Kalwan

ई-पीक अँपद्वारे आता शेतकरीच करणार पीक पाहणी

ई-पीक अँपद्वारे आता शेतकरीच करणार पीक पाहणी

सुशिल कुवर कळवण

कळवण : आपलेच शेत अन्, आपलेच पीक असताना देखील शेतकर्‍यांना पीक पाहणी करताना तलाठी आणि कृषी विभागाच्या अधिकार्‍यांची विशेष मर्जी राखण्याबरोबरच त्यांची हाजीहाजी करावी लागत होती. मात्र, अशा दिव्य कसरतीपासून शेतकर्‍यांची आता सुटका होणार आहे.

महाराष्ट्र शासनाने टाटा ट्रस्टच्या सहयोगाने विकसित केलेल्या ई-पीक अँपसद्वारे 15 ऑगस्टपासून शेतकरी आता स्वतः आपल्या पीक पाहणी नोंदवू शकणार आहे. पीक पाहणी करताना तलाठी कृषी विभागाच्या अधिकार्‍यांची विशेष मर्जी राखण्याच्या दिव्य कसरतीपासून शेतकर्‍यांची आता सुटका होणार असल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

प्रत्येक वेळी अवेळी पडणारा पाऊस, ओला-सुका दुष्काळाच्या नैसर्गिक आपत्तीने शेतकरी नेहमी संकटात सापडत आलेला आहे. अनेकदा अपेक्षित शासकीय मदतीपासून अशा वेळी शेतकर्‍यांना वंचित राहावे लागत असल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. मानवी अहवालात काही वेळा तांत्रिक त्रुटी राहत असल्याने शासनाने आता थेट ऑनलाईन पीक पाहणी नोंदणी प्रणाली विकसित केली आहे. यामध्ये शेतकर्‍यांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रारंभी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी शहरासह राज्यातील पाच तालुक्यांमध्ये पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला. त्याची योग्य अंमलबजावणी झाल्यानंतर आता राज्यभर ही प्रणाली लागू करण्यात आली आहे. 15 ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात याद्वारे काम सुरू होणार आहे.

याबाबत अधिकृत प्रशिक्षणही संबंधितांना दिले जात आहे. औरंगाबाद विभागामध्ये प्रशिक्षण पूर्ण झाले असून आता नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यात प्रशिक्षण सुरू आहे. यामध्ये महसूल विभागाचे दोन अधिकारी व सेवक, कृषी विभागाचे दोन अधिकारी व सेवक अशा चौघांची तालुक्यातून निवड करण्यात आली होती.

संबंधित लेख

Back to top button