Dadar

दादरमध्ये दणाणला स्वातंत्र्यवीरांच्या राष्ट्रभक्तीचा हुंकार

दादरमध्ये दणाणला स्वातंत्र्यवीरांच्या राष्ट्रभक्तीचा हुंकार

मुंबई पी व्ही आनंद

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 54 व्या आत्मार्पण दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि परिसरातून आलेल्या अनुयायांनी शक्तीप्रदर्शन करत विरोधकांच्या टिकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आणि त्यांच्या विचारांचा जयघोष करणारी अभिवादन यात्रा दादर परिसरातून निघाल्यानंतर अनेकजण त्यात सामील झाले आणि वाहतूक कोंडीही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर झाली. पथनाट्य, घोषणा, भव्य फलक, चित्ररथ आदींच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीरांना अभिवादन केले गेले.

दादरमध्ये दणाणला स्वातंत्र्यवीरांच्या राष्ट्रभक्तीचा हुंकार

नागरिकांचाही उत्सफूर्त सहभाग
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी बाबाराव सावरकर चौकातील फलकाला पुष्पहार अर्पण करून या रॅलीला प्रारंभ केला. त्यानंतर वीर कोतवाल मार्गे ही अभिवादन यात्रा शिवसेनाभवनकडे निघाली असता मोठ्या प्रमाणावर नागरिकांनीदेखील सहभाग देऊन स्वातंत्र्यवीरांना अभिवादन केले. वाहतूक कोंडी झाली तरी सर्वजण भारावलेले दिसून येत होते. घोषणा देत कार्यकर्ते पुढे सरकत होते.

दादरमध्ये दणाणला स्वातंत्र्यवीरांच्या राष्ट्रभक्तीचा हुंकार

शिवसेना भवनजवळ प्रचंड गर्दी
शिवसेनाभवनच्या समोरच्या चौकात रॅली पोहचल्यानंतर पथनाट्याचे आयोजन केले गेले. त्यातून स्वातंत्र्यवीरांचा जयघोष केला गेला. घोषणाही उत्सफूर्तपणे दिल्या जात होत्या. यावेळी रणजित सावरकर यांनी संबोधित केले. देशाच्या विरोधकांचा सामना करण्यासाठी आपण खंबीर आहोत, पण देशाच्या आत असलेल्या विरोधकांना समज देण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे, असे विचार त्यांनी व्यक्त केले. खिलाफत चळवळीला या वर्षी 100 वर्षे पूर्ण झाली असून त्यावेळी केलेली कृती देशविघातक कशी ठरली, हे ध्यानात ठेवून त्यांनी नागरिकांना यापुढील काळात देशविरोधी विचार आणि कृती करणा-यांना धडा शिकवा, असे आवाहनदेखील केले.

त्यानंतर ही रॅली केळुस्कर मार्गे स्मारकात पोहचली. त्यानंतर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. या अभिवादन सभेत खासदार राहुल शेवाळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, भाजपाचे राजेश शिरवाडकर आदी मान्यवर सहभागी झाले. स्वातंत्र्यवीरांच्या विचारांचा जयघोष करत या भव्य अभिवादन यात्रेची सांगता झाली.

क्षणचित्रे –
1. पोलिसांनीदेखील आम्ही नेहमीच आमचे काम करत असतो, सभा, रॅलींमध्ये असतो, पण आज काम करत करत ख-या अर्थाने राष्ट्रपुरुषाच्या आणि देशसेवेच्या कार्यात सहभागी होण्याचे समाधान मिळाले, अशा प्रतिक्रिया देताना आढळत होते.
2. अभिवादन यात्रेबाबत नागरिकांच्या मनात मोठे कुतूहल होते. बाबाराव सावरकर चौकात प्रत्येकजण उत्सफूर्तपणे सहभागी होताना दिसून येत होते.
3. यावेळी ठेवलेल्या चित्ररथात स्वातंत्र्यवीरांच्या विविध ग्रंथांच्या प्रतिकृती लक्ष वेधून घेत होत्या.
4. शिवाजी पार्कात सकाळच्या मॉर्निंग व़ॉकला येणारे नागरिकदेखील सावरकरांविषयी चर्चा करताना दिसून येत होते. यात्रेत सहभाग देत होते. त्यात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती.
5. शिवसेनाभवन जवळ वाहतूक कोंडी झाल्यानंतर वाहनांतील अनेक बिगरमराठी, सुशिक्षित, उच्चभ्रू वर्गातील मंडळीदेखील सावरकरांच्या यांच्या कार्याची महता व्यक्त करताना दिसत होती.

Leave a Reply

Back to top button