Mumbai

?मोठी बातमी : वाझेंनी दिली एनआयएला कबुली..!काय म्हणाले..!

?मोठी बातमी : वाझेंनी दिली एनआयएला कबुली..!काय म्हणाले

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून नाट्यमय घडामोडी सुरु आहेत. मुकेश अंबानींच्या “अँटीलिया” बंगल्याबाहेर, स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवण्याचं प्रकरण हे त्यापैकीच एक. अंबानींच्या बंगल्याबाहेर स्फोटकांनी भरलेली संशयास्पद गाडी सापडल्यानंतर, अधिक तपासात स्कोर्पिओ गाडीसोबत एक इनोव्हा गाडी असल्याचे पोलिसांना आढळले होते.

ही तीच गाडी होती, ज्यातून मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ठेवून ड्रायव्हरने पळ काढला होता. तसेच या इनोव्हा गाडीमध्ये दोन व्यक्ती असल्याचे, मुंबईहून बाहेर जाणाऱ्या मुलुंड टोलनाक्यावरच्या सीसीटीव्हीमध्ये दिसले होते. याप्रकरणी एनआयएच्या पथकाने पांढऱ्या रंगाची ही इनोव्हा गाडी जप्त केली होती आणि तपासात ती मुंबई क्राईम ब्रांचचीच असल्याचे समोर आले होते.

आता आज यासंबंधी अधिक खुलासा करणारी बातमी समोर आली असून, एनआयएच्या पथकाने चौकशी केली असता, ही पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी सचिन वाझे हेच चालवत होते, अशी माहिती एनआयएच्या सूत्रांकडून मिळाली आहे. सचिन वाझे यांनीच तशी कबुली एनआयएच्या चौकशीत दिली आहे. तसेच, स्कॉर्पिओ आणि पांढरी गाडी चालवणारे दुसरे तिसरे कोणी नसून CIU चे पोलीस होते. याबाबतचे वृत्त न्यूज-१८ लोकमतने दिले आहे.

दरम्यान, सुरुवातीला या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे होता. नंतर तो एटीएस कडे देण्यात आला व सध्या एनआयए या प्रकरणाचा तपास करत आहे. एनआयएने या तपासाला गती देत, काहीच दिवसांत सबळ पुरावे गोळा करून सचिन वाझेंना अटक केली. तसेच विशेष न्यायालयाकडून २५ मार्च वाझे यांची एनआयए कोठडीही मिळवली आहे. सध्या या प्रकरणावरून राज्यातले वातावरण तापलेले असून, वृत्त व इतर प्रसारमाध्यमांमधून वाझे प्रकरणाबाबतीत दररोज नवीन घडमोडी, खुलासे व दावे वाचायला मिळत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button