्यांचे नातू या सभागृहात सदस्य म्हणून उपस्थित आहेत ही एक आनंदाची बाब आहे.
पुढे उल्लेख करायचा म्हटलं तर सर्व आदरणीय कलवंतराव नथू अहिरे, मांगो गोकुळ चव्हाण,
सलग ११ वर्ष सभापती पद भूषविणारे बाबूलाल शंकर मोरे,
माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब एम के अण्णा पाटील यांच्या पत्नी स्व.लिलाताई मोतीराम पाटील,
कृष्णराव शिवराव पवार, बहाळ येथील मार्केट कमिटीचे माजी सभापती अॅड रोहिदास लाला पाटील, वडाळा येथील श्रीमती कल्पनाताई शिवाजी आमले,
तळोदे येथील आमचे भाजपचे जेष्ठ नेते आदरणीय संभा अण्णा पाटील यांच्या सौभाग्यवती लिलाताई पाटील, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य श्री.ओंकार मंगतू चव्हाण,
डोण येथील आमच्या मामीसाहेब सौ.निर्मलाबाई पतिंग पाटील, राजकारणाचे बाळकडू मला ज्यांच्याकडून मिळाले असे माझे गुरु आदरणीय माजी आमदार साहेबरावजी घोडे सर यांचे लहान बंधू, नुकतेच ज्यांचे दुखद निधन झाले असे स्व.सूर्यभानजी घोडेस्वार,
पिंप्री प्रचाचे ईश्वरसिंग प्रतापसिंग ठाकरे, करगाव येथील साहेबराव पुना चव्हाण, हिरामण गोविंदा सोनवणे,
माझे मामा कळमडू येथील शैलेन्द्र रंगराव पाटील, स्व.सुधीर दादांच्या पत्नी श्रीमती शशिकला सुधीर सोनवणे,
आमचे जेष्ठ नेते व आताचे उपसभापती तात्यासाहेब संजय भास्करराव पाटील, घोडेगाव येथील श्री.विजय झामसिंग जाधव यांच्यानंतर श्रीमती कांताबाई मराठे व श्रीमती मीनाबाई पाटील यांनी प्रभारी कार्यभार या पदाचा सांभाळला.
राष्ट्रवादीचे जि प गटनेते आदरणीय शशिभाऊ साळुंखे यांच्या पत्नी सौ.आशालता साळुंखे आणि आताच्या सभापती बहाळ येथील सौ.स्मितलताई दिनेश बोरसे अशी दीर्घ, सर्व व्यापक अशी सभापती पदाची परंपरा आपल्या पंचायत समितीला आहे. या सर्वांच्या कार्याला वंदन करतो व यापुढेही अधिक लोकाभिमुख कार्य पुढील सभापती यांच्या हस्ते व्हावे याच यानिमित्ताने सदिच्छा देतो.
– आमदार मंगेश रमेश चव्हाण






