? दंगल राजकारणाची..शहर विकास आघाडीत बिघाडी झाल्याची जोरदार चर्चा ; विकास कामासाठी आघाडीच्या 3 नगरसेवकांचे सत्ताधारी गटाला समर्थन
नितीन माळे
चाळीसगाव- नगरपालीकेच्या नगराध्यक्षा आशालता चव्हाण ह्या नगरपरिषद, शहरवासियांच्या प्रति असलेली जबाबदारी व कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ ठरत असल्याने त्यांना पदावरून हटवावे अशी मागणी लोकनेते कै.अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडी व दोघा अपक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे गेल्या महिन्यात केली होती.
मात्र आता शहर विकास आघाडीच्या तिघा नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही जरी मनाने शहर विकासआघाडी सोबत असलो तरी विकासकामांसाठी सत्ताधारी पक्षास काय समर्थन राहील अशी भूमिका घेतल्याने शहर विकास आघाडीत देखील एकमत नसल्याचं उघड झाले आहे शहर विकास आघाडीतील नगरसेवकांच्या या भूमिकेमुळे शहरात वेगळ्या चर्चेला उधान आले असून शहर विकास आघाडीत बिघाडी झाल्याची जोरदार चर्चा होत आहे.
शहर विकास आघाडीचे नगरसेवक आनंदा चिंधा कोळी यांच्या घाटरोडवरील कार्यालया झालेल्या पत्रकार परिषदेत शहर विकास आघाडीचे नगरसेवक आनंदा कोळी, श्रीमती यास्मिनबी फकिरा मिर्झा व श्रीमती संगीता राजेंद्र गवळी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद नगरपालीकेतील राजकारणाला पुन्हा कलाटणी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पत्रकार परिषदेत या तिघा नगरसेवकांनी सांगितले की, शहर विकास आघाडीचे आम्ही नगरसेवक आहोत. विकासाच्या मुद्यावर आम्ही निवडून आलोत. मात्र लोकनियुक्त नगराध्यक्ष भाजपाचा निवडून आल्याने व शिवसेना तसेच काही अपक्षांच्या मदतीने भाजपाप्रणीत युतीची सत्ता आल्याने आम्हाला विरोधात बसावे लागले.विरोधात असूनही आम्ही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.शहराच्या मुलभूत सोयी सुविधांच्या दृष्टीकोनातून 70 कोटी रूपयांची पाणी पुरवठा योजना, 147.50 कोटी रूपयांची भूमिगत गटार योजना व इतर कोट्यावधी रूपयांची विकास कामे या काळात मंजुर झाली.त्याचा फायदा शहराबरोबरच आमच्या प्रभागातही होणार आहे.ही कामे दर्जेदार व लवकर व्हावी यासाठी सत्ताधारी गटासह विरोधकांचीही जबाबदारी आहे.मात्र गेल्या चार वर्षापासून नगरपालीकेच्या कामकाजात केवळ विरोधाला विरोध म्हणून विकास कामात अडथळे आणली जात आहेत. काही नगरसेवक आडमुळे धोरण धरून असल्याने शहराचे नुकसान होत असून नागरीकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.या सर्व बाबींना कंटाळून आम्ही यापुढे केवळ विकास कामांच्या मागे राहण्याचा निर्णय घेतला असून आहे.
त्यामुळे केवळ विरोधाला विरोध अशी आमची भूमिका राहणार नसून शहराच्या सर्वांगिण विकासासाठी जो योग्य भूमिका घेईल त्याच्या सोबत राहू असा दावा या तिघा नगरसेवकांनी पत्रपरिषदेत केला.
काही नगरसेवकांच्या निरर्थक तक्रारींमुळे योजनांची कामे खोळंबली असा गंभीर आरोप करतांना आनंदा कोळी यांनी सांगितले की, शहरासाठी जून 2019 मध्ये 147.50 कोटी रूपयांची भूमिगत गटार योजना मंजूर केली.पैकी पहिल्या 68.44 कोटी या मंजूर टप्प्यातील गेल्या दीड वर्षात 6 कोटीचे काम देखील झालेले नाही.केवळ काही नगरसेवकांच्या आडमूठे धोरण व सततच्या निरर्थक तक्रारींमुळे काम थांबले होते.आता जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रार निरर्थक असल्याने ती निकाली काढली आहे.मात्र यामुळे भूमिगत गटारीचे काम जवळपास 12 महिने होवू शकले नाही.पाणी पुरवठा योजनेतही अडथळे शहरात 70 कोटी रूपयांची अंतर्गत पाणी पुरवठा योजना असून या योजनेच्या कामात देखील विनाकारण अडथळा निर्माण करून व तक्रारी करून काम कसे बाधित होवून विलंब होईल या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येते.पाणी पुरवठा व भूमिगत गटार योजना ज्या शहरात सुरु आहेत त्या शहरातील रस्त्यांची कामे या योजना पूर्णत्वास आल्यानंतरच हाती घेण्याचे शासनाचे स्वयंस्पष्ट निर्देश आहेत. याची जाणीव तक्रारकर्त्यांना असून देखील विनाकारण तक्रारी करून शहरातील जनतेला वेठीस धरले जात आहे.नगरपालीकेकडे विविध योजना कामांचे सुमारे 20 कोटी रूपये पडून आहेत.परंतू यात देखील केवळ विरोध म्हणून कोणत्याही कारणाने अडथळे निर्माण करून विकास कामे होवू दिली जात नाहीत.जर निर्धारीत वेळेत ही कामे झाली नाहीत तर हा निधी शासनाकडे परत जाईल असा देखील शासन निर्णय झाला आहे.त्यामुळे शेवटी शहरवासियांचे नुकसान होणार आहे.आम्ही मनाने शहर विकास आघाडीबरोबर पण….
वरील सर्व बाबी जनतेस कळत नाही अशा काही नगरसेवकांच्या भावना असू शकतात परंतू आम्ही त्यात सहभागी नव्हतो व यापुढेही राहणार नाही.आम्ही तन मनाने आमच्या शहर विकास आघाडीसोबतचं आहोत तथापि विकास कामांसाठी मात्र आमचे सत्ताधारी पक्षास कायम समर्थन राहील परंतू चुकीच्या कामांना विरोध देखील राहील असे आनंदा कोळी, यास्मिन बी मिर्झा, संगीता गवळी यांनी सांगितले.






