Nashik

तरुणांच्या आरोग्यासाठी आ. सत्यजीत तांबे यांचा पुढाकार हृदयविकाराच्या झटक्यांमुळे होणाऱ्या मृत्यूबद्दल व्यक्त केली चिंता- गुणवत्ता नियंत्रण टीम नेमण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती

तरुणांच्या आरोग्यासाठी आ. सत्यजीत तांबे यांचा पुढाकार हृदयविकाराच्या झटक्यांमुळे होणाऱ्या मृत्यूबद्दल व्यक्त केली चिंता- गुणवत्ता नियंत्रण टीम नेमण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती

प्रतिनिधी :
गेल्या काही वर्षांमध्ये तरुणांमध्ये आणि खासकरून शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. ही चिंताजनक बाब असून आपण सर्वांनीच याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे, अशी विनंती नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना पत्राद्वारे केली आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी प्रत्येक शाळा-कॉलेजमध्ये गुणवत्ता नियंत्रण टीम स्थापन करावी, असा उपायही त्यांनी या पत्रात सुचवला आहे.

आ. सत्यजीत तांबे तरुणाईला भेडसावणाऱ्या विविध मुद्द्यांबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित करतात. त्यांच्याबद्दलची विशेष बाब म्हणजे ते फक्त समस्या मांडून थांबत नाहीत, तर ती समस्या सोडवण्यासाठीचा एखादा सहज करता येणारा उपायही ते नेहमीच सुचवतात. यावेळी त्यांनी तरुणांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबतच्या एका गंभीर प्रश्नाला वाचा फोडली. राज्यातील अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढलं आहे. पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर आणि मुंबई अशा प्रमुख शहरांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. या अशा दुर्दैवी घटना रोखण्यासाठी काही ठोस उपाययोजना करणं आवश्यक आहे. त्याचाच भाग म्हणून प्रत्येक शाळा-महाविद्यालयांमध्ये एक गुणवत्ता नियंत्रण पथक नियुक्त करण्यात यावं, असं या पत्रात आ. तांबे यांनी म्हटलं आहे.

हे पथक शाळा-कॉलेजांमधील कँटिनमध्ये विकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांचा दर्जा तपासू शकेल. तसंच शाळा-कॉलेजांच्या अभ्यासक्रमात क्रीडा हा विषय शिकवला जाईल, याचीही खातरजमा हे पथक करेल. शैक्षणिक संस्थांच्या आसपासच्या भागात नो-स्मोकिंग झोन कटाक्षाने पाळला जाईल आणि विद्यार्थ्यांच्या डब्यातही सकस आहार असेल, या बाबींकडे हे पथक लक्ष ठेवेल, असं तांबे यांनी सुचवलं आहे. त्याशिवाय निरोगी जीवनशैलीसाठी कोणत्या गोष्टी सहजपणे करता येतात, याबाबत हे पथक विद्यार्थी आणि पालक यांचं समुपदेशनही करेल, असंही तांबे या पत्रात म्हणतात.

हृदयविकाराचा धोका किती?

मुंबईतील एका प्रख्यात रुग्णालयाच्या माहितीनुसार, मार्च २०२३ पासून त्यांच्याकडे दाखल होणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्याच्या केसेसमध्ये तब्बल *१५ ते २० टक्क्यांनी वाढ* झाली आहे. यातील बहुतांश प्रकरणं ही *२५ वर्षांखालील तरुणांना हृदयविकाराचा झटका* आल्याची आहेत.

तरुण वयात हृदयविकार का?

काही डॉक्टरांच्या मते विशीतील तरुणांच्या हृदयात ब्लॉकेज निर्माण होण्यामागे कोलेस्टरॉल आणि काही जनुकीय घटक यांचा हात आहे. जनुकीय घटक, लठ्ठपणा, कोलेस्टरॉल आणि मधुमेह ही चौकडी विशी-तिशीतील तरुणांसाठी जीवघेणी ठरत आहे. त्याशिवाय COVID-१९झालेल्या तरुणांमध्येही हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण जास्त आहे. विशेष म्हणजे हृदयविकाराचा झटका आणि कोविड-१९ यांच्यातील परस्परसंबंध तपासण्यासाठी केंद्र सरकार संशोधन करत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी दिली होती.

तरुणांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज

आपण तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळा-कॉलेजांचा दर्जा सुधारू, पण त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. आजकाल शहरी भागांमध्ये पालकांची जीवनशैली प्रचंड वेगवान झाली आहे. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांच्या सकस आहाराकडे लक्ष देता येतंच असं नाही. ही तरुण पिढी आपलं भविष्य आहे. त्यामुळे सरकारनेही पुढाकार घेऊन त्यांचं आरोग्य उत्तम राहील, यासाठी प्रयत्न करायला हवेत. १८-२० वर्षांच्या मुलांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू होणं, ही दुर्दैवी बाब आहे. आपण सगळे प्रयत्न करून हे थांबवू शकतो. – आ. सत्यजीत तांबे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button