आमदार मंगेश चव्हाण यांच्या इशाऱ्यानंतर चाळीसगाव – मालेगाव रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात
मनोज भोसले
गेल्या अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत असलेल्या चाळीसगाव मालेगाव रस्त्याचे काम तत्कालीन भाजपा सरकारच्या काळात हायब्रीड एन्यूटी योजनते मंजूर करण्यात आले मात्र संबंधित रस्त्याच्या ठेकेदार अतिशय संथ गतीने काम करत असल्याने तसेच सर्वाधिक खराब असलेल्या चाळीसगाव शहराकडून काम सुरू करण्याऐवजी मालेगाव शहराकडून काम सुरू केल्याने मोठी नाराजी चाळीसगाव वासीयांमध्ये पसरली होती.
भाजपाचे तरुण कार्यकर्ते आमदार मंगेश चव्हाण यांची तालुक्याच्या आमदार पदावर निवड झाल्यानंतर त्यांनी तातडीने या गंभीर विषयात लक्ष घालून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर चाळीसगाव जुना मालेगाव नाका ते मालेगाव रोड बायपास पर्यंतचा अतिशय खराब झालेला रस्ता दुरुस्त करण्यात आला होता, दरम्यान राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर संबंधित ठेकेदार उर्वरित रस्ता दुरुस्ती साठी चालढकल करत होता त्यामुळे रस्त्यावर असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रोज छोटे मोठे अपघात घडत होते.
नाशिक येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आढावा बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी या मुद्द्याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री यांनी महिन्याभराच्या आत सदर रस्ता दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते.
मात्र मुख्यमंत्री यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत अधिकारी व ठेकेदाराने रस्ता दुरुस्ती कामात चालढकल सुरू ठेवल्याने अखेर आमदार मंगेश चव्हाण यांनी रस्ता दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता.
आमदारांच्या आक्रमक पवित्रा पाहून अखेर संबंधित एजन्सी मार्फत चाळीसगाव तालुका हद्दीतील रस्ता दुरुस्ती व खड्डे बुजण्याचे काम सुरू करण्यात आल्याने प्रवाश्यानी समाधान व्यक्त केले आहे.






