Jalgaon

Jalgaon Live: संतापजनक..! पारोळ्यात नदीपात्रात नैसर्गिक विधी साठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार.. डोक्यात दगड घालून ठार मारण्याचा प्रयत्न….

Jalgaon Live: संतापजनक..! पारोळ्यात नदीपात्रात नैसर्गिक विधी साठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार.. डोक्यात दगड घालून ठार मारण्याचा प्रयत्न….
जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात एका गावात नदीपात्रात नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर मुलीच्या डोक्यावर दगड मारून आणि दोरीने गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत गंभीर जखमी असलेल्या पीडित मुलीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी संशयित तरुण बारक्या उर्फ अशोक मंगा भिल याच्या विरोधात पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला तात्काळ अटक करून फाशी द्यावी, या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी पारोळा पोलीस स्टेशन गाठून ठिय्या आंदोलन केले आहे. पारोळा तालुक्यातील गावातील १४ वर्षीय मुलगी आई तसेच भावासह वास्तव्यास आहेत. एका शेतातील पत्र्याच्या खोलीत सर्व कुटुंब राहत असून मजुरी करत उदरनिर्वाह भागवतं. दरम्यान १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी शुक्रवारी सायंकाळी ती राहत असलेल्या शेतापासून काही अंतरावर असलेल्या नदीपात्रात नैसर्गिक विधीसाठी गेली होती. यादरम्यान बारकु मंगा भिल याने मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. या अत्याचारास मुलीने विरोध केला असता बारकु याने पिडीत मुलीच्या डोक्यात दगड टाकला. त्यानंतरही दोरीने तिचा गळा आवळला.

या घटनेने मुलीची काही वेळासाठी शुध्द हरपली आणि बेशुद्ध पडली. शुद्ध आल्यानंतर अल्पवयीन मुलगी रक्ताबंबाळ अवस्थेत घरी आल्यानंतर तिने प्रकाराबाबत कुटुंबियांना हकीकत सांगितली. कुटुंबियांनी तातडीने अल्पवयीन मुलीला सुरुवातीला पारोळा येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पीडित मुलीला धुळे शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याठिकाणी मुलीवर उपचार सुरु आहे. या घटनेनंतर पीडितेच्या भावाच्या फिर्यादीवरुन बारक्या उर्फ अशोक मंगा भिल याच्याविरुध्द अत्याचारासह प्राणघातक हल्ला अशा वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित बारक्याला भिल याला पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ अटक केली आहे.

घटनेनंतर संतप्त पीडित मुलीच्या कुटुंबियासह समाजबांधवांसह ग्रामस्थांनी आरोपीला फाशी द्यावी, या मागणीसाठी पारोळा पोलीस स्टेशन गाठून ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर समाज बांधवानी महामार्गावर काही वेळ रास्ता रोको आंदोलन करुन आरोपीला फाशी द्या, नाहीतर आरोपी आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली. लोकप्रतिनिधींनी पोलीस ठाणे गाठून जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल आणि भडगाव तालुक्यातील घटना ताजी असतानाच पारोळा तालुक्यातील या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी समाजाच्या सर्वच स्तरातून होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button