शेतकऱ्यांच्या मालाला हक्काचा भाव मिळवून देण्यासाठीच संघर्षाची भूमिका – आमदार मंगेश चव्हाण
चाळीसगाव येथे ज्वारी – मका – बाजरी भरडधान्य खरेदीचे काटापूजन
चाळीसगाव : मागील काळात शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा हमीभाव मिळण्यासाठी भ्रष्ट यंत्रणेने नाडल्याने मला शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागले.
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी असणारा शेतकी संघ जर व्यापाऱ्यांच कल्याण करून शेतकऱ्यांच नुकसान करत असल्याने मला त्याविरुद्ध वरिष्ठ पातळीवर तक्रार करावी लागली व केलेल्या गैरकारभाराची ते फळ आज भोगत आहेत, मागच्या वर्षी जे झालं ते आता होऊ नये, खऱ्या शेतकऱ्यांचाच माल मोजला गेला पाहिजे. हा प्रश्न हेवे दावे किंवा नेतृत्व सिद्ध करण्यासाठी नाही तर शेतकऱ्यांचा मोबदला त्यांना मिळवून देण्याचा आहे. मोठ्या विश्वासाने भडगाव शेतकी संघाकडे चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याची जबाबदारी दिली गेली आहे. नोंदणीसाठी पारदर्शक प्रक्रिया त्यांनी राबविली त्याचे कौतुकच आहे. चेअरमन प्रताप नाना व त्यांची सर्व यंत्रणा ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा भरड धान्य मोजून शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा मोबदला मिळवून देतील असा विश्वास मला असल्याचे प्रतिपादन चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केले. ते करगाव रस्त्यावरील शासकीय गोदामात सुरू झालेल्या ज्वारी – मका – बाजरी आदी भरडधान्य खरेदीसाठीच्या शासकीय खरेदी केंद्राच्या काटा पूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी भडगाव शेतकी संघाचे चेअरमन प्रताप हरी पाटील, तहसीलदार अमोल मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सरदारशेठ राजपूत, व्हा.चेअरमन सुभाष पाटील, बी.वाय.चव्हाण, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील व संचालक मंडळ उपस्थित होते.
आतापर्यंत इतकी झाली नोंदणी..
चाळीसगाव शेतकी संघाला धान्य खरेदीतील गैरप्रकार भोवल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी भडगाव शेतकी संघाला चाळीसगाव तालुक्यातील धान्य खरेदीचे अधिकार दिले होते. भडगाव शेतकी संघातर्फे चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत नोंदणी सुरू करण्यात आलेली असून आतापर्यंत 343 शेतकऱ्यांनी मका, 69 शेतकऱ्यांनी ज्वारी साठी व 56 शेतकऱ्यांनी बाजरीसाठी नोंदणी केली आहे. शासनातर्फे मक्याला १८५० रुपये, ज्वारीला २६२० रुपये व बाजरीला २१५० रुपये इतका हमीभाव मिळणार आहे. नोंदणी सुरू असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथील भडगाव शेतकी संघाच्या कार्यालयात नोंदणी करावी असे आवाहन भडगाव शेतकी संघाचे व्यवस्थापक अवधूत देशमुख यांनी केले आहे.






